ध्रुवीय घड्याळ : एकाच प्रतलात (पातळीत) कंप पावणाऱ्या म्हणजे ध्रुवित प्रकाशाचा वापर करून वेळ दर्शविणारे एक प्रकारचे घड्याळ. हे चार्ल्स व्हीट्स्टन (१८०२—७५) यांनी शोधून काढले. सूर्यापासून येणारा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातील सूक्ष्म कणांमुळे प्रकीर्णित होतो (विखुरला जातो) व ध्रुवित होतो. या वस्तुस्थितीवर या घड्याळाचे कार्य चालते. या घड्याळात एका टोकास निमुळती होत जाणारी किंवा शंकूच्या आकाराची नळी असते ही नळी बैठकीवर अशा प्रकारे बसविलेली असते की, ती फिरवून तिचा अक्ष पृथ्वीच्या अक्षाला समांतर करता येतो. ही नळी स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरविता येते. नळीच्या रुंद टोकाशी एक काचेची तबकडी बसविलेली असून तबकडीवर दिनमानाची वेळ वा तास दर्शविणाऱ्या खुणा केलेल्या असतात. या तबकडीलगतच एक दुसरी काचेची तबकडी असते. या दुसऱ्या तबकडीच्या मध्यभागी जिप्समाच्या सेलेनाइट नावाच्या पारदर्शक स्फटिकांच्या ताराकृती चकत्या चिकटवून बसविलेल्या असतात या चकत्यामुळे ध्रुवित प्रकाशात रंगांचा तीव्र विरोधाभास दिसतो. नळीच्या लहान टोकाशी ध्रुवित प्रकाश देणारी निकोल लोलक [→ प्रकाश] ही प्रयुक्ती बसविलेली असते. या लोलकाचे दोन्ही कर्ण व सेलेनाइट चकत्यांचा प्रमुख छेद यांत ४५° चा कोन असतो. या लोलकामधून सेलेनाइट चकत्या पाहिल्यास लोलकाच्या स्थितीनुसार विविध प्रकारचे चांगले रंग दिसतात परंतु लोलकाच्या दोन स्थिती अशा असतात की, तेव्हा सर्व रंग अदृश्य होतात (अंधार दिसतो). सूर्याकडे (ताऱ्याकडे) नळी रोखून अशा प्रकारे काळोख होईपर्यंत नळी तिच्या अक्षाभोवती फिरवून वेळ ठरविता येते (अशा स्थितीत मधली तबकडी मात्र तांबडी राहते) व घड्याळात दर्शक काट्याने वेळ दाखविली जाते.

ठाकूर, अ. ना.