दत्त, तोरु : (४ मार्च १८५६–३० ऑगस्ट १८७७). भारतीय कवयित्री. कलकत्ता येथे एका हिंदू कुटुंबात जन्म. वडिलांचे नाव गोविंदचंद्र आईचे क्षेत्रमणी. १८६२ मध्ये गोविंदचंद्रांनी आपली पत्नी आणि दोन मुले ह्यांच्यासह ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. हिंदू धर्मग्रंथांचे संस्कार क्षेत्रमणीच्या मनावर झालेले होते. हिंदू पुराणकथा व आख्यायिकाही तिला उत्तम प्रकारे ठाऊक होत्या. ख्रिस्ती झाल्यानंतर द ब्लड ऑफ जीझस ह्या इंग्रजी पुस्तकाचा बंगाली अनुवाद तिने केला होता. स्वतः गोविंदचंद्रही कविता करीत. कलकत्त्याच्या प्रसिद्ध ‘हिंदू कॉलेज’ मध्ये त्यांचे शिक्षण झाले होते. अशा सुसंस्कृत वातावरणात तोरू व तिची ज्येष्ठ बहीण अरू ह्या वाढल्या. कवितेची आवड दोघींनाही होती. १८६९ मध्ये दत्तकुटुंब यूरोपभेटीसाठी निघाले. तेथील वास्तव्यात फ्रान्स आणि फ्रेंच साहित्य ह्यांची मोहिनी दोघींच्या मनावर पडली. फ्रेंच भाषेचा साक्षेपीपणे अभ्यास करून त्यांनी तीवर प्रभुत्व संपादिले. भारतात परतल्यानंतर (१८७३) तोरूने केलेले फ्रेंच स्वच्छंदतावादी संप्रदायातील काही कवितांचे इंग्रजी अनुवाद अ शील्ड ग्लीन्ड इन फ्रेंच फील्ड्स ह्या नावाने प्रसिद्ध झाले (१८७६). ह्या संग्रहातील एकूण १६५ कवितांपैकी आठांचे अनुवाद अरूने केलेले होते. तथापि त्यामागील प्रेरणा तोरूचीच होती. एडमंड गॉससारख्या इंग्रज रसिकाची प्रशंसा ह्या अनुवादांना लाभली. तथापि एन्शंट बॅलड्स अँड लेजंडे्स ऑफ हिंदुस्थान (१८८२) हा तोरूचा स्वतंत्र काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय. अभिजात भारतीय कथासंचितातील सीता, सावित्री, ध्रुव, प्रल्हाद आदींच्या कथांना त्यात तिने सुंदर इंग्रजी काव्यरूप दिले आहे. नादमधुर आणि प्रतिमासंपन्न अशा ह्या कवितांतून हिंदू मिथ्यकथा आणि त्यांतील व्यक्तिरेखा ह्यांबद्दलचा तिचा आदर प्रत्ययास येतो. पश्चिमी जगाला अभिजात भारतीय कथांचा परिचय करून देणाऱ्या आरंभीच्या भारतीयांपैकी ती एक होय. ह्यांखेरीज फ्रेंचमध्ये एक कादंबरी तोरूने लिहिली. बिआंका ऑर द यंग स्पॅनिश मेडन (१८७८) ही तिची इंग्रजी कादंबरी अपूर्ण आहे. तिचे कादंबरीलेखनही पाश्चात्त्यांना स्तुतिपात्र वाटले होते. कलकत्ता येथे क्षयाने झालेल्या तिच्या अकाली निधनामुळे विकासक्षम प्रतिभेची एक कवयित्री नाहीशी झाली.
संदर्भ : Sen Gupta, Padmini, Toru Dutt, New Delhi, 1968.
कुलकर्णी, अ. र.