घूस : स्तनिवर्गातील कृंतक (कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या) गणातला प्राणी. उंदरांच्या बरोबरच घुशीचाही म्यूरिडी कुलात समावेश होतो. घुशींच्या दोन मुख्य जाती आहेत : काळी धूस, हिचे शास्त्रीय नाव रॅटस रॅटस आहे आणि पिंगट घूस, हिचे शास्त्रीय नाव रॅटस नॉर्वेजिकस आहे.
काळी घूस भारतात नेहमी आढळते. हिचे मूलस्थान भारत आणि ब्रह्मदेश असून तेथून ती जगभर पसरली. हिला जरी काळी घूस म्हणत असले, तरी हिच्या रंगात अतिशय विविधता असते. सामान्यतः पाठीकडचा रंग तपकिरी व खालचा मळकट असतो. पिंगट घुशीपेक्षा ही लहान असते कान लांबट आणि शेपटी शरीरापेक्षा लांब असते.
पिंगट घूससुद्धा भारतात नेहमी आढळते. ही मूळ मध्य आशियातली व तेथून जगभर पसरली. काळ्या घुशीपेक्षा ही मोठी व बळकट असते. रंग तपकिरी करडा शरीराची लांबी १८–२० सेंमी. शेपटीची लांबी १५–१८ सेंमी. असते. कान लहान असतात. ही बिळे तयार करते. शहरातील नाल्या आणि गटारे यांत बहुधा असते. ही अतिशय कावेबाज असते.
या दोन्ही घुशी मनुष्यवस्तीत राहत असल्या, तरी त्यांची राहण्याची ठिकाणे वेगवेगळी असल्यामुळे त्यांचा एकमेकींशी फारसा संबंध येत नाही. दोन्ही जाती सर्वभक्षी असून फार नासधूस करतात. यांच्यामुळे दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. या दोन्ही घुशींमुळे प्लेग, प्रलापक (टायफस) ज्वर, अन्न-विषबाधा, अलर्क रोग (पिसाळ रोग), ⇨ ऊतकक्रामी संसर्ग रोग (ट्रिकिनोसीस) वगैरे रोगांचा प्रादुर्भाव होतो. पांढऱ्या उंदरांप्रमाणेच पांढऱ्या घुशींचादेखील प्रयोगांकरिता प्रयोगशाळेत उपयोग करतात.
घुशींची वर्षातून चारपाच वेळा वीण होते आणि दर खेपेला ४-१० पिल्ले जन्मतात. जन्मतः ती उघडी आणि आंधळी असतात पण त्यांची वाढ फार झपाट्याने होते.
वरील दोन जातींशिवाय घुशींच्या आणखीही जाती आढळतात.
(१) मेताद : शास्त्रीय नाव मिलार्डिया मेल्टेडा. शरीराची व शेपटीची लांबी प्रत्येकी १३–१५ सेंमी, यांची बिळे कुंपणात विशेषतः निवडुंगाच्या कुंपणात असतात भात व कपाशीचे थोडेफार नुकसान करतात.
(२) झुडपी घूस : शास्त्रीय नाव गोलंडा इलियटाय. शरीराची व शेपटीची लांबी प्रत्येकी १० सेंमी. शेपटी केसाळ असते. झुडपांच्या दाट रानात राहते व एखाद्या फांदीवर किंवा जमिनीवर घरटे बांधते.
(३) रानघूस : शास्त्रीय नाव रॅटस ब्लॅनफोर्डाय. लांबी सु. १० सेंमी. शेपटी शरीरापेक्षा लांब असून तिच्या शेवटावर लांब पांढरे केस असतात. ही सदापर्णी जंगलात बहुधा झाडांवर राहते आणि झाडाच्या ढोलीत मोठे ओबडधोबड घरटे बांधते.
पहा : उंदीर.
क्षीरसागर, वि. ग.
“