नाणा : (क. बिलिनंदी, आरळे इं. बेनटीक लॅ. लॅगर्स्टोमिया लँसेओलॅटा कुल-लिथ्रेसी). हा मोठा पानझडी वृक्ष महाराष्ट्र, कारवार येथील जंगलांत आणि पश्चिम घाटातील दाट जंगलांत सामान्यपणे आढळतो. याची उंची ९–१५ मी. व घेर २·५–३ मी. असतो. साल हिरवट किंवा पिवळट पांढरी गुळगुळीत व पातळ असते आणि तिचे लहान तुकडे आपोआप सोलले जातात. पाने साधी, संमुख (समोरासमोर), दीर्घवर्तुळाकृती-कुंतसम (भाल्यासाराखी), ६–१० X १.५–५ सेंमी., विट आणि खालच्या बाजूस पांढरट व लवदार असतात. संयुक्त परिमंजरीवर [→ पुष्पबंध] मार्च-एप्रिलमध्ये पांढरी, लहान फुले येतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लिथ्रेसी कुलात (मेंदी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. संवर्त पसरट व दीर्घस्थायी (सतत राहणारा) संदले सहा व बाहेर वळलेली असून प्रदले सहा व नखरयुक्त आणि केसरदल अनेक [→फूल]. बोंड लंबगोल व त्याच्या तळाशी संवर्त पेल्यासारखा वेढून राहतो. बिया लहान, अनेक व पंखयुक्त असतात.
नाण्याचे लाकूड चिवट, जड, मध्यम कठीण असून त्याला चांगली झिलई होते मात्र पुढे चिंबते व उघड्यावर फार टिकत नाही. इमारती, सजावटी सामान, वहाने, पूल, खांब, सिलिपाट (स्लिपर), तेलपिपे, कॉफीची खोकी, शेतीची अवजारे, आगगाडीचे डबे, मोटार व ट्रक यांचे वरचे सांगाडे, प्लायवुड तक्ते, आगपेट्या व आगकाड्या इ. हरएक प्रकारच्या सुतारकामास व जळणासही ते उपयुक्त असते. त्याला ‘बेनटीक’ असे व्यापारी नाव आहे. अभिवृद्धी (संवर्धन) निसर्गतः बियांनी होते. वाढ जलद असते. काही कवकांपासून (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींपासून) या झाडाला रोग जडतो वाळवीपासून ते पूर्णपणे सुरक्षित नसते. याच्या पानांपासून बनविलेले हिरवे खत सुपारीच्या बागेत वापरतात.
पहा : चिनाई मेंदी तामण.
कुलकर्णी, उ. के.
“