रिच्‌टर, बर्टन : (२२ मार्च १९३१− ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. १९७६ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक रिच्‌टर यांना आणि मॅसॅचूसेट्‌स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक सॅम्युएल सी. सी. टिंग यांना, एकाच वेळी स्वतंत्रपणे ‘प्साय’ (किंवा ‘जे’) या नवीन मूलकणाचा शोध लावल्याबद्दल, विभागून देण्यात आले. (प्रस्तु नोंदीतील संज्ञांच्या स्पष्टीकरणासाठी व अधिक माहितीसाठी ‘मूलकण’ही नोंद पहावी.)

रिच्‌टर यांचा जन्म ब्रुकलिन (न्यूयॉर्क) येथे झाला. त्यांनी मॅसॅचूसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी. एस्. (१९५२) आणि पीएच्. डी. (१९५६) या पदव्या मिळविल्या. १९५६−५९ मध्ये ते स्टॅनफर्ड विद्यापीठातील हाय एनर्जी फिज्क्स लॅबोरेटरीमध्ये भौतिकीचे संशोधन साहाय्यक होते. त्यानंतर ते स्टॅनफर्ड विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक (१९५९−६३) व सहयोगी प्राध्यापक (१९६३−६७) होते १९६७ पासून प्राध्यापक आहेत. ते स्टॅनफर्ड लिनिअर ॲक्सिलरेटर सेंटरचे १९८२−८४ मध्ये तांत्रिक संचालक होते व १९८४ पासून संचालक आहेत. त्यांनी जिनीव्हा येथील यूरोपीयन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च (सर्न) या संस्थेतही १९७५−७६ मध्ये काम केले.

रिच्‌टर यांनी मूलकणांविषयीचे विविध प्रयोग करण्यासाठी, तसेच हे प्रयोग करण्याकरिता लागणाऱ्या ⇨कणवेगवर्धकांचा अभिकल्प (आराखडा) तयार करण्याचे व ते उभारण्याचे काम करण्यासाठी निरनिराळ्या शास्त्रज्ञ गटांचे नेतृत्व केले. त्यांचे प्रारंभीचे प्रयोग पुंज विद्युत् गतिकीची सत्यता अत्यल्प अंतरांकरिता पडताळून पाहण्यासंबंधीचे होते. १९५६ मध्ये त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या हायएनर्जी फिजिक्स लॅबोरेटरीच्या ७०० MeV ऊर्जेच्या इलेक्ट्रॉन रेखीय वेगवर्धकाचा उपयोग करून ही सत्यता १०१५ मी. अंतररापर्यत प्रस्थापित केली. पुढे १९५८ मध्ये डब्ल्यू. सी. बार्बर, जी. के. ओनील व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी इलेक्ट्रॉन संचायक वलयांची एक जोडी उभारून आणि वरील रेखीय वेगवर्धकाचा अंतःक्षेपक म्हणून उपयोग करून ही मर्यादा १०१६ मी. च्याही खाली नेण्यात यश मिळविले.

इ. स. १९६३ मध्ये रिच्‌टर यांनी स्टॅनफर्ड लिनिअर ॲक्सिलरेटर सेंटर येथे संशोधन करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रक्ष गटाने तेथील २० GeV ऊर्जेच्या रेखीय वेगवर्धकाचा उपयोग करणाऱ्या इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन संचायक वलयाचा अभिकल्प तयार केला. इलेक्ट्रॉन यांच्या परस्परांवर आघात करणाऱ्या शलकांचा उपयोग करून इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन नष्टीकरणात निर्माण होणाऱ्या हॅड्रॉनाचा अभ्यास करण्याचा या योजनेचा उद्देश होता. आर्थिक करणामुळे रिच्‌टर यांच्या लघुरुप (महत्तम द्रव्यमानमध्य ऊर्जा ८ GeV) योजनेला मान्यता मिळाली. ही योजना स्टॅनफर्ड पॉझिट्रॉन-इसेक्ट्रॉन अँक्सिलरेटिंग रिंग (स्पिअर, SPEAR) या नावाने ओळखण्यात येते व ती रिच्‌टर यांच्या शास्त्रज्ञ गटाने उभारली तसेच त्यांच्या गटाने जटिल चुंबकीय कण अभिज्ञातक उभारण्यातही इतर शास्त्रज्ञ गटांशी महत्त्वाचे सहकार्य केले. स्पिअरमध्ये प्रयोग करण्यास १९७३ मध्ये प्रारंभ झाला. १९७४ मध्ये रिच्‌टर व त्यांच्या सहकाऱ्यांना प्साय (ψ) या नवीन मूलकणाचा शोध लागला. या कणाचे द्रव्यमान प्रोटॉनाच्या तिपटीपेक्षा जास्त असून इतर मूलकणांत त्याचा क्षय होईपर्यंत त्याचे आयुष्य १०२० सेकंद असते, असे दिसून आले. टिंग यांच्या गटाने स्वतंत्रपणे प्रोटॉन-न्यूक्लिऑन टकरीत निर्माण होणाऱ्या इसेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन जोड्यांचे (रिच्‌टर यांनी निरीक्षिलिल्या प्रक्रियेच्या उलट प्रक्रियेचे) निरीक्षण करून याच कणाचा शोध लावला व त्याला जे (J) असे नाव दिले. यामुळे हा कण J/ψ असा असे ओळखण्यात येतो. या कणाचे मोठे शून्यगति-द्रव्यमान, दीर्घायुष्य व इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन टकरीतील विपुल निर्मिती यांमुळे त्यांचे महत्त्व लगेच ओळखण्यात आले. मूलकणांच्या संरचनेच्या कार्क प्रतिमानानुसार प्साय कणाच्या अगोदर शोध लागलेले सर्व हँड्रॉन तीन कार्काचे बनलेले आहेत परंतु प्साय कण या योजनेत बसत नव्हता. व्यापक मान्यता पावलेल्या गृहीतकानुसार प्साय हा कण मोहकता (चार्म) हा नवीन गुणधर्म असलेला चौथा कार्क व त्याचा प्रतिकार्क यांच्या संयोगाने बनलेला आहे. मोहक कार्काच्या अस्तित्वाचे भाकीत अनेक वर्षांपूर्वी सैद्धांतिक पायावर करण्यात आलेले होते. प्साय कणाच्या शोधानंतरच्या दोन वर्षांत रिच्‌टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयोगांमुळे मोहकता या गुणधर्मावर आधारलेल्या स्पष्टीकरणाला मजबूत आधार मिळाला.

नोबेल पारितोषिकाखेरीज रिच्‌टर यांना १९७५ मध्ये ई. ओ. लॉरेन्स पुरस्काराचा बहुमान मिळाला. ते अमेरिकेच्या नॅशनल ॲकँडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आहेत. १९६३−८२ या काळात त्यांचे १५० हून अधिक संशोधनात्मक निबंध विविध वैज्ञानिक नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.

सूर्यवंशी, वि. ल.