नीईगाता: जपानच्या होन्शू बेटावरील नीईगाता प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या ४,०६,००० (१९७४). जपानी समुद्रावरील शिनानो नदीमुखाशी वसलेले हे बंदर, टोकिओच्या उत्तर वायव्येस सु. २५७ किमी.वर आहे. वार्षिक सरासरी तपमान आणि पर्जन्य अनुक्रमे १२·८० से. व १८५ सेंमी. आहे. होन्शूच्या वायव्य किनाऱ्यावरील हे मुख्य बंदर १८६९ मध्ये परदेशी व्यापारासाठी खुले झाले व तेव्हापासून येथून तेल, यंत्रे व कापडाची निर्यात तसेच कोळसा व कच्च्या मालाची आयात होते. गाळाचे संचयन व हिवाळी वारे यांमुळे बंदरातील वाहतुकीस अडथळे येतात. नीईगाताच्या परिसरातील नैसर्गिक ज्वलनवायूचा साठा व स्वस्त जलविद्युत्शक्तीचा पुरवठा यांमुळे येथे जहाजबांधणी, रसायने, तेलशुद्धीकरण, यंत्रे, धातुकाम, कापड, कागद इत्यादींचे कारखाने सुलभतेने विकास पावले. प्रख्यात व विस्तृत फुलबागा हेही नीईगाताचे महत्त्वाचे आकर्षण आहे.
ओक, द. ह.