चाफा, सोन : (हीं. क., सं. चंपक हिं. चंपा क. चंपिगे, संपिगे गु. सोनचंपो सं. सुवर्णचंपक, हेमपुष्प इं. गोल्डन (यलो) चंपा लॅ. मायकेलिया चंपका कुल-मॅग्नोलिएसी). या सुपरिचित वृक्षाचे शास्त्रीय (लॅटीन) मायकेलिया हे वंशवाचक नाव फ्लॉरेन्टाईनमधील पी.ए. मायकेली (१६७९–१७३७) ह्या वनस्पतिविज्ञांच्या नावावरून घेतले असून चंपक ह्या भारतीय नावाशी ते जोडले आहे. संस्कृत वाङ्मयात चंपक या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यावरून सोनचाफा (याला पिवळा चाफा असेही म्हणतात) हा मूलतः भारतीय वृक्ष असावा, हे उघड आहे. बंगाली, तमिळ, तेलगू, मलायी, नेपाळी इ. भाषांतील नावे संस्कृत (चंपक) नावाची अपभ्रष्ट रूपे असावीत असे आढळते. सध्या तो वृक्ष पूर्व हिमालय (९३० मी. उंचीवर), नेपाळ, सिक्कीम, आसाम, ब्रह्मदेश, सह्याद्री व द. भारत ह्या प्रदेशांत आढळतो. तो धार्मिक व इतर दृष्ट्या महत्त्वाचा असल्याने भारतात सर्वत्र हिंदूच्या मंदिरांच्या आवारांत, सार्वजनिक उद्यानांत आणि बंगला बगीच्यांत शोभेकरिता लावला जातो. फुलांचा रंग व सुगंध आकर्षक असल्यामुळे रसिक जनांचा तो आवडता आहे. त्याला व्यापारी महत्त्वही येऊ लागले आहे. फुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] वर्गीकरणात चंपक कुलाला [⟶ मॅग्नोलिएसी] प्रारंभिक स्थान असल्याने सोनचाफा, कवठी चाफा इ. वनस्पतींची लक्षणे महत्त्वाची आहेत. मायकेलिया वंशातील चौदा जाती भारतात आढळतात.
सोनचाफा हा सदापर्णी व शोभिवंत वृक्ष ३०–४० मी.पर्यंत उंच वाढतो (सामान्यतः सु. १०–१५ मी.) याचा बुंधा मोठा, घेर ३.५ मी., साल करडी व जाड आणि माथा त्रिकोनी असतो. पाने साधी, चिवट, उपपर्णयुक्त, एकाआड एक, पोपटी लांब टोकाची व भाल्यासारखी असून त्यांच्या कडा तरंगित असतात. फुले मोठी, सच्छद, कक्षास्थ (पानांच्या बगलेत), सुवासिक, फिकट किंवा गर्द पिवळी अथवा नारिंगी छटेची (५–८ सेंमी. व्यासाची) व एकेकटी येतात ती द्विलिंगी असून परिदले सु. १५ व सुटी असतात केसरदले व किंजदले सुटी व अनेक, किंजदले फिरकीप्रमाणे अक्षावर चिकटलेली व किंजपुटात दोन किंवा अधिक बीजके असतात. [⟶ फूल]. घोसफळातील प्रत्येक लहान फळ पेटिका फळ (शुष्क व एका शिवणीवर पेटीसारखे उघडणारे) असते त्याच्या सालीवर अनेक बारीक फोड असून सर्व घोसफळ लांबट (५–१० सेमी.) गोलसर आणि पेटिका फळातील बिया (दोन किंवा अधिक) लालसर पिंगट असतात त्यांवर गुलाबी अध्यावरण (बीजावरणावर झालेली अधिक वाढ) असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे चंपक कुलात [⟶ मॅग्नोलिएसी] वर्णिल्याप्रमाणे. फुले सर्व वर्षभर थोडी थोडी येतात, परंतु मे-ऑक्टोबरमध्ये अधिक येतात.
उपयोग : या वृक्षाचे लाकूड नरम, हलके व टिकाऊ असून जहाज व विमानबांधणीत आणि खांब, फळ्या, सजावटी सामान, तक्ते, कापीव व कातीव काम, ढोलकी, चहाचे खोके, पेन्सिली, खेळणी, मणी इ. हरएक वस्तूकरिता वापरतात जळणासही ते चांगले असते. फुलांपासून मिळणारा रंग कापडउद्योगात कापड रंगविण्यास वापरतात. खोडाची साल स्तंभक (आतड्याचे आंकुचन करणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी), तापनाशक, कफोत्सारक (कफ काढून टाकणारी) व उत्तेजक असते. मूळ व त्याची साल रेचक असून दुधातून गळवांस लावतात ती आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी) असतात. खोडाच्या सालीत ०·३% अल्कलॉइडे व टॅनिने असतात. सुपारीबरोबर साल चघळतात दालचिनीत सालीची भेसळ करतात. काही प्रकारचे रेशमी किडे सोनचाफ्यावर वाढवितात. फुले व फळे दीपक, उत्तेजक, जंतुनाशक, पौष्टिक, मूत्रल, कडू व थंड असून अग्निमांद्यावर व मूत्रपिंडाच्या विकारांवर उपयुक्त असतात. फळे व बी पायांवर भेगा पडल्यास बाहेरून लावतात. फुलांचे तेल (चंपक तेल) नेत्रविकार, संधिवात, डोकेदुखी इत्यादींवर लावण्यास उपयुक्त असते. ते सुगंधी असल्याने अत्तरांत व सुगंधी तेलांत वापरतात. फुलांचे गजरे, हार व तुरे बनवितात.
पिवळा चाफा : (हीं. पीला चंपा क. बिली संपिगे इं. हिल चंपा लॅ. मायकेलिया निलगिरिका), सोनचाफ्याच्या वंशातील ही दुसरी लहान जाती निलगिरी, अन्नमलाई व पलनी टेकड्यांत (सु. १,५०० ते १,८०० मी. उंचीपर्यंत) आणि सह्याद्रीवर फार उंचीवरच्या प्रदेशांत आढळते. या जातीची झाडेही बागेत लावतात. या वृक्षाचे सोनचाफ्याशी बरेच साम्य आहे. याची पाने सोनचाफ्यापेक्षा लहान व फिकट रंगाची असून त्यांवर रेशमी लव असते. फुले पिवळट पांढरी, सायीच्या रंगाची व सोनचाफ्यापेक्षा थोडी मोठी असतात. फळे लांबट (७.५–१० सेंमी.) व बिया लाल असतात. लाकूड फार कठीण, जड व टिकाऊ असते. घरबांधणीकरिता व सजावटी सामानाकरिता वापरतात. साल व पाने ज्वरनाशक असून सालीत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल, जहाल राळ, टॅनीन व कडू द्रव्य असते. फुलांतील व सालीतील तेल सारखेच असते. मायकेलिया किसोपा या जातीची फुले पिवळी आणि मा. फिगोची पिंगट पिवळी असतात मायकेलियाच्या इतर जातींची फुले पांढरी व सुगंधी असून बहुतेकांचे लाकूड उपयुक्त असल्याचे आढळले आहे. या वंशातील जातींना आग सहन होत नाही.
लागवड, मशागत व उत्पादन : सर्द हवा व ओलसर खोल जमीन सोनचाफ्याला चांगली मानवते. हिमतुषार त्याला सहन होत नाहीत सौम्य प्रकाशात वाढ चांगली होते. पावसाळी व गरम हवेत त्याला फुले अधिक येतात आणि बी ऑगस्टअखेर पक्व होते. बियांची अंकुरणक्षमता कमी असते, परंतु बी पक्व होण्याची वेळ प्रत्यक्ष ते जमिनीत पेरण्यास गैरसोयीची असते म्हणून बी पन्हेरीत रुजवून १२–१५ महिन्यांनी रोपे तेथून काढून बाहेर लावतात. साधारण जून मुळांचे व खोडांचे तुकडे (कलमे) अथवा खुंट लावूनही नवीन लागवड काही ठिकाणी यशस्वी झाली आहे. झाड जमिनीजवळ कापल्यास उरलेल्या खुंटापासून नवीन धुमारे जलद फुटतात व वाढ चालू राहते. वर्षाला घेर सु. अडीच सेंमी. वाढतो.
मॅलॅगॅसी व रियून्यन बेटे येथे चंपक तेलाकरिता लहान प्रमाणात या वृक्षांची लागवड करतात. पेट्रोलियम ईथरचा वापर करून मिळविलेल्या अर्कातून (रियून्सनमध्ये ०·१६–०·२०% आणि ०·१३–०·१५% मॅलॅगॅसीत) पुढे ५०% तेल मिळते. भारतात चंपकफुलांपासून अत्तरे व सुगंधी केश-तेले बनवितात चंपक तेलही थोड्या प्रमाणात काढतात. त्याला आल्हादकारक सुगंध येतो तो काहीसा चहाच्या वा संत्र्यांच्या वासासारखा असतो. अत्तरांत वापरल्या जाणाऱ्या प्रमुख मौलिक पदार्थांत त्याची गणना होते. उत्कृष्ट प्रतीच्या फ्रेंच अत्तरांत त्याचा वापर केला जातो. पानांपासून ०·४% बाष्पनशील व तुळशीसारखा वास असलेले तेल काढतात जावामध्ये ते मोठ्या प्रमाणावर काढतात. बियांत ३२·२% चरबी व एक प्रकारची राळ आणि काही राळ-अम्ले असतात. चरबीत ३०% पामिटिक व ७०% ओलेइक अम्ले असतात ही चरबी औषधोपयोगी असते.
पहा : चाफा, कवठी.
संदर्भ : 1. CSIR, The Wealth of India, Vol. VI, New Delhi, 1962.
2. Randhawa, M. S. Flowering Plants, New Delhi, 1967.
पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.
“