चेन्नबसव: (सु. बारावे शतक). वीरशैव पंथाचे थोर आचार्य व बसवेश्वरांचे भाचे. बसवेश्वरांची वडील बहीण अक्कनागम्मा हिच्या उदरी कूडलसंगम (जि. विजापूर) येथे चेन्नबसव (चन्नबसव) यांचा जन्म झाला. पिता शिवस्वामी. चेन्नबसवांचे अध्ययन कूडलसंगम येथेच जातवेदिमुनीजवळ झाले. बसवेश्वरांसोबत बसवकल्याण (कर्नाटक) येथे जाऊन त्यांनी बसवांना धर्मप्रचारात व अनुभवमंटपाच्या कार्यात मदत केली. कन्नड व संस्कृत भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते तसेच वीरशैव तत्त्वज्ञानाचाही त्यांचा गाढा व्यासंग होता. वीरशैवांच्या षट्स्थलशास्त्राची (शिव व जीव यांचे सामरस्य साधण्याचे ध्येय साध्य करून घेण्यास षट्स्थलशास्त्र हा साधनमार्ग सांगितला आहे.) त्यांनी शास्त्रशुद्ध पुनर्रचना केली. म्हणूनच ‘षट्स्थलाचार्य’ असा त्यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. अल्लमप्रभू (प्रभुदेव) यांच्यानंतर अनुभवमंटपाच्या शून्य सिंहासनावर म्हणजे वीरशैव धर्मसंस्थेच्या अध्यक्षपदी चेन्नबसवांची नेमणूक झाली. त्यावरून त्यांचा पंथातील आध्यात्मिक अधिकार व मानाचे स्थान दिसून येते. त्यांनी कन्नड भाषेत काही धर्मग्रंथ व ‘वचने’ लिहिली आहेत. त्यांच्या वचनांत ‘कूडलचन्नसंगय्य’ अथवा ‘कूडलचन्नसंगमदेव’ अशी त्यांची नाममुद्रा आढळते. ११६७ मध्ये बसवकल्याणात राज्यक्रांती झाल्यावर ते वीरशैवांचे धर्मक्षेत्र उळवी (जि. कारवार) येथे आपल्या ७७० अनुयायांसह जाऊन राहिले आणि तेथेच वयाच्या सु. पंचविसाव्या वर्षी समाधिस्थ झाले. चेन्नबसवांच्या जीवनावर कन्नड व तेलुगू ह्या भाषांत काही पौराणिक चरित्रग्रंथ रचले गेले आहेत. त्यांतील विरूपाक्ष पंडिताचा चेन्नबसवपुराण  हा कन्नड ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. बसवेश्वर, अल्लमप्रभू आणि चेन्नबसव यांना वीरशैवांची ‘त्रिमूर्ती’ म्हटले जाते.

पाटील, म. पु.