मादन, जमशेटजी फ्रामजी : (? १८५६–? १९२३). भारतीय चित्रपटव्यवसायाचे जनक हे नाव ज्यांना यथार्थपणे शोभेल अशी व्यक्ती. जन्म मुंबईत. भारतीय नाट्यचित्रपटसृष्टीच्या उदयकाळी यांनी जे चमत्कार घडवून आणले, त्याला तोड नाही. जमशेटजी मादन हा मूळ नाट्यप्रेमी माणूस. १८६८ मध्ये त्यांना गुरुस्थानी असणाऱ्या कुंवरजी नाझीर यांच्या एल्फिन्स्टन नाटक मंडळीत त्यांनी आपले पाऊल टाकले व या नाटक कंपनीबरोबर सर्व देशभर भ्रमंती केली. एक उत्तम नट आणि नाट्यव्यवसायाचा कसबी जाणकार म्हणून त्यांना देशभर प्रतिष्ठा लाभली. ही कंपनी डबघाईला येताच ती मादन यांनी स्वतःच्या ताब्यात घेऊन पुन्हा ऊर्जितावस्थेला आणली. पुढे आपले मुख्य कार्यालय मुंबईहून कलकत्याला हालविले. मादन यांनी कलकत्त्याला मैदानावर १९०२ मध्ये एक तंबूचे चित्रपटगृह सुरू केले. त्यांच्या नाटक कंपन्या व इतर व्यवसाय त्यावेळी चालूच होते. चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत चाललेला पाहून मादन यांनी यथावकाश आणखी काही तंबूची चित्रपटगृहे चालू केली. शेवटी १९०७ मध्ये हिंदुस्थानातील पहिलेच कायम स्वरूपाचे एल्फिन्स्टन नावाचे चित्रपटगृह कलकत्त्यात त्यांनी सुरू केले. पुढे त्यांनी हिंदुस्थानात अनेक ठिकाणी चित्रपटगृहे उभारली तसेच चालू चित्रपटगृहे ताब्यात घेतली. त्याखेरीज ब्रह्मदेश व श्रीलंका याही देशांत त्यांनी चित्रपटगृहे चालू केली. १९२० सालापर्यंत मादन थिएटर्सच्या व्यवस्थापनाखाली एकूण ५१ चित्रपटगृहे होती. कोल्हापूर किंवा मुंबईत तयार झालेले मूकपट सर्व देशांत दाखविता येत असत, ते याच मादन थिएटर्समुळे. त्या काळात बव्हंशी चित्रपट परदेशी असत त्यामुळे आपल्या वाढत्या चित्रपटगृहांबरोबर फिल्म आयात करण्याचे कामही मादन यांनी स्वतःच सुरू केले. उत्तमोत्तम पाश्चात्य चित्रपट दाखविता यावे म्हणून मादन यांनी पॅरिस, बर्लिन, लंडन व न्यूयॉर्क येथे माहीतगार प्रतिनिधी नेमले. पुढे तर ⇨ मेट्रो गोल्डविन मेयर, ⇨ युनायटेड आर्टिस्ट कॉर्पोरेशन व ⇨ पॅरामाऊंट पिक्चर्स कॉर्पोरेशन या प्रथम श्रेणीच्या अमेरिकन कंपन्यांची मुख्य एजन्सीही त्यांनी मिळविली. प्रदर्शन व वितरण याबरोबरच मादन यांनी एल्फिन्स्टन बायोस्कोप या नावाखाली १९०५ सालापासून छोटेछोटे प्रासंगिक चित्रपट काढून चित्रपटनिर्मितीही सुरू केली होती. १९१३ मध्ये ⇨ दादासाहेब फाळके यांनी काढलेल्या देशी चित्रपटांवरून स्फूर्ती घेऊन मादन यांनी आपल्या मादन थिएटर्सतर्फे १९१७ सालापासून देशी चित्रपटांची निर्मिती सुरू केली. मादन यांच्याजवळ व्यावसायिक द्रष्टेपण असल्यामुळेच भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रारंभ काळात त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे ठरले. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.
धारप, भा. वि.
“