ग्रानीट, रांगनार आर्थर : (३o ऑक्टोबर १९oo —   ). स्वीडिश तंत्रिकाक्रियावैज्ञानिक (मज्जेच्या क्रिया व कार्य कसे चालते या शास्त्रातील तज्ञ). ग्रानीट आणि जॉर्ज वाल्ड व एच्. के. हार्टलाइन हे दोघे अमेरिकन शास्त्रज्ञ या तिघांना मिळून १९६७ चे शरीरक्रियाविज्ञान व वैद्यकशास्त्र या विषयांचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

त्यांचा जन्म हेल्‌सिंग (फिनलंड) येथे झाला. त्यांनी १९२७ मध्ये हेल्‌सिंकी विद्यापीठाची एम्.डी. पदवी मिळविली. त्यांनी १९२८ व १९३१-३२ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी संशोधन केले. त्यांनी सर चार्ल्‌स शेरिंग्टन यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सफर्ड येथे संशोधन केले. तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) विषयक शेरिंग्टन यांच्या विचारांचा ग्रानीट यांच्या कार्यावर बराच प्रभाव पडला. १९३७ मध्ये हेल्‌सिंकी विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ते स्टॉकहोम येथील करोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये १९४o पासून तंत्रिकाक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक व पुढे १९४५ पासून त्या विषयाच्या नोबेल इन्स्टिट्यूटचे संचालक झाले. १९६७ मध्ये निवृत्त होईपर्यंत प्राध्यापक आणि संचालक ही दोन्ही पदे त्यांनी भूषविली.

ग्रानीट यांनी दृष्टी या विषयावर बरेच संशोधन कार्य केले आहे. १९३o मध्ये दृक्‌पटलातील (डोळ्यातील सर्वांत आतील संवेदनाक्षम तंत्रिकापटलातील) अंतर्निरोधन त्यांच्या प्रथम लक्षात आले. प्रकाश उद्दीपन थांबविल्यानंतर उत्पन्न होणारी तंत्रिका संवेदनांची मालिका, बेडकाच्या दृक्‌तंत्रिकेवर विद्युत् अग्राद्वारे त्यांनी नोंदविली. या संवेदना सुरू असताना जर दृक्‌पटलाचे पुन्हा प्रकाश उद्दीपन कले, तर संवेदनांचा अंतर्निरोध झालेला आढळतो. त्यांनी विद्युत् दृक्‌पटलालेखांचे (प्रकाश उद्दीपनानंतर दृकपटलाच्या विद्युत् वर्चसात म्हणजे स्थितीत होणाऱ्या बदलांच्या आलेखाचे) विश्लेषण केले. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या डोळ्यांसंबंधी त्यांनी केलेला अभ्यास मूलभूत महत्त्वाचा मानला जातो.

त्यांचा दृष्टीबद्दलचा प्रकाशरासायनिक (प्रकाशामुळे होणाऱ्या रासायनिक क्रियेबद्दलचा) सिद्धांत सर्वमान्य झाला. दृक्‌पटलाची सुग्राहिता त्यामधील दृक्‌रंगद्रव्याच्या प्रमाणावर अवलंबून असते असेच मानीत. दृक्‌रंगद्रव्याचे फारसे विघटन न होता ही सुग्राहिता प्रकाश उद्दीपनाने कमी करता येते हे ग्रानीट यांनी दाखविले. टोकदार सूक्ष्म विद्युत् अग्र वापरून फक्त एकाच कोशिकेतील (पेशीतील) प्रतिसादांची नोंद करणारे ग्रानीट हे पहिलेच विद्युत् शरीराक्रियावैज्ञानिक होत. हे साधन वापरून त्यांनी रंग दृष्टीविषयी बरीच माहिती मिळविली.

त्यांना ऑस्लो (१९५१), ऑक्सफर्ड (१९५६), लॉयोला (१९६९) व पीसा (१९७o) येथील विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या, रेट्‌झिअस सुवर्ण पदक (१९५७), डॉन्डर्स पदक (१९५७), जाहरे पारितोषिक (ऑस्लो, १९६१) थर्ड इंटरनॅशनल सेंट व्हिन्सेंट पारितोषिक (१९६१), शेरिंग्टन पदक (१९६७), पुर्‌किन्ये सुवर्ण पदक (१९६९) वगैरे अनेक बहुमान मिळाले आहेत. ते लंडनची रॉयल सोसायटी, अमेरिकन नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस इ. अनेक विद्वत् संस्थांचे सन्माननीय सभासद आहेत. सेन्सॉरी मेकॅनिझम्स ऑफ द रेटिना (१९४७), रिसेप्टर्स अँड सेन्सॉरी परसेप्शन (१९५५), चार्ल्‌स स्कॉट शेरिंग्टन : ॲन अप्रेझल (१९६६), बेसिस ऑफ मोटर कंट्रोल (१९७o) व रेग्युलेशन ऑफ द डिस्‌चार्ज ऑफ मोटोन्यूरॉन्स (१९७१) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

भालेराव, य. त्र्यं.