पा र्श्व गा य न : चित्रपटातील गीतयोजनेचे एक तंत्र. चित्रपटात वेगवेगळ्या दृश्यप्रसंगी संबंधित पात्रांच्या तोंडी गीते घातलेली असतात पण प्रत्यक्षात मात्र अशी गीते चित्रीकरणाच्या वेळी ध्वनिमुद्रित केली जात नाहीत तर ती आधीच ध्वनिमुद्रणकक्षेत स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रित केली जातात. दृश्यचित्रीकरणाच्या वेळी संबंधित पात्राला गाणी गात असल्याचा केवळ अभिनय करावा लागतो. गाण्याचे दृश्यप्रसंग योग्य प्रकारे चित्रध्वनिसंयोग करून चित्रपटाची संपूर्ण फिल्म नंतर तयार करण्यात येते. गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाप्रमाणेच चित्रपटातील पार्श्वसंगीतही स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रित केले जाते.चित्रपटाच्या आरंभकाळात चित्रीकरणाच्या वेळी संवादांप्रमाणेच गाण्यांचेही ध्वनिमुद्रण केले जाई. हे काम अतिशय जिकिरीचे व गुंतागुंतीचे असे. ते करताना अवतीभवतीचे इतरही आवाज उदा., पशुपक्षी वा अन्य व्यक्तींचे वा वस्तूंचे आवाजही, त्यात ध्वनिमुद्रित होत. बाह्यचित्रीकरणाच्या वेळी वाद्ये व वादक यांचा लवाजमा त्या त्या स्थळी न्यावा लागे. प्रत्येक दृश्यवेध घेताना गाण्याचा एकच एक ताल, लय इ. बाबी सांभाळणे कठीण जाई. म्हणून एकाच वेळी चित्रीकरण आणि गाण्याचे ध्वनिमुद्रण साधणे अतिशय कष्टाचे असे. त्यामुळेच गाण्याचे ध्वनिमुद्रण स्वतंत्रपणे बंदिस्त अशा ध्वनिमुद्रणकक्षेत करणे व दृश्यचित्रीकरणाच्या वेळी त्या ध्वनिमुद्रिका उपयोगात आणणे, हे सोयीचे तंत्र पुढे आले. त्यामुळे गाण्यात मनासारखे परिणामकारक दृश्यवेध घेणे शक्य झाले.
भारतात १९३५च्या सुमारास निघालेल्या ⇨ न्यू थिएटर्सच्या धूपछाँव या हिंदी (मूळ बंगाली भाग्यचक्र) चित्रपटामध्ये सर्वप्रथम पार्श्वगायनाचा उपयोग करण्यात आला, असे म्हणता येईल. त्याचे दिग्दर्शन नितीन बोस यांनी केले होते संगीत रायचंद बोराल व ध्वनिलेखन मुकुल बोस यांचे होते. पार्श्वगायनाची मूळ कल्पना मुकुल बोस यांनीच या चित्रपटामधून सर्वप्रथम भारतीय चित्रपटसृष्टीत यशस्वी करून दाखविली. पार्श्वगीते असलेला पहिला मराठी चित्रपट प्रेमवीर हा होय (१९३७). यातूनच पुढे फक्त पार्श्वगायन करणाऱ्या गायकांची एक स्वतंत्र परंपरा भारतीय चित्रपटसृष्टीत निर्माण झाली. चित्रपटातील स्त्रीपुरुषपात्रांचया लहानमोठ्या भूमिका करणाऱ्या कलावंतांना या पार्श्वगायकांचा उसना आवाज देऊन त्यांच्या तोंडी गाणी घालण्याची सोय उपलब्ध झाली. त्यामुळे गायक कलावंतांची गरज वा महत्त्व कमी झाले व पार्श्वगायकांचा प्रभाव चित्रपटसृष्टीत वाढत गेला.
पार्श्वगायक म्हणून लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी, मन्ना डे, किशोरकुमार, तलत महमूद, महेंद्रकपूर, हेमंतकुमार, सुमन कल्याणपूर, येसुदास इ. गायक-गायिका अग्रेसर असून यापूर्वी होऊन गेलेले पार्श्वगायक मुकेश व पार्श्वगायिका गीता दत्त (राय) आणि शमशाद बेगम इत्यादींनीही पार्श्वगायनाच्या परंपरेला संपन्न केले आहे.
एका पार्श्वगायकाने व गायिकेने किती कलावंतांना आपला उसना आवाज द्यावा, याला मर्यादा राहिलेली नाही. एकाच चित्रपटात एकाच पार्श्वगायकाने वा गायिकेने दोन किंवा दोनपेक्षा अधिक पात्रांना आपला उसना आवाज दिला असल्याचे आढळून येते. उदा., मजबूर (१९७४) मध्ये अमिताभ बच्चन व प्राण या दोघांना एकट्या किशोरकुमारने उसना आवाज दिला आहे तर एकाच चित्रपटात एका कलावंताला दोन किंवा तीन पार्श्वगायकांनी उसना आवाज दिल्याचीही उदाहरणे आहेत. उदा., बैजू बावरा मध्ये भारतभूषण या एकाच अभिनेत्याला द.वि. पलुस्कर व महंमद रफी या दाने पार्श्वगायकांनी आपला उसना आवाज दिलेला आहे. भारतीय चित्रपटातील गाणी ही मुळातच एका कृत्रिम पण लोकप्रिय अशा क्लृप्तीचा भाग असल्याचे उसन्या आवाजाचे पार्श्वगायन खटकेनासे झाले आहे. तथापि गायनगुण नसलेल्या पण अभिनयगुण असलेल्यांना, तसेच केवळ गायनकलेतच गती असणाऱ्यांनाही पार्श्वगायनामुळे चित्रपटसृष्टीत वाव मिळू शकतो.
पहा : चित्रपटसंगीत.
शिंदे, मा.कृ. वाटवे, बापू.