डेडेकिंट, यूलिउस (व्हिल्हेल्म रिखार्ट) : (६ ऑक्टोबर १८३१–१२ फेब्रुवारी १९१६). जर्मन गणितज्ञ. ⇨ संख्या सिद्धांतातील महत्त्वपूर्ण कार्याकरिता प्रसिद्ध. ते ब्रंझविक येथे जन्मले. १८४८ मध्ये कॅरोलायना महाविद्यालयात प्रवेश करून तेथे प्रगत बीजगणित, ⇨ कलनशास्त्र व उच्च यामिकी (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांसंबंधीचे शास्त्र) या विषयांचा त्यांनी अभ्यास केला. १८५० मध्ये त्यांनी गटिंगेन विद्यापीठात प्रवेश केला व तेथे कलनशास्त्र, उच्च अंकगणित, भूगणित, प्रायोगिक भौतिकी या शाखांचा सखोल अभ्यास केला. के. एफ्. गौस यांच्या मार्गदर्शनाखाली ऑयलेरीय समाकल या विषयावर प्रबंध लिहून १८५२ मध्ये त्यांनी पीएच्.डी. मिळविली. गटिंगेन विद्यापीठात १८५४ साली त्यांची व्याख्याता म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर १८५८ मध्ये झूरिक येथील तंत्रनिकेतनामध्ये ते प्राध्यापक झाले परंतु १८६२ मध्ये ते ब्रंझविक येथे तांत्रिक उच्च विद्यालयात प्राध्यापक म्हणून गेले व अखेरपर्यंत त्यांनी तेथेच काम केले. 

जी. पी. एल्. डिरिक्ले यांच्या संख्या सिद्धांतावरील ग्रंथाचे (१८६३) संपादन करून डेडेकिंट यांनी त्यात स्वतःची महत्त्वपूर्ण भर घातली. ⇨ एव्हारीस्त गाल्वा यांच्या सिद्धांताचे अंकगणित व बीजगणित यांमधील महत्त्व डेडेकिंट यांनीच प्रथम ओळखले. त्यांचे मुख्य कार्य म्हणजे अपरिमेय (पूर्णांकांच्या गुणोत्तराच्या स्वरूपात मांडता येत नाहीत अशा) संख्याच्या विषयीची मांडणी हे होय. अपरिमेय संख्या म्हणजे दोन परिमेय संख्या संचांमध्ये घेतलेला छेद, ही कल्पना डेडेकिंट यांनी मांडली व हाच ‘डेडेकिंट छेद’ म्हणून ओळखला जातो. सांतत्य व अनंतता [⟶ अनंत–१] या संकल्पनांच्या आधुनिक मांडणीमध्ये डेडेकिंट यांचे नाव के. टी. व्हायरश्ट्रास व जी. कँटर यांच्या बरोबरीने घ्यावे लागते. बैजिक संख्यांच्या विषयीचे त्यांचे संशोधन मौलिक स्वरूपाचे आहे. संख्या सिद्धांतामधील ‘गुणजावली’ (आयडियल) ही महत्त्वाची संकल्पना त्यांनीच मांडली व त्यामुळे अंकगणितामधील पायाभूत प्रमेयाचे व्यापकीकरण शक्य झाले. वलय व एकक या आधुनिक अमूर्त बीजगणितातील संकल्पनाही त्यांनीच प्रथम मांडल्या. 

ज्या मोठमोठ्या गणितज्ञांकडून त्यांनी प्रेरणा घेतली, त्यांचे संशोधन संकलित करून संपादण्याचे काम त्यांनी आवर्जून केले. त्यांमध्ये गौस, डीरिक्ले व जी. एफ्. बी. रीमान यांचा समावेश होतो. ते गटिंगेन (१८६२), बर्लिन (१८८०). पॅरिस (१९१०) व रोम येथील ॲकॅडेमींचे सदस्य होते. ख्रिस्तीना व ब्रंझविक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या बहाल केल्या. त्यांचे कार्य तीन खंडांत (Gesammelte Mathematische Werke, १९३०–३२) संग्रहित करण्यात आले आहे. त्यांचा एसेज ऑन द थिअरी ऑफ नंबर्स हा ग्रंथ इंग्रजीत १९२४ मध्ये प्रसिद्ध झाला. ते ब्रंझविक येथे मृत्यू पावले.

ओक, स. ज.