प्राण्यांचेसंचलन : अतिशय कनिष्ठ जातीचे प्राणी वगळल्यास इतर सर्व प्राणी आणि वनस्पती यांच्यामधील प्रमुख भेद म्हणजे प्राण्यांना असणारी संचलनाची (एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची) पात्रता हा होय. प्राणी निरनिराळ्या कारणांसाठी संचलन करतात. आपले भक्ष्य शोधण्यासाठी, संकटापासून बचाव करण्यासाठी, प्रजोत्पादन कालात भिन्न लिंगीय प्राण्याच्या जवळ जाण्यासाठी प्राणी संचलन करतात. प्राण्यांच्या या पात्रतेमुळे ते जीवनात यशस्वी होतात. वनस्पती एकाच जागी स्थिर असल्याने संकटापासून त्यांना बचाव करता येत नाही व त्या नष्ट होतात.

 

प्रतिकूल हवामानामुळे अनेक पक्षी, प्राणी, मानव स्थलांतर करतात. चरणारे प्राणी, भटकी मानव जात हे अन्नाचा साठा संपत आहे, असे आढळल्यावर दुसऱ्या जागी स्थलांतर करतात. समुद्रातील मासे ज्या वेळी पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे प्रमाण बदलते किंवा पाण्याचे तापमान बदलते, त्या वेळी उथळ किंवा खोल पाण्यात जेथे विरघळलेल्या ऑक्सिजनाचे प्रमाण जास्त असेल तेथे प्रवेश करतात. तसेच सरीसृप (सरपटणारे) प्राणी वातावरणातील तापमानाप्रमाणे त्यांना आराम वाटेल अशा जागी स्थलांतर करतात. कीटकांना व पक्ष्यांना पंख असल्याने ते योग्य ठिकाणी जमिनीवर अथवा झाडांवर उतरून तेथे राहतात. सामनसारखे मासे आपली अंडी गोड्या पाण्यात घालत असले, तरी इतर वेळी समुद्राच्या पाण्यात खोलवर शिरून अन्नाचा भरपूर साठा आहे, अशा जागी संचार करतात. ज्या वेळी एकाच ठिकाणी प्राण्यांची संख्या बेसुमार वाढते, त्या वेळी अन्नाची व जागेची टंचाई निर्माण होऊन प्राण्यांना स्थलांतर करणे भाग पडते. यामुळे अनेक प्राणी नवीन जागी निघून जातात. जे थोडेसे प्राणी मूळ जागी राहतात त्यांना अन्न व जागा उपलब्ध होते. हे सर्व संचलनामुळे शक्य होते.

 

प्राणी संचलनासाठी ज्या अवयवांचा उपयोग करतात ते अवयव त्या प्राण्यांच्या मूळ पूर्वजाच्या शरीरावर सर्वप्रथम निर्माण होतात आणि भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे व गरजांप्रमाणे या अवयवांचा विकास होऊन ते कार्यक्षम होतात. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी हे माशांपासून निर्माण झाले आहेत. त्यांना पायांच्या दोन जोड्या उत्पन्न झाल्या. अनेक सस्तन प्राण्यांना पायांच्या दोन जोड्या असतात. तर पक्ष्यामध्ये पायांच्या एका जोडीचे (पुढील जोडीचे) पंखांत रूपांतर होते व त्यांचा उडण्यासाठी उपयोग होतो. मानवासारखे प्राणी पायांच्या एका जोडीचा उपयोग चालण्यासाठी करतात. कांगारूसारखे प्राणी पायांच्या दोन जोड्या असल्या, तरी फक्त मागील पायांच्या जोडीचाच चालण्यासाठी व पळण्यासाठी उपयोग करतात. सर्पासारख्या प्राण्यांना पाय नसतात. ते शरीरातील स्नायूंच्या साह्याने संचलन करतात.

 

प्रकार : संचलनाचे दोन प्रकार आढळतात : (१) अनैच्छिक संचलन आणि (२) ऐच्छिक किंवा स्वयंसंचलन.

 

अनैच्छिकसंचलन : काही प्राणी वारा, पाणी इ. बाह्य कारणांमुळे आपली जागा बदलत असतात. उदा., जोरदार वाऱ्यामुळे लहान कीटक दूर अंतरावर वाहून नेले जातात. एखादा कोळी आपल्या विशिष्ट ग्रंथीवाटे एक चिवट धागा निर्माण करून झाडापासून हवेत लोंबकळत राहतो. झाडाला चिकटलेल्या मूळ धाग्याशी संबंध ठेवूनच नवीन धागा निर्माण करत तो जोरदार वाऱ्याबरोबर दूरवर वाहून नेला जातो. कदाचित तो दुसऱ्या झाडावर जाऊन पडला, तर तेथेच राहतो. वाहत्या पाण्यात राहणारे अनेक लहान आकारमानाचे प्राणी त्यांची स्वतःची इच्छा नसतानाही पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूरवर वाहून नेले जातात. समुद्रात राहणाऱ्या अनेक प्राण्यांच्या शरीरांत हवेने भरलेल्या पिशव्या असतात. या हवेच्या पिशव्यांमुळे हे प्राणी पाण्यात तरंगत राहतात. जोरदार लाटांमुळे किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे हे प्राणी आपली जागा वारंवार बदलत असतात. वरील सर्व उदाहरणांत प्राणी ज्या ज्या परिस्थितीत राहतात त्या परिस्थितीत स्वतः कोणतेही श्रम न घेता, स्वतःच्या इच्छेविरुद्ध भोवतालच्या कारणांमुळे आपली जागा बदलत असतात.

 

ऐच्छिकसंचलन : मासा, बेडूक, साप, पक्षी, घोडा, मानव इ. प्राण्यांमध्ये आपल्या शरीराच्या व अवयवांच्या हालचाली आपल्या इच्छेनुरूप करण्याची पात्रता असते बेडूक जमिनीवरून उड्या मारताना किंवा पाण्यात पोहताना, घोडा जमिनीवरून धावताना आपली शक्ती वापरून प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या इच्छेनुरूप संचलन करीत असतात. यालाच स्वयंसंचलन किंवा ऐच्छिक संचलन असे म्हणतात. स्वयंसंचलन मंदगतीने (उदा., कासव) किंवा जलदगतीने (उदा., ससा) असू शकते.

 

स्पंज, समुद्रपुष्प यांसारखे पाण्यात राहणारे प्राणी दगडांना घट्ट धरून राहतात आणि कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडत नाहीत.

 

संचलनाकरिता वापरण्यात येणाऱ्या अवयवांवरून ढोबळपणे आपणास ऐच्छिक संचलनाचे पुढील उपप्रकार पाडता येतात : (१) अमीबासारखे एककोशिक (ज्यांचे शरीर एकाच पेशीपासून बनलेले आहे असे) प्राणी आपल्या कोशिकेपासून ⇨ पादाभ (छद्मपाद) निर्माण करून संचलन करतात. (२) अवयवांना जोडलेल्या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरण पावण्याच्या कार्यक्षमतेमुळे अवयवांची हालचाल करून काही प्राणी संचलन करतात. (३) सर्पासारखे सरपटणारे प्राणी आपल्या शरीरातील स्नायूंच्या साह्याने संचलन करतात. (४) पाण्यात राहणारे प्राणी आपल्या शरीराचा व शरीरावरील परांचा (त्वचेच्या स्नायुमय घड्यांचा) उपयोग करून पोहतात. (५) जमिनीवर राहणारे प्राणी आपल्या पायांचा उपयोग करून धावतात. (६) हवेत उडणारे प्राणी आपल्या पंखांचा उपयोग करतात.

 

अपृष्ठवंशी आणि पृष्ठवंशी प्राणी कशा प्रकारे संचलन करतात, याचा सविस्तर विचार खाली केला आहे.

 

अपृष्ठवंशीप्राणी : अमीबासारखा एककोशिक प्राणी संचलन करू शकतो. अमीबाला निश्चित आकार नसतो व पायांसारखे अवयव नसतात. हा प्राणी आपल्या एककोशिक शरीराच्या पृष्ठभागापासून लहान, आखूड नलिकेसारखा भाग निर्माण करतो. त्याला पादाभ असे म्हणतात. या पादाभांच्या साह्याने तो जमिनीला घट्ट धरून ठेवतो. नंतर कोशिकेचा सर्व भाग पुढे ढकलला जातो. या भागापासून पुन्हा दुसरा पादाभ उत्पन्न होतो. त्याच्या साह्याने तो जमिनीला घट्ट धरून ठेवतो आणि पहिला पादाभ आपली पकड सोडून देतो. अशा तऱ्हेने अमीबा पुढे सरकत जातो. या क्रियेला ‘अमीबीय संचलन’ अशी संज्ञा आहे. [⟶ अमीबा].

 

प्रोटोझोआ (आदिजीव) प्राणिसंघातील दुसरा एककोशिक प्राणी ⇨ पॅरामिशियम हा आहे. या प्राण्यांचे संचलन अमीबापेक्षा वेगळ्या प्रकारचे असते. पाण्यात आढळणाऱ्या या प्राण्याच्या कोशिकेवर असंख्य ⇨ पक्ष्माभिका (सूक्ष्म, नाजूक, कंपनशील व चाबकाच्या दोरीसारख्या वाढी) असतात. या पक्ष्माभिकांच्या लयबद्ध हालचालीमुळे हा प्राणी संचलन करतो. या संचलनाला ‘पक्ष्माभिकीय संचलन’ अशी संज्ञा आहे.

 


 सीलेंटेरेटा (आंतरगुही) या प्राणिसंघातील ⇨हायड्रा हा प्राणी गोड्या पाण्यात आढळतो. हा दगडाला किंवा पाण्यातील वनस्पतींना आपल्या शरीराच्या पाठीमागील भागाने चिकटून राहतो परंतु ज्या वेळी गरज भासेल त्या वेळी हा प्राणी मंदगतीने संचलन करू शकतो. जेव्हा संचलनाची आवश्यकता असते त्या वेळी हा प्राणी आपले शरीर वाकवितो व शरीराच्या पुढील भागी असणाऱ्या स्पर्शकांच्या साह्याने जमिनीचा पृष्ठभाग घट्ट पकडतो. नंतर शरीराचा पाठीमागचा भाग जमिनीपासून उचलून पुढच्या भागाजवळ आणून जमिनीवर टेकवतो व जमीन घट्ट धरतो. नंतर स्पर्शक जमिनीपासून उचलून पुन्हा त्यापुढे नेऊन जमिनीवर टेकवून जमीन घट्ट धरतो व पुन्हा मागला भाग पुढे आणतो. की क्रिया वारंवार होऊन हायड्रा हळूहळू पुढे सरकत जातो.

 

जेलीफिशसारख्या प्राण्यांचे शरीर छत्रीसारखे असते. आपल्या शरीराची स्नायूंच्या साह्याने हालचाल करून जेलीफिश पाण्यात संचलन करतो. [⟶ जेलीफिश].

 

गोलकृमी, चापट कृमी आणि पट्टकृमी या जातींचे प्राणी परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे) असतात. ते इतर प्राण्यांच्या शरीरात राहत असल्याने त्यांच्यात संचलनाची विशेष पात्रता नसते. गोलकृमींच्या शरीरात लांबट स्नायू असतात. या स्नायूंमुळे हे कृमी आपले शरीर वाकवू शकतात किंवा लांब करू शकतात. चापट कृमीचे डिंभ (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) पाण्यात राहतात. मिरॅसीडियम आणि सरकॅरिया हे डिंभ पक्ष्माभिकांच्या आणि शेपटीच्या हालचालीने संचलन करतात.

 

ॲनेलिडा (वलयी) प्राणिसंघापैकी ⇨ नीरीज हे प्राणी समुद्रात आढळतात. या प्राण्याच्या प्रत्येक खंडावर (भागावर) दोन्ही बाजूंना पार्श्वपाद ही उपांगे (अवयव) असतात. ही उपांगे चपटी असून स्नायुयुक्त असतात. पाण्यात जलद गतीने पोहण्यासाठी या उपांगांचा वल्ह्यासारखा उपयोग होतो. या उपांगाशिवाय शरीराच्या बाह्य आवरणाखाली असलेले अनेक गोल स्नायू शरीराच्या निरनिराळ्या खंडांचे आकुंचन करून संचलनाला मदत करतात.

 

ओलसर जागेत राहणाऱ्या ⇨ गांडुळासारख्या प्राण्यात बाह्य आवरणाखाली गोल व लांब स्नायू असतात. या प्राण्यांना पार्श्वपाद नसतात पण शूक (लहान, राठ व ताठ केसांसारख्या रचना) असतात. गोल स्नायू आकुंचन पावले की, लांब स्नायू ताणले जातात व खंडाचे प्रसरण होते. गोल स्नायू मूळच्या स्थितीस आले की, लांब स्नायू मूळ स्थितीला येतात आणि खंडाचे आकुंचन होते. अशा तऱ्हेने काही खंड आकुंचन पावलेले असतात, तर काही लांब झालेले असतात. या क्रिया एकाआड एक होत असतात आणि यामुळे व शुकांचा टेकूसारखा आधारासाठी वापर करून गांडूळ हळूहळू पुढे सरकत असते.

 

ॲनेलिडा प्राणिसंघामधील ⇨ जळू हा प्राणी पाण्यात आढळतो. या प्राण्याचे संचलन नीरीज किंवा गांडूळ यांच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे असते. जळूच्या शेवटच्या खंडावर एक चूषक असतो. त्याच्या साह्याने निर्वात निर्माण करून जळू दगड किंवा पाने घट्ट धरून ठेवते. जेव्हा जळूला ही जागा सोडून इतरत्र जायचे असेल त्या वेळी तिच्या शरीरात असणाऱ्या स्नायूंच्या साह्याने शरीर ताणले जाते. नंतर तोंडातील जबड्याच्या साह्याने दगड किंवा पाने घट्ट धरून ठेवली जातात व चूषकाची दगडावरील पकड सोडून सर्व शरीराचे खंड आकुंचन पावून तोंडाजवळ आणले जातात. चूषक दगड घट्ट धरून ठेवतो व जबडे दगडापासून अलग केले जातात. नंतर शरीर पुन्हा ताणले जाऊन जबडे पुन्हा दगड घट्ट धरून ठेवतात व मग चूषक दगडापासून सोडविले जाऊन सर्व खंड आकुंचन पावून तोंडाजवळ येतात. ही क्रिया वारंवार होत असते व जळू हळूहळू पुढे सरकत राहते.

 

आर्थ्रोपोडा (संधिपाद) प्राणिसंघातील प्राणी खाऱ्या पाण्यात, गोड्या पाण्यात आणि जमिनीवर राहतात. या संघातील प्राण्यांचे संचलन विविध प्रकारचे असते. काही प्राणी हळूहळू चालतात, तर काही हळू अगर जलद पोहतात, काही जमिनीवर उड्या मारतात, तर काही हवेत उडतात. या प्राण्यांच्या वक्षावर व उदरावर अनेक अवयव अगर उपांगे असतात. ही उपांगे स्नायुयुक्त असतात. हे स्नायू रेखित असतात व ह्यांच्यात असणाऱ्या आकुंची तंतूंमुळे हे स्नायू चटकन आकुंचन पावतात व मूळ स्थितीलाही येतात. ॲनेलिड प्राण्यांमध्ये रेखित स्नायू नसतात. त्यामुळे या स्नायूंचे आकुंचन व प्रसरण सावकाश होते.

 

आर्थ्रोपॉड प्राण्यामध्ये हे स्नायू निरनिराळ्या आकारांचे व प्रकारांचे असतात. ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूंस जोड्या जोड्यांनी रचलेले असतात. या स्न्यायूंमुळे उपांगे हालचाल करू शकतात. पाण्यात असताना खेकडे आपल्या शिरोवक्षावरील (डोके व वक्ष यांच्या एकत्रीकरणाने तयार झालेल्या भागावरील) व उदरावरील उपांगांचा पोहण्यासाठी उपयोग करतात परंतु जमिनीवर चालताना फक्त शिरोवक्षावरील उपांगांचाच उपयोग होतो. जमिनीवरून धावताना खेकडे तिरक्या चालीने धावतात. झिंग्यासारखे प्राणी पाण्यात पोहताना शिरोवक्षावरील व उदरावरील उपांगांचा उपयोग करतात.

 

पैसा, ⇨ गोम इ. प्राण्यांचे शरीर पुष्कळ खंडांनी युक्त असते. प्रत्येक खंडावर पायांची जोडी असते. या असंख्य पायांच्या जोड्यांनी हे प्राणी जमिनीवरून जलद धावतात. या वेळी पायांच्या काही जोड्या शरीराचा तोल सांभाळून धरतात, तर काही जोड्या त्याच वेळी शरीर पुढे ओढीत असतात.

 

कीटक पाण्यात अगर जमिनीवर आढळतात. कीटकांना पायांच्या तीन जोड्या असतात. वक्षाचे तीन खंड असून प्रत्येक खंडावर एक जोडी असते [⟶ कीटक] संचलनाच्या प्रकाराप्रमाणे पायाच्या रचनेत बदल झालेले असतात. कीटक जमिनीवर धावू शकतात, सरपटू शकतात अगर उड्या मारू शकतात. झुरळ, मुंगी यांसारखे कीटक जमिनीवर धावतात तर नाकतोडा, टोळ, पिसू यांसारखे कीटक लांब उड्या मारू शकतात. पर्णकीटक, झुरळ, मुंगी यांसारख्या कीटकांच्या पायांच्या तीनही जोड्या एकसारख्या असतात. यामुळे हे कीटक सावकाश चालू शकतात किंवा संकटाच्या वेळी जलद धावू शकतात. टोळ, नाकतोडा, पिसू या कीटकांच्या पायांची तिसरी जोडी खूप लांब व मजबूत असते. या पायांचा रेटा देऊन हे कीटक लांब व उंच उडी मारू शकतात.

 

कीटक जेव्हा जमिनीवर चालत असतात त्या वेळी शरीराचे वजन सांभाळणे, तोल सांभाळणे व शरीर पुढे नेणे ही कामे पायांना करावी लागतात. चालताना कीटक आपल्या डाव्या बाजूचा पुढला व मागला पाय आणि उजव्या बाजूचा मधला पाय असे तीन पाय जमिनीवर टेकवून त्यांवर शरीराचा तोल व वजन पेलतो. उरलेले तीन पाय जमिनीवरून उचलून पुढे नेऊन जमिनीवर टेकविले जातात व शरीर पुढे खेचले जाते. या वेळी प्रथम जमिनीवर टेकविलेले पाय वर उचलून पुढे आणले जातात व ते पुन्हा जमिनीवर टेकविले जातात व अगोदर टेकविलेले पाय जमिनीपासून उचलून शरीर पुढे खेचले जाते. ही क्रिया वारंवार होऊन कीटक पुढे चालत राहतो.

 


 फुलपाखरे, माश्या, डास इ. कीटक हवेतही उडतात. या कीटकांना प्रत्येक वक्षखंडावर पायांची एक जोडी असते व यामुळे हे कीटक झाडावर, जमिनीवर चालू शकतात परंतु बहुतकरून हे कीटक हवेत संचलन करत असतात. हवेत संचार करण्यासाठी या कीटकांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वक्षखंडांवर पंखांची प्रत्येकी एक जोडी असते. बहुतेक सर्वच कीटकांना पंखांच्या दोन जोड्या असतात परंतु ढेकूण, पिसू, ऊ यांसारख्या परजीवी कीटकांना पंख नसतात. तसेच माशी, डास यांसारख्या कीटकांना फक्त दुसऱ्या वक्षखंडावरच पंखांची एक जोडी असते. तिसऱ्या वक्षखंडावरील पंखांचे रूपांतरण झालेले असते. हे पंख एखाद्या सोट्यासारखे असून त्यांचा शरीराचा तोल सांभाळण्यासाठी उपयोग होतो.

 

हवेत संचार करीत असताना कीटकांना हवेचा रोध होत असतो व हा रोध दूर करण्यासाठी त्यांना खूप ऊर्जा खर्च करावी लागते. कीटकांचे पंख त्यांच्या शरीरावरील बाह्यावरणापासून तयार झालेले असतात व ते वक्षखंडावर सांधले गेले असून त्यांची वरखाली होणारी हालचाल सहजपणे होत असते. पंखांची हालचाल स्नायूंच्या नियंत्रणाखाली असते. य पंखांच्या वरखाली होण्याच्या हालचालीमुळे कीटक हवेत पुढे ढकलला जातो. फुलपाखरासारख्या कीटकांत पंखांचा वरखाली होण्याचा वेग प्रती सेकंदाला २५ असतो, तर मधमाशीसारख्या कीटकांत तो प्रती सेकंदाला ४०० च्या वर असतो. मीज कीटकात प्रती सेकंदाला १,००० वेळा पंखांचे स्पंदन होऊ शकते. काही कीटकांत हवेत एके ठिकाणी स्थिर राहण्याचीही पात्रता असते. उदा., सर्फिडी कुलातील माश्या. हवेत संचार करणाऱ्या बहुतेक सर्व कीटकांच्या शरीरात हवेने भरलेल्या पिशव्या असतात. या हवेच्या पिशव्यांमुळे कीटकांचे शरीर हलके बनून त्यांना हवेत तरंगत राहण्यास अडचण पडत नाही.

 

फुलपाखराच्या डिंभाचे शरीर अनेक खंडांचे बनलेले असते. तीन वक्षखंडांवर प्रत्येकी एक पायांची जोडी असते. यांशिवाय एकूण दहा उदरखंडांपैकी ३, ४, ५, ६ आणि १० या क्रमांकांच्या उदरखंडांवर प्रत्येकी एक उपांगांची जोडी असते. या उपांगांचा उपयोग पायासारखा संचलनासाठी होत असतो. तसेच डिंभाचे शरीर लांब, मऊ व लिबलिबित असल्याने शरीराला आधार देण्यासाठी या उदरखंडांवरील उपांगांच्या पाच जोड्यांचा उपयोग होतो. डिंभाचे पूर्ण कीटकात म्हणजेच फुलपाखरात रूपांतरण झाल्यावर उदरखंडांवरील उपांगे नष्ट होतात व फक्त वक्षखंडांवरील पायांच्या तीन जोड्याच कार्यक्षम असतात.

 

काही कीटक पाण्यात राहतात आणि त्यांच्यात संचलनाचे निरनिराळे प्रकार आढळतात. गेरीस, पोड्यूरा यांसारखे कीटक पाण्याच्या पृष्ठभागावर सहजपणे चालत असतात. या कीटकांच्या पायाच्या शेवटल्या खंडावर असंख्य न भिजणारे केस असतात. या केसांमुळे कीटकांना पाण्याच्या पृष्ठभागावर शरीर तोलून धरता येते. पाण्याचा पृष्ठभाग एखाद्या ताणलेल्या पटलासारखा असल्याने हे कीटक त्यावर सरसर चालू शकतात.

 

नेपा, डिटिस्कस यांसारख्या कीटकांना पाण्यात वेगाने पोहता येते. या कीटकांच्या पायांची तिसरी जोडी लांब व चपटी असून त्यांवर अनेक केस असतात. या पायांच्या जोडीचा वल्ह्यासारखा उपयोग होत असतो. हायड्रोकँपा या नावाचे पतंग आपली अंडी पाण्यातील वनस्पतींवर घालतात. एरवी जमिनीवर राहणाऱ्या या कीटकांना अंडी घालण्यासाठी पाण्यात शिरावे लागते. पाण्यात उतरल्यावर हे कीटक आपल्या पंखांचा उपयोग पोहण्यासाठी करतात. अंडी घातल्यावर हे कीटक पुन्हा जमिनीवर येतात व नंतर पंखांचा उपयोग उडण्यासाठी केला जातो.

 

डिटिस्कस, गायरिनस या कीटकांचे डिंभ व डासांचे डिंभ पाण्यात संचलन करण्यासाठी आपल्या शरीराची नागमोडी हालचाल करतात. चतुर या जमिनीवर आढळणाऱ्या कीटकाच्या प्राथमिक जीवनावस्था पाण्यात पुऱ्या होतात. चतुराच्या डिंभाला पायांच्या तीन जोड्या असतात आणि पायांच्या साह्याने तो पाण्याच्या तळावरून हळूहळू चालत असतो. डिंभाच्या अन्ननलिकेच्या पश्चांत्र (आतड्याच्या मागील) भागात गुदद्वारावाटे भोवतालचे पाणी घेतले जाते. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन पश्चांत्राभोवती असलेल्या श्वासनलिका ग्रहण करतात. नंतर हे पश्चांत्रामधील पाणी गुदद्वारावाटे बाहेर टाकले जाते आणि नवीन पाणी पुन्हा आत घेतले जाते. गुदद्वार गोल असून त्याचे क्षेत्रफळ ०·०१ चौ. मिमी. असते. जेव्हा डिंभाला संकटाची जाणीव होते त्या वेळी पश्चांत्रामधील पाणी जोराने बाहेर फेकले जाते. पश्चांत्राच्या बाह्यावरणाखाली असलेले स्नायू पश्चांत्राचे आकुंचन करण्यास मदत करतात. गुदद्वारावाटे पाणी बाहेर पडण्याचा वेग प्रती सेकंदाला २५० सेंमी. असतो. या जोराने बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या दाबाने डिंभाचे शरीर प्रती सेकंदाला ३० ते ५० सेंमी. या वेगाने पुढे ढकलले जाते. ही क्रिया वारंवार घडून डिंभ चपळपणे पाण्यात पोहत असतो.

 

स्टेनस जातीचे कीटक पाण्याच्या पृष्ठभागावर संचार करतात. या कीटकांची संचलनाची पद्धत मोठी मजेदार असते. या कीटकांच्या शेवटच्या उदरखंडामध्ये विशिष्ट ग्रंथी असतात. या ग्रंथींमधून झिरपणारा स्राव पाण्यात पडला की, पाण्याचा पृष्ठभागीय ताण कमी होऊन कीटक प्रत्येक सेकंदाला ४५ ते ७० सेंमी. या वेगाने पुढे ढकलला जातो. हा वेग या कीटकाच्या नेहमीच्या वेगाच्या २५ ते ३५ पट जास्त असतो. व्हेलिया या जातीच्या पाण्यावर राहणाऱ्या कीटकात सुद्धा अशाच प्रकारचे संचलन आढळते. स्राव पाण्यावर पडला की, हा कीटक प्रती सेकंदाला १०-२५ सेंमी. या वेगाने पुढे ढकलला जातो.

 

आर्थ्रोपोडा प्राणिसंघातील विंचू, कोळी, गोचीड इ. प्राण्यांना पायांच्या चार जोड्या असतात. पायांच्या साह्याने हे प्राणी जमिनीवर चालतात. कोळी जमिनीवरून उड्या मारीत संचलन करतात.

 

गोगलगाय, सेपिया, ⇨ ऑक्टोपस इ. प्राण्यांचा मॉलस्का (मृदुकाय) प्राणिसंघात समावेश होतो. गोगलगायीच्या शरीराचा खालील भाग चपटा, मांसल आणि स्नायुयुक्त असतो. याला पाय म्हणतात. पायात असणाऱ्या स्नायूंच्या साह्याने हा प्राणी सावकाश पुढे सरकत असतो, या प्राण्याला आर्थ्रोपॉड संघातील प्राण्यांसारख्या पायांच्या जोड्या नसतात. गोगलगायीचे शरीर शंखाने संरक्षिलेले असते. ⇨कालव या पाण्यात राहणाऱ्या प्राण्याचे शरीर दोन कवचांनी झाकलेले असते. या प्राण्यांना नांगराच्या आकाराचा मजबूत पाय असतो. या पायाच्या साह्याने वाळूतून किंवा चिखलातून हा प्राणी पुढे सरकत असतो. सेपिया व ऑक्टोपस या प्राण्यांना पाण्यात पाठीमागे किंवा पुढे पोहता येते. सेपियाच्या शरीरावर परांची एक जोडी असते. तिच्या साह्याने हे प्राणी पाण्यात पोहतात. या प्राण्याचे कल्ले शरीरात पुढील भागात असणाऱ्या पोकळीत असतात. एका रुंद नळीवाटे समुद्रातील पाणी या पोकळीत घेतले जाते. ज्या वेळी सेपियाला संकटाची जाणीव होते त्या वेळी या पोकळीतील पाणी नळीवाटे जोराने बाहेर फेकले जाते आणि यामुळे सेपिया वेगाने मागे सरकतो. ३ मी. लांब शरीर आणि ९ मी. लांबीचे स्पर्शक असणारे हे प्राणी अशा तऱ्हेने जोराने पाणी बाहेर फेकल्यामुळे केव्हाकेव्हा मोठ्या जहाजावर जाऊन पडल्याचे प्रसंग नमूद करण्यात आले आहेत.

 


 

एकायनोडर्माटा (कंटकचर्मी) प्राणिसंघातील अँटेडॉन प्राणी समुद्राच्या तळाशी राहतात. ते कायमचे दगडाला चिकटून राहत असल्याने त्यांच्यात संचलन नसते. ⇨ तारामीन या प्राण्याला पाच बाहू असतात. प्रत्येक बाहूच्या खालच्या भागावर नलिकांसारखे असंख्य पाय (नालपाद) असतात. पायाच्या टोकाकडील भाग चपटा असतो. हे पोकळ पाय तारामिनाच्या शरीरात असणाऱ्या एक चक्राकार व पाच सरळ नळ्यांनी युक्त असलेल्या तंत्राशी (जलवाहिका तंत्राशी) जोडलेले असतात. या नळ्यांमधून पाणी फिरत असते. जेव्हा हे प्राणी पायांत शिरते, तेव्हा नलिका लांब होऊन तारामीन या पायांवर आपला तोल व वजन सांभाळतो आणि पायांच्या हालचालींमुळे संचलन करतो. जेव्हा या पायांतील पाणी शरीरातील सरळ आणि चक्राकार नलिकांत खेचले जाते त्या वेळी हे पाय आकुंचन पावतात आणि तारामिनाची हालचाल थांबते.

 

याच संघातील अर्चिन या प्राण्याच्या तोंडाजवळील भागात पाच दातांची विशिष्ट रचना आढळते. हे दात पूर्वी ग्रीक लोक वापरीत असलेल्या दिव्यासारखे दिसतात म्हणून त्यांना ‘ॲरिस्टॉटलचा कंदील’ असेही म्हणतात. या दातांचा उपयोग केवळ अन्नाचे तुकडे करण्यासाठीच होतो असे नसून संचलनासाठीही होतो. या प्राण्याला तारामिनासारखे नालपाद असतात. शरीरावर असणाऱ्या असंख्य काट्यांचा व या पायांचा संचलनासाठी उपयोग होतो. ⇨ मंगुरतारा (ब्रिटल स्टार) या प्राण्याच्या गोलाकार शरीरावर पाच लांब आणि निमुळते बाहू असतात. या बाहूंत असणाऱ्या स्नायूंच्या साह्याने बाहूंचे आकुंचन व प्रसरण होते आणि बाहूंच्या हालचालीमुळे हा प्राणी संचलन करू शकतो.

 

अशा तऱ्हेने अपृष्ठवंशी प्राणी पाण्यात किंवा जमिनीवर संचलन करण्यासाठी आपले सर्व शरीर, उपांगे, विशिष्ट ग्रंथींमधील स्राव इत्यादींचा उपयोग करतात.

 

पृष्ठवंशीप्राणी : पृष्ठवंशी प्राणी पाण्यात किंवा जमिनीवर राहतात आणि पक्ष्यांसारखे काही प्राणी हवेतही उडू शकतात. भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे प्राणी पाण्यात पोहून, जमिनीवर चालून, धावून अगर उड्या मारून आणि हवेत तरंगत राहून संचलन करतात. पोहणे, चालणे अगर धावणे आणि उडणे या निरनिराळ्या संचलनाच्या पद्धतींविषयी खाली माहिती दिली आहे.

 

पाण्यातपोहणे : मासे, बेडूक, सुसर, बदके, देवमासे, सील इ. प्राणी पाण्यात राहतात. पाण्यात संचलन करण्यासाठी हे प्राणी आपल्या शरीराचा, शरीरावरील परांचा, शेपटीचा किंवा पायांचा उपयोग करतात. पोहण्याच्या क्रियेशी प्राण्यांच्या शरीराचा आकार आणि हालचाल यांचा संबंध असतो.

 

माशांचे शरीर लांबट असून पुढील बाजू रुंद असते. शरीर पाठीमागे हळूहळू अरुंद होत जाते. त्यामुळे शरीर पाण्यातून पुढे जात असताना पाणी सहजपणे कापले जाऊन पाण्याचा रोध होत नाही. माशाच्या पाठीच्या कण्यामध्ये मणक्यांची जी रांग असते तीतील मणक्यांची फक्त एकाच पद्धतीने हालचाल होत असते म्हणून शरीरातील स्नायू आकुंचन पावत असले, तरी या दृढ मणक्यांमुळे शरीर आकुंचन पावत नाही. मासा पोहताना आपले पर आणि शेपटी चपळपणे शरीराच्या दोन्ही बाजूंना वळवून पाणी दूर सारीत असतो. त्याच वेळी शरीराची हालचाल होऊन पुढील पाणी कापले जाते. शेपटी जेव्हा डाव्या बाजूला वळलेली असते त्या वेळी माशाचे डोके उजवीकडे वळते आणि शेपटी ज्या वेळी उजवीकडे वळते त्या वेळी डोके डावीकडे वळते. वल्ह्याच्या उपयोगाने जशी होडी पाण्यात पुढे सरकत असते, तसेच शेपटीच्या साह्याने माशाचे शरीर पाण्यात पुढे सरकत असते. शेपटी जितक्या जलद गतीने हालचाल करत असते तितक्याच जलद गतीने मासा पाण्यात पुढे सरकत असतो. ३·७५ सेंमी. लांबीचा ट्राउट मासा आपली शेपटी दर सेकंदाला २४ वेळा हालवीत असतो, त्यामुळे हा मासा एका तासात २·५ किमी. या वेगाने अंतर काटीत असतो. सु. २८ सेंमी. लांबीचा ट्राउट मासा आपली शेपटी दर सेकंदाला १६ वेळा हालवीत असतो व त्या वेळी तो ताशी १०·५ किमी. वेगाने पोहत असतो. पाण्यातून पोहताना माशाला पाण्याचा रोध होत असतो व हा रोध दूर करून त्याला प्रगती करावयाची असते. यासाठी त्याला शरीरातील स्नायूंचे बळ वापरावे लागते. सर्वसाधारणपणे माशाला आपल्या वजनाच्या / इतका पाण्याचा रोध दूर करावा लागतो.

 

बॅराकुडा हा मासा अतिशय चपळपणे पोहू शकतो. १·२ मी. लांब व ९ किग्रॅ. वजन असलेला बॅराकुडा ताशी ४३ किमी. वेगाने पाण्यात पोहत असतो. माशाला शरीराच्या विशिष्ट आकारामुळे तो पाण्यातून पुढे सरकत असताना त्याने दूर सारलेले पाणी शरीराच्या वरील व बाजूच्या भागांवरून सहजपणे पाठीमागे जाते. तसेच शेपटी दोन्ही बाजूंना फडफडविल्यामुळे पाणी शरीरापासून बाजूला फेकले जाते आणि माशाच्या गतीला चालना मिळते. [⟶ बॅराकुडा].

 

माशासारखाच शरीराचा आकार असणाऱ्या व पाण्यात जलदपणे पोहू शकणाऱ्या इतर पृष्ठवंशी प्राण्यांची अनेक उदाहरणे देता येतील. सरीसृप प्राणिवर्गातील मगर, सुसर पक्षी वर्गातील कार्मोरंट, बदके सस्तन प्राणिवर्गातील सील, देवमासा, बीव्हर हे प्राणी पाण्यात सुलभपणे पोहू शकतात. प्राण्यांच्या वाढत्या आकारमानाप्रमाणे त्यांच्या पाण्यातील पोहण्याच्या वेगामध्ये वाढ होत असते परंतु एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच ही वाढ होत असल्याचे आढळले आहे. या मर्यादेच्या पुढे आकारमान वाढले, तरी या प्राण्यांचा पाण्यातील वेग कायम राहतो. म्हणूनच पॉरपॉइज व प्रचंड लांबीचा देवमासा यांचा पाण्यात पोहण्याचा वेग एकच असतो. पाण्यात पोहताना प्राण्यांना पाण्याचा विरोध दूर करण्यासाठी स्नायूंचे बळ वापरावे लागते. शास्त्रज्ञांच्या मते या कामासाठी प्रचंड बलाची आवश्यकता असते. मौंट एव्हरेस्ट शिखरावर एक तासात चढण्यासाठी अंदाजे जेवढे बल आणि कार्यशक्ती माणसाला लागली असती तेवढेच बल प्राण्यांना पाण्यातून पोहताना लागले असते. कारण पाण्याचा दाब, वजन इ. बरेच असते परंतु प्रत्यक्षात असे घडत नाही कारण प्राण्यांच्या शरीराचा आकार, स्नायू व अवयव विशिष्ट तऱ्हेने कार्य करतात व त्यामुळे अशा प्रचंड बलाची आवश्यकता नसते.

 


जमिनीवरचालणेवधावणे : जमिनीवर राहणारे प्राणी जमिनीवरून चालतात, उड्या मारतात अगर धावतात. या पृष्ठवंशी प्राण्यांना पायांच्या दोन जोड्या असतात. या पायांच्या हालचालींमुळे हे प्राणी संचलन करतात. हे पाय शरीराचे वजन पेलतात व शरीराचा मध्यबिंदू चारी पायांमध्ये पडत असल्याने प्राणी उभे असताना, चालताना अगर धावताना शरीराचा तोल सांभाळू शकतात. कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांचा मध्यबिंदू चारी पायांच्या मध्ये असतो. घोड्याच्या शरीराचे बहुतेक वजन पुढील पायांवर पडत असते कारण शरीराचा मध्यबिंदू पुढील भागी झुकलेला असतो. म्हणूनच घोडा पुढील पायांवर उभा राहून शरीराचा तोल सांभाळतो व मागील पाय उचलून लाथा अगर दुगाण्या झाडतो. ही क्रिया करताना तो पडत नाही. त्याचप्रमाणे एकमेकांशी झगडताना किंवा सर्कशीतल्या रिंग मास्तरने आज्ञा केल्यावर घोडे आपल्या पाठीमागील पायांवर वजन पेलून ताठ उभे राहतात. या वेळी पुढील पाय उचललेले असतात व शरीराचा मध्यबिंदू शरीराच्या मागील भागाकडे केंद्रित केलेला असतो. ससे, खारी, उंदीर, अस्वले इ. प्राणी आपल्या मागील पायांच्या जोडीवर शरीराचा तोल सांभाळून शरीर उभे करतात व पुढील पायाचा उपयोग भक्ष्य धरण्यासाठी अगर प्रतिकार करण्यासाठी करतात. या वेळी त्यांचा मध्यबिंदू पाठीमागील भागाकडे झुकलेला असतो. ⇨ कांगारू या प्राण्याला चार पाय असतात. पुढील पायांची जोडी आखूड असते व तिचा संचलनासाठी उपयोग होत नाही. भक्ष्य धरण्यासाठी अगर प्रतिकार करण्यासाठी ती उपयोग पडते. पायांची मागील जोडी मजबूत व मोठी असते. तसेच कांगारूची शेपटी रुंद आणि लांब व मजबूत असते. आपले मागील मजबूत पाय व रुंद शेपटी यांच्या साह्याने कांगारू लांब लांब उड्या मारीत असतात. इतर प्राण्यांमध्ये पायांमुळे संचलन कसे होते, याचा विचार त्या त्या प्राणिवर्गाच्या अनुषंगाने पुढे केलेला आहे.

 

चतुष्पाद प्राण्यांचा संचलनाच्या वेळी पायांची हालचाल कीटकांच्या पायांच्या हालचालीसारखीच होत असते. हे प्राणी आपला उजवा पुढील पाय पुढे सरकविल्यावर लगेच मागील डावा पायही पुढे नेतात. या वेळी उजवा मागील पाय व पुढचा डावा पाय यांवर शरीराचे वजन व तोल सांभाळला जातो. पुढे सरकविलेले पाय जमिनीवर टेकविल्यावर प्रथम टेकविलेल्या पायांचा शरीराला रेटा देऊन शरीर पुढे ढकलून हे पाय जमिनीपासून वर उचलून पुढे नेले जातात. ही क्रिया क्रमाने होते आणि प्राणी पुढे चालत राहतो. हे प्राणी केव्हाही अनपेक्षितपणे थांबायचे झाल्यास तोल ढळू न देता शरीर पेलू शकतात. तसेच या क्रिया चपळपणे झाल्यास प्राणी जमिनीवरून धावत असतो. चपळपणे धावण्याच्या क्रियेत तोल ढळण्याची भिती नसते.

 

कुत्रा, मांजर, घोडा, चित्ता इ. प्राणी धावताना आपल्या मागील दोन्ही पायांनी रेटा देऊन शरीर पुढे ढकलतात. या वेळी पुढील दोन्ही पाय ताठ करून जमिनीवर टेकविले जातात. नंतर शरीर वळवून मागील पायांची जोडी पुढील पायांजवळ आणून जमिनीवर टेकविली जाते. या पायांचा पुन्हा रेटा देऊन शरीर पुढे ढकलले जाते व या वेळी पुढील पाय जमिनीवरून उचलून ताठ करून पुढे नेले जातात व जमिनीवर टेकविले जातात. ही क्रिया जलद गतीने होऊन हे प्राणी वेगाने धावत असतात. जलद गतीने धावणाऱ्या प्राण्यांच्या पायांची हालचाल नुसत्या डोळ्यांनी पाहून समजणे शक्य नसते. याचा अभ्यास सेकंदाला २०० चित्रे घेऊ शकणाऱ्या कॅमेऱ्याच्या साह्याने शास्त्रज्ञांनी केला आहे. घोड्याच्या संचलनाची चलच्चित्रे घेण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न १८७२ साली एडवर्ड माइब्रिज या इंग्रज छायाचित्रकारांनी २४ कॅमेरे एका रांगेत ठेवून केला. सस्तन प्राण्यांच्या संचलनाचा दीर्घ अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना असे आढळले की, संचलनाच्या वेळी पायातील हाडे व त्यांना जोडलेले स्नायू यांच्यावर शरीराचे वजन येते एवढेच नाही, तर जमिनीवर ते तरफेप्रमाणे वापरले जातात. जेव्हा प्राणी जमिनीवर सावकाश चालत असतो त्या वेळी पुढीलप्रमाणे क्रिया घडतात. (१) जेव्हा मागील पाय कंबरेच्या मागील बाजूस असतो त्या वेळी या पायाच्या पश्च सरण स्नायूंमुळे शरीरास पुढे ढकलण्याचा जोर केला जातो. (२) नंतर गुडघ्याचा सांधा हळूहळू सरळ बनतो आणि स्नायूंच्या मदतीशिवाय पाय एखाद्या बांबूसारखा सरळ होऊन शरीर पुढे व वरच्या बाजूस रेटण्यास सुरुवात करतो.

 

हवेतउडणे : पृष्ठवंशी प्राणिवर्गात फक्त पक्षी आणि सस्तन प्राण्यांपैकी फक्त वटवाघळे हवेत सुलभपणे उडू शकतात. काही सरडे (ड्रॅको) आणि खारी [⟶ उडणाऱ्या खारी] आपल्या दोन पायांच्या जोडीमध्ये असणाऱ्या पातळ कातळी पडद्यामुळे हवेत काही काळ तरंगू शकतात. यामुळे त्यांना झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाणे सुलभ जाते. फार पुरातन काळी पृथ्वीवर वावरणारे परंतु आता नष्ट झालेले सरीसृप वर्गातील टेरोसॉर नावाचे प्राणी [⟶ टेरोडॅक्टिल] हवेत उडू शकत होते. या प्राण्यांच्या पायाच्या पुढील जोडीचा पंखासारखा उपयोग केला जात असे. या पायाच्या निरनिराळ्या बोटांना जोडणारा कातडीचा पडदा शरीराच्या दोन्ही बाजूंवर चिकटलेला असल्याने त्याचा पंखासारखा उपयोग होत असे.

 

पृष्ठवंशी प्राण्यांत पक्षी फार सुलभतेने हवेत उडू शकतात. या पक्ष्यांना ‘कॅरिनॅटी’ या संज्ञेने संबोधतात. शहामृग, किवी यांसारखे पक्षी उडू शकत नाहीत. ते जमिनीवर धावतात. त्यांना ‘रॅटिटी’ अशी संज्ञा आहे.

 

पक्ष्यामध्ये पायाच्या पुढील जोडीचे पंखात रूपांतर झालेले असते. पायाच्या पाठीमागच्या जोडीचा जमिनीवरून चालण्यासाठी अगर उड्या मारण्यासाठी (उदा., चिमणी, कावळा) उपयोग होतो. पक्ष्यांच्या छातीचे स्नायू बळकट असतात. तसेच पक्ष्यांची हाडे पोकळ असल्याने ती वजनाने कमी असतात. हवेत उडताना श्वसनासाठी हवेचा भरपूर पुरवठा व्हावा यासाठी पक्ष्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. पंखावर पिसे असून ती हवा मागे ढकलण्यास उपयुक्त असतात. पंख पुढेमागे व वरखाली हालचाल करू शकतात. घारी, गिधाडे यांसारखे पक्षी आपले पंख स्थिर ठेवून हवेच्या प्रवाहाबरोबर आकाशात वरखाली होत असतात व या अवस्थेत ते दीर्घ काळ राहू शकतात. पंखांच्या स्पंदनाचा वेग निरनिराळ्या पक्ष्यांत निरनिराळा असतो. उदा., मोठ्या आकारमानाच्या बक (हेरॉन) पक्ष्यात सेकंदाला सु. २, कुरव (गल) पक्ष्यात ५, कबुतरात १० व हमिंग पक्ष्यात ५० असे हे प्रमाण असते. हमिंग पक्षी हवेमध्ये एकाच जागी स्थिर राहू शकतो किंवा मागे सरू शकतो. तो ज्या वेळी स्थिर असतो त्या वेळी स्पंदनाचे प्रमाण प्रती सेकंदाला ५० असते, तो ज्या वेळी हवेत मागे सरकतो त्या वेळी सेकंदाला ६१ असते व ज्या वेळी सरळ पुढे उडतो त्या वेळी सेकंदाला ७५ असते. हवेत वळण्यासाठी व जमिनीवर उतरण्यासाठी पक्ष्यांना आपल्या शेपटीचा फार उपयोग होतो.

 

सस्तन प्राणिवर्गात फक्त वटवाघळांना पंखांसारखे अवयव असतात. वटवाघळांच्या पायांच्या पुढील जोडीचे पंखात रूपांतरण झालेले असते. या पायांच्या बोटांची लांबी वाढलेली असते व बोटांना जोडणारी कातडी फार पातळ असते. या पातळ कातडीचा पंखासारखा उपयोग होतो. पंखाची आतील बाजू अंतर्वक्र असते. यामुळे हवेत उडताना या बाजूने कीटक पकडता येतात. पायाची मागील जोडी आखूड असून दगड, झाडाची फांदी वगैरेंना उलटे लोंबकळून वटवाघूळ विश्रांती घेते. [⟶ प्राण्यांचे उड्डाण].

 


काहीमहत्त्वाच्याप्राण्यांचेसंचलन : पृष्ठवंशी प्राण्यांपैकी काही महत्त्वाच्या प्राण्यांच्या संचलनाची माहिती प्राणिवर्गांच्या अनुषंगाने खाली दिली आहे.

 

मासे : मासे पाण्यात राहतात व ते सहजपणे पोहतात. पेरिऑफ्‌थॅलमस या नावाचे मासे पुढील परांच्या जोडीच्या साह्याने काठावर येऊन चिखलात खुरडत चालतात किंवा झाडावर चढू शकतात. एक्झॉसीटसवंशातील मासे पाण्यात पोहत असताना एकदम पाण्याबाहेर उसळी मारून आपल्या परांच्या हालचालीच्या साह्याने हवेत कित्येक मीटर पुढे सरकून पुन्हा पाण्यात पडतात [⟶ उडणारे मासे].

 

उभयचरप्राणी : बेडूक पाण्यात आणि जमिनीवर राहतो. याच्या मागील पायांची जोडी लांब व बळकट असते. तसेच बोटांमध्ये पातळ कातडी असते. त्यामुळे हा प्राणी जमिनीवर उड्या मारू शकतो व पाण्यात पोहू शकतो. ऱ्हॅकोफोरस नावाचे बेडूक एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारून हवेतून तरंगत जाऊ शकतात. [⟶ बेडूक].

 

सरीसृपप्राणी : सुसर, मगर, काही जातीचे सर्प पाण्यात राहत असले, तरी पाली, सरडे असे सरीसृप प्राणी जमिनीवर राहतात. पाणसर्पांची शेपटी टोकाला चपटी असल्याने ते पोहू शकतात. ⇨ ड्रॅकोनावाचे सरडे हवेत तरंगू शकतात, तर काही जातींचे सरडे जमिनीवर मागील दोन पायांच्या साह्यानेच पळतात.

 

पक्षी : पक्ष्यांच्या उडण्याची माहिती वर दिलेली आहे.

 

सस्तनप्राणी : बहुतेक सर्व प्राण्यांना पायांच्या दोन जोड्या असून ते जमिनीवर चालतात किंवा धावतात परंतु काही सस्तन प्राणी झाडांवरून संचलन करतात. ⇨स्लॉथ हा प्राणी आपल्या पायांनी झाडांच्या फांदीला घट्ट धरून वटवाघळासारखा उलटा लोंबकळत असतो. याच्या बोटांना लांब नखे असल्याने झाडांच्या फांद्या घट्ट पकडल्या जातात. गिबनसारख्या माकडाचे पुढील पाय लांब असतात त्यामुळे फांदीवर लोंबकळत राहून किंवा उड्या मारून ते संचलन करतात. काही जातींची माकडे आपल्या शेपटीचा फांदीला विळखा घालून तोल सांभाळीत असतात किंवा हवेत लोंबकळत असतात. गोरिला, ओरँगउटान आणि मनुष्य आपल्या मागील पायांवर शरीराचा तोल आणि वजन सांभाळून ताठ उभे राहतात व चालू शकतात. विश्रांती घेताना गोरिला व ओरँगउटान जमिनीवर हात टेकतात. ज्या जमिनीवरून प्राण्यांना संचलन करावयाचे असते त्या जमिनीच्या प्रकाराप्रमाणे प्राण्यांच्या पायांचे तळवे व बोटे यांच्या रचनेत फरक होत असतो. म्हणूनच कठीण जमिनीवरून पळण्यासाठी घोडे, गुरे, हरणे या प्राण्यांच्या पायांना खूर असतात. हरणांचे पाय सडपातळ व लांब असतात. त्यामुळे जंगलात संकटाच्या वेळी ती लांब लांब उड्या मारून स्वतःचा बचाव करतात. जिराफाची मान व पुढील पाय खूप लांब असतात. हा प्राणी सावकाश ढांगा टाकीत पळत असतो. रानडुकराचे पाय आखूड असतात व त्याच्या ढांगा आखूड असल्या, तरी त्या भराभर टाकत असल्याने त्याचा पळण्याचा वेग जिराफाइतका असतो. जर ढांगा टाकण्याचा वेग जास्त असेल, तर पायाच्या स्नायूंचे आकुंचनही जलद व्हावयास हवे परंतु जे स्नायू लांब असतात ते सावकाश आकुंचन पावतात त्यामुळे मोठ्या आकारमानाच्या प्राण्यामध्ये ढांगा टाकण्याचा वेग कमी असतो.

 

वाळवंटात राहणाऱ्या उंटाचे पाय वाळूत रुतू नयेत म्हणून चपटे व रुंद असतात. सिंह, वाघ, हत्ती यांसारखे गवताळ भागात राहणाऱ्या प्राण्यांच्या पायांचे तळवे मऊ असतात. पॉरपॉइज, सील, देवमासा इ. प्राणी पाण्यात राहतात व आपल्या शरीराच्या परांच्या व शेपटीच्या हालचालींमुळे पोहू शकतात. या प्राण्यांच्या शरीरात खांद्यापासून शेपटीपर्यंत बळकट स्नायू असतात. तसेच शेपटीजवळ दोन पर असतात. यांचा उपयोग पोहण्यासाठी होतो. पॉरपॉइज ताशी ३२ किमी. वेगाने जाणाऱ्या जहाजाच्या बरोबरीने पोहू शकतात.

 

अशा तऱ्हेने प्राणी सावकाश किंवा जलद संचलन करतात. काही मंदगती प्राणी शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करतात. गोगलगाय संकटाच्या वेळी आपले मऊ शरीर शंखामध्ये ओढून घेते, तर साळिंदरासारखा प्राणी शत्रूवर आपल्या अंगावरील तीक्ष्ण काटे फेकून शत्रूला बेजार करतो. अशा प्रकारे प्राण्यांच्या जीवनात संचलनाला फार महत्त्व आहे.

 

संदर्भ : 1. Gray, J. Animal Locomotion, London, 1968.

            2. Gray, J. How Animals Move, London, 1953.

            3. Howel, A. B. Speed in Animals, Chicago, 1944.

 

रानडे, द. र.