चर्चिल नदी : (१) कॅनडा देशातील एक महत्त्वाची नदी. लांबी १,६०० किमी. ही मीथी सरोवरात उगम पावून सस्कॅचेवन व उत्तर मॅनिटोबा प्रांतातून वाहत जाते. ती वळणे घेत पीटर पाँड, चर्चिल, स्नेक, ग्रॅनव्हिल, सदर्न इंडियन सरोवरे, द्रुतवाह व धबधबे पार करीत जाते. आयलंड फॉल्स व ग्रॅनव्हिल फॉल्स येथे उत्पादित होणारी जलविद्युत् खाणी प्रदेशाला पुरविली जाते. ही नदी हडसन उपसागराला त्याच्या पश्चिम किनाऱ्यावरील चर्चिल शहराजवळ मिळते. तेथे उत्तम बंदर व लोहमार्ग स्थानक आहे. प्रेअरीचा गहू व मऊ केसांची कातडी यांच्या निर्यातीस ही नदी उपयोगी पडते. जेम्स मंक याने १६१९ मध्ये हिचे मुख शोधले व पीटर पाँड, अलेक्झांडर हेन्री व फ्रॉबिशर बंधू यांनी नंतर तिच्या वरच्या भागाचे समन्वेषण केले. त्यांनी फ्रॉग लेक येथे फरयुक्त कातड्यांच्या व्यापाराचे केंद्र स्थापन केले. स्थानिक लोक हिला मिसिसिपी म्हणतात. माँट्रीऑल, रेनडियर व बीव्हर या तिच्या प्रमुख उपनद्या होत.
(२) ईशान्य कॅनडाच्या लॅब्रॅडॉरची प्रमख नदी. हिचे मूळ नाव हॅमिल्टन. १९६५ मध्ये विन्स्टन चर्चिल यांच्या सन्मानार्थ तिला चर्चिल हे नाव दिले. ही पश्चिम लॅब्रॅडॉरच्या मध्य पठारावर विस्तृत लोहधातुक क्षेत्रात उगम पावते. ३३५ किमी. गेल्यावर ती चर्चिल फॉल्स – पूर्वीचा ग्रॅंड फॉल्स येथ ९२ मी. खोल बोडॉइन कॅन्यनमध्ये कोसळते. मुखापासून ४२० किमी. वरील हा धबधबा हडसन बे कंपनीच्या जॉन मॅक्लीनने शोधला. येथे मोठ्या प्रमाणावर जलविद्युत् निर्माण केली जाते. या भागात नदी २६ किमी. अंतरात ३३५ मी. खाली उतरते. मेलव्हिल सरोवराला मिळण्यापूर्वी ती धबधब्यानंतर २४० मी. खोल दरीतून साडेनऊ किमी. बाहेर आलेली असते. तेथून मग ती अटलांटिकला मिळते.
यार्दी, ह. व्यं.