स्टीव्हन

स्पीलबर्ग, स्टीव्हन : (१८ डिसेंबर १९४६). ख्यातकीर्त अमेरिकन चित्रपटदिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक व अभिनेते. त्यांचा जन्म सिनसिनॅटी शहरात ( ओहायओे राज्य ) एका सनातनी कट्टर ज्यू कुटुंबात झाला. त्यांची आई लिह ऍड्लर यांचे उपाहारगृह होते आणि सांगीतिक कार्यक्रमात त्या पियानोवादक म्हणून काम करीत. वडील आर्नल्ड स्पीलबर्ग हे विद्युत् अभियंता होते. संगणक विकसनाच्या कामात त्यांचा सहभाग होता. स्पीलबर्ग यांचे बालपण स्कॉट्स डेल, ॲरिझोना व न्यू जर्सी येथील हॅडॉन या गावी गेले. त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात हिब्रू शाळेतून झाली (१९५३ ५७). त्यांचे पुढील शिक्षण कॅलि-फोर्नियातील सराटोगा हायस्कूल व कॅलिफोर्निया स्टेट कॉलेजमध्ये झाले. आईवडिलांच्या घटस्फोटामुळे वडिलांच्याबरोबर सराटोगा येथे त्यांना जावे लागले तथापि त्यांच्या तीन बहिणी आईबरोबर ॲरिझोना येथेच राहिल्या.

स्पीलबर्ग यांनी कुमारवयात आपल्या मित्रांच्या साहाय्याने ८ मिमी. चे साहसी चित्रपट बनवले. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण स्कॉट्स डेलमधील पिनॅकल पीक पाशिओ उपाहारगृहात झाले. या चित्रपटात त्यांनी त्यांच्या खेळण्यातल्या आगगाडीच्या मोडतोडीची दृश्ये चित्रित केली होती. फोटोग्राफी मेरिट बॅज मिळविण्यासाठी स्पीलबर्ग यांनी वडिलांच्या चलचित्र कॅमेर्‍याने द लास्ट गन्फाइट हा लघुचित्रपट निर्माण केला (१९५८). त्यांनी केलेल्या एस्केप टू नो व्हेअर या पूर्व आफ्रिकेतील संग्रामावरील लघुपटाला बक्षीस मिळाले. विज्ञानकथेवर आधारलेला फायर लाइट हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला प्रयोगशील चित्रपट (१९६३).

स्पीलबर्ग यांनी दिग्दर्शित केलेल्या ॲम्ब्लिन या लघुपटामुळे त्यांचा व्यावसायिक चित्रपटातील प्रवेश सुकर झाला. त्यांच्या चित्रपटनिर्मिती-संस्थेचे नावही त्यांनी ॲम्ब्लिन एन्टरटेन्मेंट असे ठेवले. त्यांच्या चित्र-पटक्षेत्रातील कामगिरीमुळे नामांकित युनिव्हर्सल स्टुडिओने त्यांच्याशी दूरदर्शनमालिका आणि चित्रपट यांकरिता करार केला. शुगरलँड एक्सप्रेस हा त्यांचा पहिला व्यावसायिक चित्रपट. त्यानंतरच्या झॉज (१९७५) या चित्रपटाने त्यांना आर्थिकदृष्ट्या यश मिळवून दिले. त्याचा पुढील भाग झॉज-२ त्यांनी प्रदर्शित केला. त्यांनी अनेक अद्भुतरम्य व चमत्कृतिपूर्ण चित्रपट बनविले. त्यामध्ये परग्रहवासी ( एलिएन ) आणि मानव यांच्या भेटीवर आधारलेला क्लोज इन्काउंटर्स ऑफ द थर्ड काइंड (१९७७) अतिभौतिक विषयावरील पोलर जोस्ट (१९८२), ई. टी. (१९८२), कलर पर्पल (१९८५), एम्पायर ऑफ द सन (१९८८) यांचा समावेश होतो. हूक (१९९१) व डायनोसॉर या महाकाय प्राण्यावरील ॲनिमेशन तंत्राच्या आधारे काढलेला ज्युरासिक पार्क (१९९३) हे त्यांचे चित्रपट खूप गाजले. शिंडलर्स लिस्ट, सेव्हिंग प्रायव्हेट रायन (१९९५), आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (२००१), मायनॉरिटी रिपोर्ट (२००२), कॅच मी इफ यू कॅन (२००२), द टर्मिनल (२००४), ईगल आय (२००८), वॉर हॉर्स (२०११) हे त्यांचे चित्रपटही खूप लोकप्रिय झाले. गर्द अंधारात, धूळीतून, धुक्यातून दृग्गोचर होणारे प्रकाशझोत, आकाशातून कोसळणारा तारा, सूर्याच्या विविध छटा इत्यादी प्रतिमा तर मोटारगाडीच्या आरशातून चित्रपटातील महत्त्वाच्या पात्रांचा प्रथम परिचय ही स्पीलबर्ग यांच्या दिग्दर्शनातील काही प्रमुख वैशिष्ट्ये होत. टॉम हॅक्स, रिचर्ड ड्रेफस, फ्रॅक वेकर आणि टॉम क्रूज हे अभिनेते त्यांच्या बहुतेक चित्रपटांतून झळकले.

स्पीलबर्ग यांच्या संगणकीय खेळाची सुरुवात स्टीव्हन स्पीलबर्ग्स डायरेक्टर्स चेअर या त्यांनीच चित्रित केलेल्या खेळातून झाली. चित्रपट- दिग्दर्शनाबरोबरच निर्मितिक्षेत्रातही त्यांनी वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, डिझ्नी पिक्चर्स यांसारख्या नामांकित चित्रपटनिर्मिती संस्थांच्या सह-कार्याने भरीव कामगिरी केली. ड्रीमवर्क मूव्ही स्टुडिओ चे स्पीलबर्ग सहसंस्थापक आहेत. काही चित्रपटांतून त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या असून ॲनिमेशन चित्रपटांतील काही व्यक्तिरेखांना त्यांनी आवाजही दिला आहे. त्यांचा विवाह ऍमी आयर्व्हिंग या अभिनेत्रीबरोबर झाला (१९८५). पुढे तिच्याशी झालेल्या घटस्फोटानंतर त्यांचा दुसरा विवाह अभिनेत्री केट कॅप्शा हिच्याबरोबर झाला (१९९१).

स्पीलबर्ग यांनी व्याधिग्रस्त मुलांसाठी स्टारलाइट चिल्ड्रन्स फाउंडेशन ’ च्या माध्यमातून काम केले. ऑस्कर-ॲकॅडेमी, एम्मी, बाफ्टा, गोल्डन ग्लोब या प्रतिष्ठेच्या पारितोषिकांसह त्यांच्या चित्रपटांस १९७६ — २०१३ पर्यंत १२६ पुरस्कार व २३१ नामांकने प्राप्त झाली आहेत. त्यांच्या शिंडलर्स लिस्टसाठी १९९४ चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आणि सेव्हिंग प्रायव्हेट रायन ला १९९९ चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर अकॅडमी पुरस्कार लाभले. ऑर्डर ऑफ मेरिट ( फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी, १९९८), नाइट ग्रँड क्रॉस ऑर्डर ऑफ मेरिट ( इटालियन रिपब्लिक, २००३), लिबर्टी मेडल (२००३), कमांडर ऑर्डर ऑफ क्राउन ( बेल्जियम, २०११) इ. मानसन्मानही त्यांना लाभले. लिंकन (२०१२), डिलिव्हरी मॅन (२०१३) हे त्यांचे अलीकडील गाजलेले चित्रपट.

देशपांडे, जयंत