नामिबिया : नैर्ऋत्य आफ्रिका या नावाने पूर्वी परिचित असणाऱ्या प्रदेशाचे आधुनिक नाव. आफ्रिकाखंडाच्या पश्चिम किनारपट्टीवरील द. आफ्रिका प्रजासत्ताकाच्या आधिपत्याखालील एक प्रदेश (महादेशीय प्रदेश). अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याला लागून १७° ते२९° द. व १२° ते २५° पू.यांदरम्यान तो पसरला आहे. क्षेत्रफळ (वॉल्व्हिस बे हा भाग धरून) ८,२४,२६९ चौ. किमी. लोकसंख्या ८,५२,००० (१९७४). याच्या उत्तरेस कुनेने आणि ओकोव्हँगो या नद्या वाहतात, त्यांच्या पलीकडे अंगोला असून उत्तर सीमेशी संलग्न काप्रीव्ही स्ट्रिप हा भूपट्टा थेट ४८० किमी. पूर्वेस जाऊन झँबियाच्या सीमेला भिडतो. दक्षिणेस ऑरेंज नदी असून तिच्या पलीकडे द. आफ्रिका प्रजासत्ताकाची सीमा सुरू होते व पूर्वेस बोट्स्वाना आणि आग्नेयीस द. आफ्रिका प्रजासत्ताकाचा काही भाग असून पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे. उत्तरेकडील जास्तीत जास्त रुंदी ९६० किमी. तर दक्षिणेकडील रुंदी ३५२ किमी.आहे. व्हिंटहुक (लोकसंख्या ७६,०००–१९७४) ही या प्रदेशाची राजधानी असून, उन्हाळ्यातील राजधानी स्व्हाकॉप्मन्ट या ठिकाणी असते. वॉल्व्हिस बे व ल्यूडरिट्स ही प्रसिद्ध व कार्यक्षम बंदरे असून वॉल्व्हिस बे हे बंदर द. आफ्रिका प्रजासत्ताकाचा परावृत्त प्रदेश आहे.
भूवर्णन : नामिबिया भौगोलिक दृष्ट्या दोन वालुकामय प्रदेशांतील एक डोंगराळ भूपट्टाआहे.भूरचनेच्या दृष्टीने त्याचे तीन नैसर्गिक विभाग पडतात:नामिब किनारपट्टी, मध्यवर्ती पठारभूमी आणि उत्तर व पूर्व भागांतील कालाहारी वाळवंटी पट्टा.नामिब पट्टा वालुकामय असून पूर्वेस त्याची उंचीसरासरी १,००० ते १,२०० मी. पर्यंत वाढत जाते. ही एक लांब कडारेखा (भृगू) आहे. तिच्या उत्तरेला डोंगराळ पट्टीत ग्रॅनाइटचे प्रचंड खडक आढळतात. ब्रांटबेर्ख (२,५७८ मी.) हे या प्रदेशातील सर्वोच्चशिखर असून दमारलँड या शंक्वाकृती डोंगराळ भागातून चौफेरे नद्या वाहतात. त्यामुळे अरीय जल निस्सारण प्ररूप तयार झाले आहे. या प्रदेशात कुनेने, ओकोव्हँगो व ऑरेंज या नाव घेण्यासारख्या तीनच महत्त्वाच्या नद्या असून त्या सीमेवर वाहत असल्याने त्यांचा या प्रदेशाला म्हणावा तसा फारसा उपयोग होत नाही. साहजिकच पाण्याची टंचाई नेहमीच जाणवते, ती विहिरी व ईटोशपॅनसारख्या सरोवरांनी काही अंशी भागली जाते.
हवामान : हा प्रदेश उष्णकटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्यात येत असल्याने येथील हवामान उष्ण व कोरडे असते व आर्द्रता कमी आढळते. सर्वसाधारणतः मध्य भागात सरासरी तापमान १८·९° ते २२·२° से. असून किनारपट्टीवर ते १५·६° से. असते. उन्हाळ्यात इतरत्र ते ३७·८° से. पर्यंत वाढते, तर नामिब किनारपट्टी व दक्षिणेस ४८·९° से. पर्यंत चढते. पर्जन्यमानाचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते. पास सरासरी २५ सेंमी. पासून ६२ सेंमी. पर्यंत पडतो. डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत पाऊस पडतो. ईशान्य भागात नियमितपणे पाऊस असतो. इतर भागात त्याची अनिश्चितता आढळते. पश्चिमेकडे वाळवंटात खुरट्या वनस्पती, गवत, झुडुपे, ऑकेशिया व बोसिया गटांतील वनस्पती आढळतात.उत्तरेकडे आर्द्र प्रदेशात वृक्षांचे प्रमाण जास्त आहे, पण त्यात काटेरीवृक्षच अधिक आहेत. तथापि साग, मॉहॉगनी, मरूला, रॅफीरबूम, पाम, बुशविलो या वृक्षांच्या जाती आढळतात. या जंगलांतून अनेक हिंस्त्र प्राणी आढळतात. त्यांत सिंह, चित्ते, रानरेडे, हत्ती, गेंडे, जिराफ, झेब्रे यांचे प्रमाण जास्त आहे. ईटोश राष्ट्रीय उद्यान हे शिकारीसाठी जगप्रसिद्ध आहे.
इतिहास : नामिबियाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. काउं द्योगू या पोर्तुगीज प्रवाशाने १४८६ मध्ये नैर्ऋत्य आफ्रिकेचा शोध लावला, तरी प्रत्यक्षात तेथे सतराव्या शतकात वसाहत झाली. यावेळी लंडनमधील मिशनरी सोसायटीच्या काही पाद्र्यांनी धर्मप्रसारार्थ तेथे वसाहत केली. त्यांपैकी काही जर्मन होते व ते १८४० मध्ये तेथे स्थायिक झाले. १८८४ मध्ये जर्मनीने तो सुरक्षित प्रदेश म्हणून आपल्या अखत्यारीखाली घेतला आणि हळूहळू प्रदेशविस्तार केला. हॉटेंटॉट लोकांचा पराभव करून १८९२ मध्ये जर्मनीने रीतसर तेथे वसाहत स्थापन केली. पहिल्या महायुद्धाच्या सुमारास द. आफ्रिकेने तेथील जर्मन लोकांचा पराभव करून तो प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला (९ जुलै १९१५). १९२० मध्ये राष्ट्रसंघाच्या महादेशाने तेथील प्रशासकीय व्यवस्था द. आफ्रिकेकडे सुपूर्त करण्यात आली. द. आफ्रिकेने तेथे प्रशासक नेमून एक कार्यकारी समिती स्थापन केली. दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ ही संघटना संपुष्टात येऊन संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली (१९४५). त्या वेळी द. आफ्रिकेच्या नामिबियाविषयीच्या धोरणावर अनेक वेळा आमसभेत टीका होऊ लागली. द. आफ्रिकेने नामिबियातील गोरेतरांना वाईट वर्तणूक दिली असून त्यांच्यावर अत्याचार होतात, असा एकूण टीकेचा सूर होता. तेव्हा संयुक्त राष्ट्रांनी द. आफ्रिकेस वारंवार सूचना दिल्या. तथापि त्यांचा त्याच्या एकूण धोरणावर काही परिणाम झाला नाही, मात्र गोऱ्यांची एक विधिसभा (विधानसभा) नामिबियात अस्तित्वात आली. १९६६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने द. आफ्रिकेचा कारभार संपुष्टात आणण्याविषयीचा ठराव बहुमताने संमत केला. त्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ जुलै १९६६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या बाजूने निवाडा दिला आणि संयुक्त राष्ट्रांनी तेथील प्रशासकीय कारभार ताब्यात घ्यावा असे ठरले (२७ ऑक्टोबर १९६६). त्याकरिता ११ सदस्यांचे एक मंडळही नेमण्यात आले. नैर्ऋत्य आफ्रिका याऐवजी नामिबिया हे नाव त्यास देण्यात आले (१९६८). १९७१ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी द. आफ्रिकेचे वर्चस्व अवैध ठरविले. तथापि द. आफ्रिकेने आपली हट्टी भूमिका सोडली नाही. तेव्हा हा प्रश्न सुरक्षा समितीकडे सुपूर्त करण्यात आला. डॉ. कुर्ट वॉल्डहाइम यांनी नामिबियास भेट देऊन तेथील सर्व परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली (१९७२) आणि नंतर द. आफ्रिकेबरोबरचे सर्व राजनैतिक संबंध तोडले (१९७३) आणि स्वातंत्र्यासाठी तसेच गोरेतरांच्या भवितव्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या साउथ वेस्ट आफ्रिकन पीपल्स ऑर्गनायझेशन (स्वापो) या राजकीय संघटनेस मान्यता दिली. या संघटनेची पीपल्स लिबरेशन आर्मी ऑफ नामिबिया (प्लॅन) ही लष्करी संस्था द. आफ्रिका प्रजासत्ताकाच्या गोऱ्या सैन्याबरोबर गनिमी लढा देत असून द. आफ्रिका प्रजासत्ताकास तिने जेरीस आणले आहे. त्यामुळे टर्नहॉल परिषदेने संविधान बनविण्यासाठी एक समिती स्थापन केली (१९७६). संविधानाचा मसुदा तयार होताच तेथे हंगामी सरकारची स्थापना करू असे आश्वासन द. आफ्रिका प्रजासत्ताकाने दिले आहे. संविधान मसुदा तयार करण्यासाठी नियोजित केलेल्या टर्नहॉल परिषदेने ३१ डिसेंबर १९७८ ही नामिबियाच्या स्वातंत्र्याची लक्ष्य तारीख मुक्रर केली. तथापि स्वापो, संयुक्त राष्ट्रे ओएयू (ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी) यांनी या सूचना फेटाळल्या. एवढेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्रे व ओएयू यांनी तेथील गनिमी युद्धास पाठिंबा दर्शविला आणि स्वापोच्या स्वातंत्र्यलढ्यास उत्तेजन दिले. तेव्हा टर्नहॉल परिषदेने स्वातंत्र्यापूर्वी तिहेरी पद्धतीचे शासन देण्यात येईल अशी जानेवारी १९७७ मध्ये घोषणा केली.
राजकीय स्थिती : द.आफ्रिका नामिबियास प्रथमपासून आपला एक प्रांत (पाचवा प्रांत) समजत असून द. आफ्रिका संघाच्या १९२५ च्या ४२ युनियन ॲक्टअनुसारे व नैर्ऋत्य आफ्रिका अफेअर्स संविधान दुरुस्ती १९४९ प्रमाणे नामिबियास संविधान व १८ सदस्यांची एकसदनी विधानसभा देण्यात आली.यासभेचे सर्व सभासद गोरे असून गोरेतरांना मतदानाचा हक्क नव्हता. नामिबियातून द. आफ्रिका प्रजासत्ताकाच्या संसदेवर सहा सभासद निवडण्याचा अधिकार तसेच सीनेटवर ४ सभासद निवडण्याचा हक्क प्राप्त झाला.यांपैकी दोन सभासद नामिबिया विधानसभेने निवडावयाचे व दोन अध्यक्षांच्या नामनिर्देशाने निवडले जातात. विधानसभेस स्थानिक कारभारास आवश्यकते कायदे करण्याचा अधिकार असून संरक्षण, सीमाशुल्क, रेल्वे, बंदरे, नागरी वैमानिकी इत्यादींबाबत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. नामिबियाचे प्रशासन एका खास प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत चालते. त्याची नेमणूक गव्हर्नर जनरल करतो आणि तो प्रत्येक बाबतीत त्यास जबाबदार असतो. विधानसभेस त्यास काढून टाकण्याचा अधिकार नाही. प्रशासनाच्या सोयीसाठी नामिबियाचे एकूण २१ जिल्ह्यांतविभाजन केले असून प्रत्येक जिल्ह्यावर एक स्वतंत्र दंडाधिकारी नेमला आहे.
नामिबियाच्या संरक्षणासाठी द. आफ्रिका प्रजासत्ताकानेसु.४०,००० सैनिकांच्या लष्करी तुकड्या सर्व प्रदेशभर विखुरलेल्या असून त्यांचा ३/४ खर्च नामिबियातील स्थूल उत्पन्नामधून केला जातो.त्यांना नामिबियाचा स्वातंत्र्य लढा सुरू झाल्यापासून पीपल्स लिबरेशन आर्मी ऑफ नामिबिया यांच्या गनिमी तुकड्यांबरोबर सतत लढावे लागते.
आर्थिक स्थिती : नामिबिया हा मुख्यतःकृषिप्रधान प्रदेश आहे तथापि पाण्याचा तुटवडा आणि आधुनिक शेतीची अवजारे यांचा अभाव यांमुळे शेतीतून फक्त ४०% उत्पन्न मिळते.साहजिकच स्थूलराष्ट्रीय उत्पन्न खाणकाम, मच्छीमारी व पशुपालन या तीन उद्योगधंद्यांवर अवलंबून असून जवळजवळ ६०%उत्पन्न यांतून मिळते. यामध्ये खाणकामातून ४५% उत्पन्न मिळत असून तांबे, जस्त, शिसे, व्हॅनेडियम हे धातू आणि हिरे व युरेनियम यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. रत्नांच्या उत्पादनाच्या बाबतीत हा प्रदेश जगात प्रसिद्ध असून रॉसिंग येथील युरेनियमच्या खाणीचा विकास द. आफ्रिका औद्योगिक निगम व रिओ टिंटो झिंक ही ब्रिटिश कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी चालू आहे. खनिज उद्योगाखालोखाल मच्छीमारी व पशुपालन हे उद्योगअसून लॉब्स्टर, पिल्चर्ड वगैरे मासे व लोकरीची कातडी तसेच मांस प्रक्रिया करून निर्यात करण्यात येतात. नामिबियातील बहुतेक शेती आफ्रिकन जमाती करतात तर सर्व उद्योगधंदे गोऱ्या लोकांच्या हातात असून द. आफ्रिकेच्या वर्चस्वाखाली व अर्थसाहाय्याने चालले आहेत. केवळ खनिजद्रव्यांच्या विक्रीपासून १९७३ मध्ये सु. २३० दशलक्ष रँड एवढा महसूल द. आफ्रिकेस मिळाला.ओव्हॅम्बोलँडसिंचन प्रकल्प व कुनेने विद्युत् प्रकल्प या दोन प्रकल्पांमुळे नामिबियाच्या औद्योगिक विकासात भर पडणार असून शेतीस पुरेसा पाणीपुरवठा होईल व नजिकच्या भविष्यकाळात नामिबिया अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनेल अशी अपेक्षा आहे.
दळणवळणाच्या मार्गांची म्हणावी तशी अजूनही फारशी वाढ येथे झालेली नाही आणि जे थोडे रस्ते आढळतात, ते बहुतेक दक्षिण भागातील औद्योगिक शहरांना जोडणारे आहेत. द. आफ्रिका प्रजासत्ताकाने रस्त्यांची वाढ आणि सुधारणा करण्याकडे सध्या लक्ष पुरविले असून त्याकरिता कर्जेही दिली आहेत. १९५३ पर्यंत नामिबियात एक किमी. एवढा लांब डांबरी रस्ता नव्हता, पण १९६६ पर्यंत एकूण ३०,७२० किमी. कच्च्या रस्त्यांपैकी १,२८० किमी. लांबीच्या डांबरी सडका करण्यात आल्या. या रस्त्यांनी मुख्यतः व्हिंटहुक ते मध्य भागातील त्सूमेब ही शहरे जोडली असून दक्षिणेकडील कीटमान्सहूप, पश्चिमेकडील वॉल्व्हिस बे व स्व्हाकॉप्मन्ट ही शहरे जोडली आहेत. वाहतुकीचे बहुतेक मार्ग दक्षिणेकडील भागात जास्त प्रमाणात आढळतात. द. आफ्रिका ते व्हिंटहुक हा रेल्वेमार्ग प्रसिद्ध असून पश्चिम किनाऱ्यावरील वॉल्व्हिस बे व ल्यूडरिट्स या बंदरांना जोडला आहे. व्हिंटहुक येथील विमानतळ हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा आहे.
शिक्षण : द. आफ्रिका संघाने १९२१ मध्ये येथील शिक्षणयंत्रणा आपल्या अखत्यारीखाली आणली. येथे गोरे वा गोरेतर यांना शिक्षण सक्तीचे नाही. शाळांचे वांशिक भेदांनुसार वर्गीकरण केले असून गोरेतरांना गोऱ्यांच्या विद्यालयांत प्रवेश नाही व शैक्षणिक सवलतीही नव्हत्या.१९५९ मध्ये गोऱ्यांसाठी २३०,तर गोरेतरांसाठी ३० विद्यालये होती. शैक्षणिक क्षेत्रात विकास करण्याकरिता पंचवर्षीय योजनेत काही तरतुदी १९६४ मध्ये करण्यात आल्या आणि १९५३ चा बांटू शिक्षण कायदा ग्राह्य मानण्यात आला. त्यानुसार विशिष्ट जमातींना काही खास सवलती घ्याव्यात असे ठरले. गोरेतर जनतेत ६९% लोक निरक्षर होते (१९७३). द. आफ्रिकेने १९२२ ते १९७३ च्या दरम्यान जवळजवळ १७० स्वतंत्र चर्च विद्यालये बंद केली. अद्यापि एकही स्वतंत्र विद्यापीठ तेथे नाही.
लोक व समाजजीवन : नामिबियाच्या लोकांत गोऱ्या लोकांचे वर्चस्व असून त्यांपैकी ६७% लोक आफ्रिकान्स भाषा बोलतात, तर २३% जर्मन व १०% इंग्रजी भाषा बोलतात. स्थानिक लोकांत दोन प्रमुख भाषागट असून ते बांटू व खोसियन भाषासमूहांतील भाषा बोलतात. गोरेतरांमध्ये ओव्हॅम्बो, हेरेरो, बर्ग दमारा, बुशमन, हॉटेंटॉट वगैरे आदिम जमातींचा समावेश होतो. यांपैकी अनेक जमाती खाणकाम व उद्योगधंद्यांमध्ये मजुरीचे काम करतात. त्यांची प्रत्येकाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये वेगळी असून बहुतेक जडप्राणवादी व निसर्गपूजक आहेत. तथापि काहींनी अलीकडे ख्रिस्ती धर्माचा स्वीकारही केला आहे. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स. १·७ आहे. खेड्यांतील बहुतेक लोक झोपडपट्टीवजा घरांतून राहतात. यूरोपीयांच्या वसाहतींमुळे व उद्योगधंद्यांमुळे शहरे निर्माण झाली. ज्वारी, मका, गळिताची धान्ये, मासे व जनावरांचे मांस हे येथील लोकांचे प्रमुख खाद्यपदार्थ होत. शेती, पशुपालन, मच्छीमारी व खाणकाम हेच येथील प्रमुख व्यवसाय असून, शेती परंपरागत पद्धतीने करतात. इतर धंदे गोऱ्या लोकांनी आपल्या ताब्यात घेतले असून येथील मूळ रहिवासी मोलमजुरीची कामे करतात.
नामिबियात लहान-मोठी ३७ शहरे असून ती बहुतेक दक्षिणेकडे वसली आहेत.त्यांपैकी व्हिंटहुक हे प्रशासकीय राजधानीचे सर्वांत मोठे शहर आहे.उरलेल्या शहरांची लोकसंख्या व्हिंटहुकच्या निम्म्याहून कमी आहे. वॉल्व्हिस बे व ल्यूडरिट्स ही दोन बंदरे प्रसिद्ध असून वॉल्व्हिस बे हे नैसर्गिक बंदर आहे,तर ल्यूडरिट्स हे उथळ बंदर असून तेथे लहान बोटी येतात. त्सूमेब हे तांबे आणि शिसे यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.
संदर्भ : 1. Bridgman, Jon Clarke, D. E. German Africa: A Select Annotated Bibliography, Palo Alto, 1965.
2. Wellington, J. H. South-West Africa and Its Human Issues, New York, 1967.
तावडे, मो. द. देशपांडे, सु. र.
“