त्रिकाय : बौद्ध धर्मातील एक संकल्पना. बुद्ध आणि बोधिसत्त्व यांचे बौद्ध धर्मात निर्माणकाय, संभोगकाय व धर्मकाय हे तीन काय वा देह मानतात व ते ‘त्रिकाय’ म्हणून ओळखले जातात. महासंधिक व महायान पंथीयांनी बुद्धाचे अलौकिकत्व मान्य केले. बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर त्याच्या कायेलाही अलौकिकत्व येणे क्रमप्राप्तच होते. परिनिर्वाणाच्या वेळी बुद्धानेच आपल्या अनुयायांची समजूत घातली होती, की तो स्वतः जरी आता नाहीसा होत असला, तरी शिकविलेला धर्म मागे राहणार आहे. तेव्हा त्याची उणीव धर्म भरून काढू शकेल. बुद्धाचे खरे स्वरूप धर्मकायात्मकच आहे व हा धर्मकायच जगाचे मार्गदर्शन करू शकेल. महायान पंथीयांच्या मते मात्र धर्मकाय हा धर्मधातुस्वरूप असून हाच खरा बुद्धकाय आहे. जगाच्या बुडाशी असलेल्या मूलतत्त्वाप्रमाणेच धर्मकाय हा अनिर्वचनीय आहे. तो आपल्या स्वरूपातच असल्यामुळे त्याला ‘स्वभावकाय’ असेही म्हटले आहे. परमार्थतः धर्मकायाचे असे स्वरूप असल्यामुळे लौकिकात अन्य कायांची जरुरी भासली. निरनिराळ्या प्रसंगी लोकांत बोलणारा, हालचाल करणारा, स्थूल देहरूपी असा जो बुद्ध किंवा ऐतिहासिक बुद्ध म्हणून समजला जातो, तो निर्माणकायांत दृश्य होतो. पण सामान्य जनापेक्षा उच्चतर कोटीच्या देवांस, देवतांसही जो धर्मोपदेश करताना दिसतो, तो त्याला त्याच्या मागील पुण्यकृत्यांमुळे प्राप्त झालेल्या सूक्ष्म पण दिव्य अशा संभोगकायांत दिसतो. संभोगकाय म्हणजे सूक्ष्म देह. हा काय बोधिसत्त्वच धारण करू शकतात. लंकावतारसूत्रांत याला ‘निष्यंदबुद्ध’ वा ‘धर्मतानिष्यंदबुद्ध’ म्हटले आहे. ह्या कल्पनेची, विषयाची उत्क्रांती बौद्ध धर्मात क्रमाक्रमाने कशी झाली, ह्याचे सुंदर विवेचन नलिनाक्ष दत्त ह्यांनी आपल्या ग्रंथात केले आहे.

संदर्भ : Datta, Nalinaksha, Aspects of Mahayana Buddhism and its Relations to Hinayana, London, 1930.

बापट, पु. वि.