चंद्रगोमी : (इ. स. ४७१). वंगदेशीय बौद्धधर्मी कवी, तत्त्वज्ञ व वैयाकरण. भर्तृहरीचा गुरू वसुरात याचा गुरू. सत्ताधनलोलुप राजपुत्र रत्नकीर्तीला उपदेश करण्यासाठी रचिलेले ११४ श्लोकांचे शिष्यलेखधर्मकाव्य, तारासाधनाष्टक, लोकानंद नाटक व चांद्रव्याकरण हे त्याच्या नावावरील ग्रंथ आहेत. पाणिनी, कात्यायन आणि पातंजली यांच्या व्याकरणांचा उपयोग करून व त्यांत शोध घालून बौद्ध परंपरेसाठी स्वतंत्र व्याकरण रचिल्यामुळे त्याच्यावर खूप टीका झाली. वैदिकी प्रक्रिया, स्वरप्रक्रिया आणि संज्ञा गाळून त्याने शिक्षा, उणादिसूत्रे, उपसर्गवृत्ती, धातुपाठ, गणपाठ व लिंगानुशासन यांचा अंतर्भाव केला. त्याची सु. ३५ सूत्रे काशिकेत उद्धृत केलेली आढळतात (चिकित्सक आवृत्ती— क्षितीशचंद्र चॅटर्जी, डेक्कन कॉलेज, पुणे), तारासाधनाष्टकात त्याने परोपकारार्थ झटणे हाच उत्कृष्ट मोक्षमार्ग सांगितला असून इतर सर्व साधने गौण लेखिली आहेत. पाणिनीच्या व्याकरणाच्या आठ अध्यायांत मिळून ४,००० सूत्रे आहेत उलट चांद्रव्याकरणात सहा अध्यायांत ३,१०० सूत्रे आढळतात.