द्वीपगिरी : मुख्यतः वाळवंटी प्रदेशातील एक वैशिष्ट्यपूर्ण भूआकार. वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या वाळूच्या घर्षणामुळे किंवा सूर्याच्या उष्णतेमुळे होणाऱ्या विदारणाने हा निर्माण होतो. मृदु खडकांचे भाग जास्त झिजून कठीण खडकांचे उंच भाग शिल्लक राहतात. ते घुमटाकार किवा स्तंभासारखे असतात व वाळवंटातील बेटांसारखे दिसतात. नायजेरियाच्या उत्तर भागात ग्रॅनाइट खडकांचे असे द्वीपगिरी पुष्कळ आढळतात. अल्जीरियाच्या वाळवंटी प्रदेशात तांबड्या कुरूंदाच्या खडकाचे द्वीपगिरी खांबासारखे उभे असलेले दिसतात. पश्चिम ऑस्ट्रेलियातील एअर्सरॉक हा एक प्रसिद्ध द्वीपगिरी आहे. राजस्थानच्या वाळवंटातही द्वीपगिरी पूर्वी किनाऱ्याजवळची बेटे होती. तमिळनाडूतही किनारी भागात ७५ ते २५० मी. उंचीपर्यंतचे द्वीपगिरी आढळतात.

दाते, संजीवनी