सुलतानपुरी

सुलतानपुरी मजरुह : (१ ऑक्टोबर १९१९–२४ मे २०००). लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतकार, उर्दू शायर व दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी. मूळ नाव असर्‌र हसन खान. मजरुह हे टोपणनाव. जन्म सुलतानपूर (उ. प्र.) येथे. त्यांचे वडील पोलीस अधिकारी होते. मजरुह यांना सुरुवातीला पारंपरिक मद्रसांतून धार्मिक शिक्षण देण्यात आले. अरबी, फार्सी, उर्दू या भाषांचे पारंपरिक शिक्षण घेऊन त्यांनी त्यांवर प्रभुत्व मिळविले. हिंदी व इंग्रजी भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. त्यानंतर त्यांनी लखनौ येथील युनानी महाविद्यालयात युनानी वैद्यकाचे शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी हकीम म्हणून वैद्यक व्यवसाय सुरु केला व त्याच वेळी मुशायऱ्यामधून ते आपल्या गझला सादर करु लागले. त्यांना उर्दू शायरीत व गीतलेखनातच खरे स्वारस्य होते. त्यामुळे वैद्यक व्यवसाय सोडून त्यांनी पूर्ण वेळ गीतलेखनाला वाहून घेतले. १९४५ मध्ये ते मुशायऱ्यात भाग घेण्यासाठी मुंबईला आले व पुढे मुंबईमध्येच स्थायिक झाले. ए. आर्. कारदार निर्मित शाहजहान (१९४६) या चित्रपटासाठी त्यांनी प्रथमतः गीतलेखन केले, या चित्रपटाला नौशाद यांनी संगीत दिले होते. पुढील पन्नास वर्षांत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांसाठी हजारो गीते लिहिली आणि त्या काळातील आघाडीच्या नामवंत संगीत दिग्दर्शकांनी त्यांची गीते स्वरबद्घ केली. भारतीय चित्रपटसृष्टीत १९५० च्या दशकात व १९६० च्या पूर्वार्धात मजरुह हे आघाडीचे प्रमुख गीतकार होते व त्या काळात गाजलेल्या अनेक चित्रपटांच्या सांगीतिक यशात त्यांचा मोलाचा वाटा होता. शाहजहान नंतर मेहंदी, अंदाज (१९४९), आरजू या चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली मात्र त्यांचे खरे सूर जुळले, ते चित्रपटनिर्माता-दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्याशी. त्यांच्या पेइंग गेस्ट या चित्रपटाची गीते मजरुह यांनी प्रथमतः लिहिली आणि नंतरच्या काळात त्यांच्या अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी गीते लिहून रसिकांच्या हृदयात स्थान मिळविले. उदा., फिर वही दिल लाया हूँ, तिसरी मंजिल, बहारोंके सपने, प्यार का मौसम, कारवाँ, यादों की बारात, हम किसीसे कम नही, कयामत से कयामत तक, जो जीता वही सिकंदर अशा अनेक चित्रपटांतील मजरुह यांची गीते विलक्षण लोकप्रिय झाली. दोस्ती, सीआय्‌डी, आरपार, अभिमान, पाकिजा इ. इतर चित्रपटांतील त्यांची गीतेही रसिकप्रिय ठरली. विशेषतः ‘जलते है जिसके लिये, तेरी आँखो के दिये ’(चित्रपट – सुजाता, गायक – तलत मेहमूद ) ‘ए फुलों की रानी, बहारोंकी मलिका ’ (चित्रपट – आरजू, गायक –महमंद रफी) ‘इक दिन बिक जायेगा माटी के मोल’ (चित्रपट –धरम-करम, गायक – मुकेश) यांसारख्या त्यांच्या अनेक गीतांनी लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले. त्यांनी अनेक उत्कृष्ट गझला लिहून हिंदी चित्रपटांत गझल गायकी लोकप्रिय केली. प्रणयभावना, राष्ट्रभक्ती, निसर्गसौंदर्य, कौटुंबिक जिव्हाळा अशा अनेकविध विषयांवर त्यांनी उत्तमोत्तम गजला लिहिल्या. जिगर मुरादाबादी, मोइन हसन जझबी, फैज अहमद फैज अशा प्रागतिक विचारसरणीच्या लेखकांच्या प्रत्यक्ष सहवासामुळे ते डाव्या मार्क्सवादी विचारांकडे झुकले. त्यांच्या कट्टर डाव्या विचारांमुळे व प्रस्थापित विरोधी बंडखोर काव्यामुळे त्यांना १९४९ मध्ये दोन वर्षांसाठी तुरुंगवासही घडला. या विचारसरणीचे पडसाद त्यांच्या काव्यातही प्रखरपणे उमटलेले दिसतात.

उर्दू काव्यक्षेत्रात मजरुह यांना गझलकार म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात विपुल गीते व कविता लिहिल्या मात्र १९४५ पासून गझल लेखनावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी लिहिलेल्या गझलांचा संग्रह उर्दू गझल या शीर्षकाने १९५३ मध्ये प्रकाशित झाला. पुढे त्यात वेळोवेळी नव्या गझलांची भर घालून त्याच्या अनेक आवृत्त्या काढण्यात आल्या. गझल या रचनाप्रकाराचा पारंपरिक, सांकेतिक बाज व अभिजात बहुढंगी समृद्घ वारसा त्यांनी आपल्या गझलांतून जोपासला आणि त्याच वेळी त्यांच्या आशयाची व्याप्ती व अभिव्यक्तीचे सामर्थ्य वाढविले. गझल या पारंपरिक प्रकाराला त्यांनी नवी दिशा दिली व मार्क्सवादी विचार सूचकतेने या रचनाप्रकारातून व्यक्त केले. मानवी प्रतिष्ठेचे भान व जग बदलण्याचा विश्वास त्यांनी गझलरचनेतून व्यक्त केला. १९४५ पासून प्रागतिक लेखक चळवळीलाही त्यांनी भरीव पाठिंबा दिला.

मजरुह यांना दोस्ती या चित्रपटातील ‘चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे’ या गीतासाठी फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पारितोषिक मिळाले (१९६५), तसेच एकूण कारकीर्दीसाठी ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार’ हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला (१९९३).

मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

इनामदार, श्री. दे.