निवर : (निवार हिं. हिज्जल सं. समुद्रफल, नीप इं. इंडियन ओक लॅ. बॅरिंग्टोनिया रॅसिमोजा कुल-लेसिथिडेसी). सु. पंधरा मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष भारतात पश्चिम किनाऱ्यावर कोकण ते त्रावणकोरपर्यंत शिवाय सुंदरबन, आसाम, अंदमान बेटे इ. प्रदेशांत बहुधा नद्यांच्या आणि जलप्रवाहांच्या काठाने आढळतो तसेच तो मलेशियात आणि पॅसिफिक बेटांतही आढळतो. ⇨ इंगळी आणि मुदिला या जातींचा समावेशही निवरच्या वंशात केला आहे.त्या वंशात सु. चाळीस जाती असून त्यांपैकी भारतात नऊ आढळतात. पूर्वी या वंशाचा समावेश ⇨मिर्टेसी कुलात आणि मिर्टेलीझ गणात (जंबुल कुलात व जंबुल गणात) करीत परंतु याच्या जातीतील पानांत द्विसंलग्न⇨ वाहक वृंद व तैलप्रपिंड (तेलाच्या ग्रंथी) नसतात या कारणांमुळे आणि इतर काही लक्षणांमुळे याचा समावेश हल्ली काहींनी ⇨लेसिथिडेसी कुलात (समुद्रफल कुलात), तर काहींनी बॅरिंग्टोनिएसी कुलात [→ मिर्टेलीझ] केलेला आहे. निवाराच्या खोडावर गर्द करड्या रंगाची साल असते. पाने साधी, इंगळीच्या पानांपेक्षा मोठी (१०−३० X ५−१० सेंमी.), पातळ, आयत-कुंतसम (भाल्यासारखी), काहीशी लांबट टोकाची, गुळगुळीत, किंचित दातेरी व एकाआड एक असून त्यांत प्रपिंड बिंदू (ग्रंथियुक्त ठिपके) नसतात. फांद्या काहीशा लोंबत्या व पाने त्यांच्या टोकांशी गर्दीने येतात. या वृक्षाला पावसाळ्यात, ३०−४० सेंमी. लांबीच्या लोंबत्या मंजरीवर सु. २·५−५ सेंमी. व्यासाची लालसर वा गुलाबी फुले येतात. त्या वेळी तो शोभिवंत दिसतो. म्हणून कोठे कोठे बागेत लावलेला आढळतो त्यापासून सावलीही मिळते. फुलात संदले २−४ दीर्घकाळ टिकणारी व पाकळ्या चार, गुलाबी किंवा लाल केसरदलेकिरमिजी, अनेक तळाशी जुळलेली व जननक्षम (कार्यक्षम) किंजपुट अध:स्थ [→फूल] आठळीफळ लंबगोल, चिवट सालीचे, तळाशी गोलसर, सु. ५−७ X ३−५ सेंमी. पण काहीसे चौकोनी (इंगळीपेक्षा कमी व लहान), टोकास निमुळते व टोक दीर्घस्थायी (दीर्घकाल टिकणाऱ्या) संर्वताने व्यापलेले. बी एकच, २·५ सेंमी. लांब व पिठूळ. बियांत ३% सॅपोनीन व फळात बॅरिंग्टोनीन हे स्फटिकी सॅफोनीनही असते.
पूर्व मलेशियातील लोक कोवळी पाने कच्ची किंवा शिजवून खातात तसेच आदिवासी लोक बियांतील पिठूळ पदार्थही खातात. फळ कफोत्सारक (कफ काढून टाकणारे) आणि दमा व अतिसारावरगुणकारी असते. फळातील मगज (गर) दुधातून कावीळ व इतर पित्त विकारांवर देतात. साल, मूळ, कुटलेली फळे व बिया मत्स्यविष म्हणून वापरतात. खोडावरील करड्या सालीत १८% टॅनीन असते तिचा अर्क कृमिनाशकअसून फिलिपीन्समध्ये तो रानडुकरे मारण्यास वापरतात फळे, मुळे व बिया यांचाही औषधी उपयोग करतात. मूळ शीतक (थंडावा देणारे) आणि रेचक असते. बियांतील तेल दिव्याकरिता वापरतात. या वृक्षाचे लाकूड नरम व पांढरट असून ते जळणाकरिता वापरतात. सालीचा अल्कोहॉलातील वा गरम पाण्यात काढलेला अर्क लिंबावरच्या माव्यावर (किडीवर) मारक ठरतो यात सालीचे प्रमाण २−२·५% असलेले पुरते. बहुधा हा वृक्ष ओलसर जागी वाढतो परंतु समुद्रकिनाऱ्यावरच्या दलदलीत नसतो ‘नीप’ या नावाने पाणिनी यांच्या अष्टाध्यायीत उपयुक्त वृक्ष या सदरात व महाभारतातही याचा उल्लेख आला आहे. बृहत्संहितेत विहिरीच्या कडेला हा वृक्ष लावावा असे सांगितले आहे. चरकसंहितेत फलवर्गात नीपाचा अंतर्भाव अनेक फलवृंक्षात (उदा., खजूर, नारळ, बोर, बेल इ.) केलेला आढळतो तसाच सुश्रुतसंहितेतही याचा उल्लेख आढळतो.
पहा :लेसिथिडेसी.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol, I, New Delhi, 1948.
2. Talbot, W. A. The Forest Flora of Bombay and Sind, Poona, 1909.
दोंदे, वि. प. परांडेकर, शं. आ.
“