डेबाय, पेट्रस (पीटर) योसेफस व्हिल्हेल्मस : (२४ मार्च १८८४ – २ नोव्हेंबर १९६६). डच-अमेरिकन भौतिक रसायनशास्त्रज्ञ. रेणवीय संरचनेच्या (रेणूतील अणूंच्या मांडणीसंबंधीच्या) अभ्यासात महत्त्वाचे कार्य केल्याबद्दल त्यांना १९३६ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. त्यांचा जन्म नेदर्लंड्समधील मास्ट्रिख्त येथे झाला. त्यांचे शिक्षण आखेन येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व म्यूनिक विद्यापीठ येथे झाले. त्यांनी १९०५ मध्ये आखेन येथे विद्युत् तंत्रविद्येची पदवी आणि १९०८ मध्ये म्यूनिक विद्यापीठाची भौतिकी विषयातील पीएच्.डी. मिळविली. झूरिक, उत्रेक्त, गटिंगेन व लाइपसिक येथे भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर १९३४ मध्ये बर्लिन येथील सैद्धांतिक भौतिकीच्या कैसर विल्हेल्म इन्स्टिट्यूटचे संचालक व बर्लिन विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या संस्थेला त्यांनी माक्स प्लांक इन्स्टिट्यूट असे नाव दिले. नाझी राजवटीत त्यांच्या कामात व्यत्यय येऊ लागल्यामुळे डेबाय यांनी १९४० मध्ये अमेरिकेला प्रयाण केले व तेथे ते इथाका (न्यूयॉर्क राज्य) येथील कॉर्नेल विद्यापीठात रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख झाले. १९५२ मध्ये ते गुणश्री प्राध्यापक झाले. १९४६ साली त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.
डेबाय यांनी द्विधुर्वी परिबल (ज्यातील धन व ऋण विद्युत् भारांची परिणामी केंद्रे अलग असतात अशा रेणूतील म्हणजे द्विध्रुवातील विद्युत् भार व त्यांच्यामधील अंतर यांचा गुणाकार), ध्रुवीय रेणू (ज्यांना विद्युत् परिबल असते असे रेणू), लवणांच्या विद्रावांसंबंधीचा सिद्धांत व रेणूवीय संरचना या विषयांत विशेष संशोधन केले. क्ष-किरणांच्या साहाय्याने स्फटिकांचा अभ्यास करण्याकरिता पदार्थ चूर्णरूपात वापरणेही शक्य आहे, असे डेबाय व पी. शेरर यांनी १९१६ मध्ये दाखविले. यामुळे अशा अभ्यासाकरिता चांगले स्फटिक बनविण्याची जरूरी राहिली नाही. डेबाय यांनी क्ष-किरण व इलेक्ट्रॉन यांच्या वायूतील विवर्तनासंबंधी (अडथळ्याच्या कडेवरून व मर्यादित रंध्रातून जाताना दिशेत होणाऱ्या बदलासंबंधी) विशेष अभ्यास केला. एस्. ए. अऱ्हेनियस यांनी विद्रावातील लवणांच्या आयनीकरणासंबंधी (धन व ऋण विद्युत् भारित अणूंत वा अणुगटांत रूपांतरित होण्यासंबंधी) मांडलेल्या कल्पनेबाबत (आयनीकरण पूर्ण होता काही रेणू विद्रावात तसेच राहतात याबाबत) संशोधन करून डेबाय व ई. हकल यांनी १९२३ च्या सुमारास एक सिद्धांत मांडला. या सिद्धांतामुळे स्फटिकरूपातील घन पदार्थांबाबतही अऱ्हेनियस यांची कल्पना वापरणे शक्य झाले तसेच विद्रावांच्या गुणधर्मांच्या अभ्यासाला नवी दिशा प्राप्त झाली. रेणूतील विद्युत् ध्रुवीयतेसंबंधी डेबाय यांनी केलेल्या कार्यामुळे रेणूतील अणूंच्या मांडणीसंबंधीच्या ज्ञानात मौलिक भर पडली व रेणूतील अणूंमधील अंतरे मोजणेही शक्य झाले. त्यांनी बहुवारिकांचा (अनेक साध्या रेणूंचा संयोग होऊन तयार झालेल्या जटिल रेणूंच्या संयुगांचा) अभ्यास करून महारेणूंचा रेणुभार मोजण्याची एक अचूक पद्धत १९४४ मध्ये शोधून काढली.
नोबेल पारितोषिकाखेरीज डेबाय यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे रम्फर्ड पदक (१९३०), रॉयल नेदर्लंड्स ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे लोरेन्ट्स पदक (१९३५), फ्रँकलिन पदक (१९३७), फॅराडे पदक (१९४९), अमेरिकन केमिकल सोसायटीचे प्रीस्टली पदक (१९६३) इ. सन्मान मिळाले. अमेरिका, ब्रिटन, नेदर्लंड्स डेन्मार्क, भारत (बंगलोर येथील इंडियन ॲकॅडेमी आणि द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स), रशिया इ. अनेक देशांतील शास्त्रीय संस्थांशी त्यांचा संबंध होता. त्यांचे प्रमुख कार्य कलेक्टेड पेपर्स ऑफ पीटर डेबाय (१९५४) या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेले आहे. Physikalische Zeitschrift या नियतकालिकाचे संपादक होते (१९१५–४०). ते इथाका येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.