सुलोचना

सुलोचना : (३० जुलै १९२९– ). मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्घ अभिनेत्री. जन्म खडकलाट (कोल्हापूर जिल्हा) येथे. त्यांचे पाळण्यातील नाव रंगू. आईचे नाव तानीबाई आणि वडिलांचे नाव शंकरराव दिवाण होते. त्यांचे बालपण जन्मगावी खडकलाट येथे व्यतीत झाले. फौजदार असलेल्या शंकररावांनी सुलोचनांना लहानपणापासून स्वातंत्र्य देऊन त्यांच्या आवडी-निवडी जोपासल्या. गावातील तंबूमध्ये दाखविले जाणारे बहुतांश चित्रपट त्यांनी पाहिले. अभिनयाची आवड याच काळात त्यांच्या मनात रुजली. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईवडील निवर्तले व नंतर त्यांचा प्रतिपाळ त्यांच्या मावशी बनुबाई लाटकर यांनी केला. मा. विनायक यांनी आपल्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या संस्थेत सुलोचनांना प्रारंभीच्या काळात ‘ज्यूनियर आर्टिस्ट’ म्हणून नोकरीस घेतले (१९४३). प्रफुल्लच्याच चिमुकला संसार (१९४३) या चित्रपटात सुलोचनांनी वयाच्या चौदाव्या वर्षी पहिली छोटीशी भूमिका केली. त्यांची भाषा सुरुवातीच्या काळात ग्रामीण बाज असलेली, धेडगुजरी वळणाची होती. त्यामुळे त्यांना टीका सहन करावी लागली. याच सुमारास त्यांचा परिचय लता मंगेशकर यांच्याशी झाला व त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.

दरम्यानच्या काळात सुलोचनाबाईंचा परिचय कोल्हापूरमधील प्रभाकर स्टुडिओचे सर्वेसर्वा असलेले भालजी पेंढारकर यांच्याशी झाला. भालजींनीच त्यांचे विशाल, भावपूर्ण डोळे पाहून त्यांचे नामकरण ‘सुलोचना’ असे केले व हेच नाव पुढे चित्रपटसृष्टीत रुढ झाले. दिग्दर्शक भालजी पेंढारकरांना गुरुस्थानी मानून त्यांनी त्यांच्याकडे अभिनयाचे धडे घेतले. चित्रीकरणासाठी पुण्यात आल्यावर चित्रीकरणाव्यतिरिक्त उरलेल्या फुरसतीच्या वेळात त्यांनी भरपूर वाचन केले. नागरी भाषा आत्मसात करुन घेण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच उच्चारशुद्घीसाठी संस्कृत श्लोकांचे पठणही त्यांनी केले.

भालजी पेंढारकरांच्या कडक शिस्तीखाली सुलोचनाबाईंच्या अभिनयाची जडणघडण झाली. १९४९ च्या सुमारास प्रदर्शित झालेल्या भालजींच्या मीठभाकरजिवाचा सखा या चित्रपटांतील सुलोचनांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. वहिनीच्या बांगड्या या चित्रपटातील त्यांची अविस्मरणीय भूमिका खूपच गाजली. त्यांची रुपेरी पडद्यावर सात्त्विक, सोज्वळ, वात्सल्याची व मांगल्याची मूर्ती अशी प्रतिमा निर्माण झाली व त्यामुळे त्यांच्या अभिनय-कारकीर्दीला नवे वळण मिळाले. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी या मराठीत गाजलेल्या चित्रपटावरुन हिंदीतील औरत ये तेरी कहानी या चित्रपटासाठीही त्यांचीच निवड केली गेली. हिंदी भाषेवर त्यांनी परिश्रमपूर्वक प्रभुत्व मिळविले.

त्यांना उपजत लाभलेले सोज्वळ सौंदर्य आणि अतिशय भावदर्शी चेहरा या जमेच्या बाबींमुळे त्यांना चरित्र अभिनेत्रीच्या अप्रतिम भूमिका सादर करण्याची संधी मिळाली. प्रेमळ सोशीक आई, सालस बहीण, समजूतदार वहिनी या त्यांनी सादर केलेल्या व्यक्तिरेखा कसदार अभिनयासाठी वाखाणण्यात आल्या. शालीनता, सात्त्विकता व भूमिकेशी समरस होण्याची वृत्ती अपार कष्ट करण्याची मानसिकता, अपयशाला सामोरे जाण्याचे धैर्य या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटसृष्टीत अजरामर झाल्या आहेत. उत्तम साहित्यकृतींचे वाचन अभिनय समृद्घ होण्यासाठी मोलाचे ठरते, असा त्यांचा स्वानुभव होता.

सुलोचनाबाईंनी सु. २५० हून अधिक मराठी चित्रपटांतून विविध व्यक्तिरेखा असलेल्या भूमिका सादर केल्या. मीठभाकर, साधी माणसं, बाळा जो जो रे, दूध भात, मराठा तितुका मेळवावा (जिजाबाईंची भूमिका), मोलकरीण, एकटी, वहिनीच्या बांगड्या, वऱ्हाडी आणि वाजंत्री, प्रपंच अशा अनेक मराठी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत. मराठीतल्या निम्म्यापेक्षा अधिक चित्रपटांतून त्यांनी नायिकेची भूमिका केली तर उर्वरित चित्रपटांतून वहिनी, आई, सासू, अशा चरित्र-व्यक्तिरेखा साकारल्या.

सुलोचना यांनी जवळजवळ १५० हिंदी चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या. सुजाता (१९५९) या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षणीय ठरली. त्याखेरीज त्यांनी झुला, संघर्ष, नयी रोशनी, मेरा घर मेरे बच्चे, जॉनी मेरा नाम, साजन, आयी मिलन की बेला, आदमी, प्रेमनगर इ. चित्रपटांतून विविध भूमिका केल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत चरित्र-अभिनेत्री म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. विशेषतः त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.

मराठी चित्रपटसृष्टीतील मौलिक योगदानासाठी त्यांना अनेकविध पुरस्कार व मानसन्मान लाभले : प्रपंच चित्रपटासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (१९६३), संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार (१९६८), महाराष्ट्र शासनाचा ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ (१९९७), केंद्र शासनातर्फे ‘पद्मश्री’ (१९९९), अ. भा. मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘चित्रभूषण’ पुरस्कार (२००३), महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ (२०१०) इत्यादी. सु. सहा दशके मराठी जनमानसावर प्रभाव गाजविणाऱ्या या अभिनेत्रीचे मराठी चित्रपटसृष्टीतील स्थान उत्तुंग व अढळ आहे.

इनामदार, श्री. दे. वाड, विजया