राष्ट्रीय फिल्म संग्रहालय : (नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज् ऑफ इंडिया). महत्त्वाचे चित्रपट व चित्रपटकलेशी निगडित अशी पुस्तके, छायाचित्रे, भित्तिचित्रे यांसारखे संदर्भसाहित्य संग्रहित करणारी पुणे येथील प्रसिद्ध संस्था. भारत सरकारतर्फे फेब्रुवारी १९६४ मध्ये हे संग्रहालय पुण्याच्या ‘फिल्म इन्स्टिट्यूट’ मध्ये सुरू करण्यात आले. पुढे १९६७ साली या संग्रहालयाकरिता स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आले आणि फिल्म इन्स्टिट्यूटपासून ते अलग करण्यात आले. १९५३ सालापासून भारत सरकारने निरनिराळ्या भारतीय भाषांतील उत्तम चित्रपटांना प्रतिवर्षी पुरस्कार देण्याची योजना सुरू केली. १९५५ सालापासून पुरस्कारविजेत्या चित्रपटांची एक प्रत शासनाकडे पाठविण्याची अट जाहीर करण्यात आली. साहजिकच माहिती आणि प्रसारण मंत्रालयात अनेक चित्रपट जमा होऊ लागले. इतर देशांतूनही लहानमोठे अनुबोधपट येऊ लागले. अशा छोट्या मोठ्या चित्रपटांच्या प्रती ठेवणे आवश्यक झाल्यामुळे १९६१ साली सरकारने फिल्म संग्रहालय स्थापण्याचे ठरविले आणि १९६४च्या फेब्रुवारी महिन्यात पुणे येथे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय सुरू झाले.
देशी−परदेशी उत्तम दर्जेदार चित्रपट व संदर्भसामग्री यांचा संग्रह करून चित्रपट-अभ्यासकांना त्याचा फायदा उपलब्ध करून देणे, हा या संग्रहालयाचा मुख्य उद्देश आहे. त्याकरिता या संग्रहालयाने काही आंतरराष्ट्रीय चित्रपटसंस्था किंवा संघटना यांचे सभासदत्व घेतले असून त्यामुळे इतर देशांबरोबर चित्रपटांची देवाणघेवाण सुरू झालेली आहे. सुरुवातीच्या काळात शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत फारच तुटपुंजी होती. त्यामुळे चित्रपटसंग्रहाला पुरेसा वेग आला नाही. भारतीय मूकपटही तोपर्यंत काळाच्या पडद्याआड गेले होते. त्यामुळे मूकपटांचा संग्रह करण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. सुदैवाने दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट व इतर काही मूकपटांतील थोडे भाग संग्रहालयाकडे योगायोगाने आले. नऊ-दहा मूकपटही पुढे उपलब्ध झाले. सुरुवातीला अभ्यवेक्षण मंडळासारख्या सरकारी संस्थांकडून चित्रपट मिळवावे लागत. हळूहळू जाणकार निर्माते व वितरक आपले चित्रपट संग्रहालयाकडे पाठवू लागले. संग्रहालयाकडे १०,६५५ देशी व विदेशी चित्रपट १६,२१४ चित्रपटांवरील पुस्तके आणि २१४ च्या वर नियतकालिके, ६४,१७९ छायाचित्रे, १५,५२६ चित्रपटकथा, ३,६७६ चित्रपट−पुस्तिका, १,८१९ चित्रपटसंगीताच्या ध्वनिमुद्रिका, ५,३८० भित्तिचित्रे, चित्रपटविषयक २८,४५५ कात्रणे पुस्तपत्रे (पॅम्फलेट्स) व मोडपत्रके (फोल्डर्स) ६, १५६ ध्वनिफिती ४७, सूक्ष्मपट १,८५१, सरक-चित्रपट्टया (स्लाईड्स) १,२२९ इ. साहित्य जमा झाले आहे. (१९८७) व त्यात सतत वाढ होत आहे. यामुळे देशी आणि विदेशी चित्रपट-अभ्यासक वाढत्या प्रमाणात संग्रहालयाचा फायदा घेत आहेत. संग्रहालयातर्फे निवडक संशोधकांना शिष्यवृत्त्याही देण्यात येतात दरवर्षी भारतीय चित्रपटांची वर्णनसूची (फिल्मोग्राफी) तयार करण्यात येते. भारत सरकार, राज्य सरकारे, दूरदर्शन यांच्याकडे गरजेप्रमाणे जुने, दुर्मिळ चित्रपट पाठविण्यात येतात. गुरुदत्त, बिमल रॉय, दामले−फत्तेलाल अशा नामवंत कलाकारांवर छोट्या पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. चित्रपट-रसग्रहणाचे अभ्यासक्रमही घेण्यात येतात. संग्रहालयाच्या पुणे, कलकत्ता व बंगलोर येथील शाखांना आणि अभिलेखागाराशी संलग्न असाणाऱ्या चित्रपट मंडळ्यांना (फिल्म सोसायटी) वितरण विभागातर्फे चित्रपट पुरविले जातात. आशिया खंडात सर्वांत मोठे असे हे संग्रहालय असून त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि महत्त्व प्राप्त झाले आहे.
धारप, भा. वि.