पालेंबांग : इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील द. सुमात्रा प्रांताची राजधानी व नदीबंदर. लोकसंख्या ५,८३,००० (१९७१). हे सुसी नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेले आहे. हे लोहमार्गाने तलुक्बटुंगशी, तर रस्त्यांनी इतर मोठ्या शहरांशी जोडलेले असून येथे विमानतळही आहे. सातव्या शतकातील श्रीविजयच्या हिंदू राज्याची राजधानी येथे होती. सतराव्या शतकात येथे मुस्लिमांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. १६१७ मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीने येथे व्यापारास सुरुवात केली व १६५९ मध्ये किल्ला बांधला. ब्रिटिशांचा अंमल येथे अल्पकाळ (१८११ – १४, १८१८ – २१) होता १८२५ पासून येथे डच सत्ता स्थिर झाली. दुसऱ्या महायुद्धात हे जपानच्या ताब्यात होते. १९५० मध्ये ते इंडोनेशियात विलीन झाले. येथे लोखंड-पोलाद, जहाजबांधणी, रबर, खते इत्यादींचे कारखाने असून याच्या सुंगाइगराँब व प्लाजू या उपनगरांत तेल शुद्धीकरण कारखाने आहेत. हे एक मोठे व्यापारी केंद्र असून येथून इंडोनेशियातील बंदरांशी, तसेच मले द्वीपकल्प, थायलंड, चीन यांच्याशी व्यापार चालतो. पार्लेबांगमधून खनिज, तेल, कॉफी, चहा, कोळसा, मसाल्याचे पदार्थ इ. निर्यात होतात. येथे श्रीविदजाजा विद्यापीठ, ऐतिहासिक मशीद (१७४०), सुलतानांच्या कबरी, संग्रहालय, नगरभवन, विभागीय संसदभवन ही प्रवाशांची आकर्षणे आहेत.

गाडे. ना.स.