फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया : (भारतीय फिल्म और टेलीविजन संस्थान). चित्रपट व दूरदर्शन यांच्या सर्व अंगोपांगांचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी भारतातील एकमेव संस्था. पुणे शहरातील ⇨ प्रभात फिल्म कंपनीच्या पूर्वीच्या विस्तृत परिसरात (सु. ८·५ हेक्टर) या संस्थेचे सर्व विभाग आहेत. १९५१ साली भारत सरकारने नियुक्त केलेल्या चित्रपट-चौकशीसमितीच्या शिफारशींनुसार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकारकक्षेत १९६० साली फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या नावाने ही संस्था स्थापन करण्यात आली व २ ऑक्टोबर १९७४ साली ती स्वायत्त झाली. १९७० साली संस्थेला सध्याचे नाव देण्यात येऊन १९७१ पासून दिल्लीला सुरू झालेले दूरचित्रवाणी प्रशिक्षण केंद्र ऑक्टोबर १९७४ मध्ये पुण्यास हलविण्यात आले व ते या संस्थेमध्ये अंतर्भूत केले गेले.

संस्थेचे प्रमुख संचालक (निदेशक) आणि त्यांच्या खालोखाल चित्रपटप्रमुख, दूरचित्रवाणी-प्रमुख, उपकुलसचिव व प्रमुख लेखाधिकारी अशी मुख्य अधिकारपदे या संस्थेत आहेत. याशिवाय प्रत्येक शाखेत अध्यापन करणारे अनुभवी व कुशल अध्यापक आहेत. संस्थेच्या स्थापनेपासून गजानन जहागिरदार, जगत मुरारी, देवेंद्र दीक्षित व गिरीश कार्नाड यांनी संस्थेच्या प्रमुखपदाची धुरा वाहिली. एन्‌.व्हि.के. मूर्ती हे संस्थेचे विद्यमान संचालक आहेत (१९८०).

प्रारंभीच्या अवस्थेत मार्च १९६१ पासून चित्रपटक्षेत्रांतील व्यावसायिक तंत्रज्ञांकरिता तीन महिन्यांचा नूतनीकरण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला परंतु नंतर १९६१ च्या ऑगस्टपासून मात्र नियमीत अभ्यासक्रम सुरू झाला. सुरूवातीला : (१) पटकथालेखन व चित्रपटदिग्दर्शन, (२) ध्वनिलेखन – ध्वनिअभियांत्रिकी, (३) चलच्चित्रीकरण आणि (४) चित्रपटसंपादन असे विषय अभ्यासक्रमात होते. १९६३ साली अभिनयाचा अभ्यासक्रम सुरू झाला. हा अभ्यासक्रम संस्थेच्या सल्लागार समितीने सुचविलेला होता. तसेच पटकथालेखन व दिग्दर्शन हे दोन स्वतंत्र अभ्यासक्रम ठरविण्यात आले. १९७७ साली दोन वर्षांचा एक सामान्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. या अभ्यासक्रमानुसार तो पूर्ण झाल्यावर तिसऱ्या वर्षी दिग्दर्शन, चलच्चित्रीकरण, ध्वनिलेखन-अभियांत्रिकी, चित्रपटसंपादन किंवा अभिनय यांत प्राविण्य मिळविता येत असे. १९७७ च्या ऑगस्टमध्ये संस्थेच्या विद्या परिषदेने शिफारस केल्याप्रमाणे दोन वर्षाचा साधारण चित्रपट अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. तो पूर्ण केल्यावर तिसऱ्या वर्षी चित्रपटसंपादन किंवा चलच्चित्रीकरण या विषयांत विशेष प्राविण्य मिळविता येते. तसेच दीड वर्षाचा चित्रपटदिग्दर्शन व दूरचित्रवाणी या संबंधीचा एक नवीन अभ्यासक्रमही सूरू करण्यात आलेला आहे.

फिल्म

संस्थेच्या चित्रपट विभागातील प्रवेशासाठी भारतातील विविध केंद्रांत विद्यार्थ्याची चाचणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा मात्र पुण्याला संस्थेत घेण्यात येते. उमेदवार विद्यार्थ्यांचे वय १७ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. असा नियम आहे. परदेशी विद्यार्थीही या संस्थेत प्रवेश घेतात. चित्रपटविषयक साधारण अभ्यासक्रमासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता म्हणजे त्याने इंटरमीजिएट किंवा कोणत्याही मान्यवर विद्यापीठाचा १०+२ हा अभ्यासक्रम पुरा केलेला असावा किंवा छायाचित्रण अथवा ललित कला या विषयांत तो पदविकाप्राप्त असावा.

ध्वनिलेखन आणि ध्वनि-अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्याने इलेक्ट्रॉनिकी किंवा रेडिओ-अभियांत्रिकी वा तत्सम विज्ञान-विषयातील पदवी (बी.एस्‌सी.), गणित आणि भौतिकी हे विषय घेऊन मिळवलेली असावी व प्रत्येक विषयात त्याला किमान ५० टक्के गुण असावेत, अशी अट आहे.

संस्थेतील शिक्षण तात्विक आणि तांत्रिक अशा दुहेरी स्वरूपाचे आहे. त्यामुळे प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. संस्थेतील तीन वर्षाच्या अभ्यासकाळात प्रत्येक विद्यार्थ्याला एक माहितीपट, एक गीतमुद्रण, एक लघुपट आणि एक जाहिरातपट (रंगीत) तयार करावा लागतो.

संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले निवडक चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट-महोत्सवासाठी व स्पर्धांसाठी पाठविले जातात.संस्थेच्या द टेन, विलाप, द कॅनिबल्स यांसारख्या चित्रपटांना अशा स्पर्धांतून पुरस्कारही लाभले आहेत. ही संस्था ‘इंटरनॅशनल लिआयजन सेंटर ऑफ सिनेमा अँड टेलिव्हिजन स्कूल्स’ यामूळे फ्रेंच आंतरराष्ट्रीय संस्थेची सभासद आहे.

दूरचित्रवाणीचे प्रशिक्षण सध्या दूरचित्रवाणीच्या नोकरवर्गापुरते मर्यादित आहे. साधारणपणे २० ते २२ आठवड्यांच्या या अभ्यासक्रमात दूरचित्रवाणी स्टुडिओचे तंत्र, निर्मिती, रंगमंच, नेपथ्य व दूरदर्शन-चित्रपट हे विषय अंतर्भूत आहेत

संस्थेचे ग्रंथालय समृद्ध असून त्यात सुमारे २० हजार देशीपरदेशी ग्रंथ आहेत तर संस्थेच्या चित्रपट संग्रहालयात निवडक देशीपरदेशी चित्रपट, विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट व शैक्षणिक स्वरूपाचे लघुपट मिळून एकूण सु. ६७५ चित्रपट संग्रही आहेत. या संग्रहात एकूण १,५०० च्या वर ध्वनिफिता व सु. ४०० दृक्‌श्राव्यफिता आहेत.

या संस्थेमधून १९७९ अखेर एकूण ७५३ विद्यार्थ्यांनी चित्रपटनिर्मितीच्या विविध विषयांत पदविका मिळविल्या. त्यांतील सु. ४५ विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक विषयांत पदविका घेतल्या आहेत. संस्थेत आफ्रो आशियाई देशांतील विद्यार्थीसुद्धा आहेत.

आतापर्यंत संस्थेने भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक कलावंत आणि तंत्रज्ञ दिले आहेत. त्यांपैकी चित्रपट-दिग्‍दर्शकांत मणी कौल, कुमार सहानी, सुभाष घई, विकास देसाई, अदूर गोपालकृष्णन, के.जी. गिरीश, सईद मिर्झा चलच्चित्रीकरणात के.के. महाजन, ए.के. वीर, सुदर्शन नाग, नदीम खान अभिनयात शत्रुघ्‍न सिन्हा, जया भादुरी, असरानी, रामेश्वरी, शबाना आझमी ध्वनिमुद्रणांत नरेंद्र सिंग, कुलदीप सूद, हितेंद्र घोष आणि संपादनात अरूणा देसाई, व्ही. पी.गाडगीळ, रमेश अहलुवालिया इ. उल्लेखनीय आहेत.

वाटवे, बापू शहाणे, नर्मदा