जैन साहित्य : जैन धर्मीयांनी संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश तसेच तमिळ, कन्नड इ. प्राचीन व देशी भाषांतून विपुल साहित्यनिर्मिती करून साहित्याच्या प्रत्येक विभागात मोलाची भर घातलेली आहे. आगम, पुराणे, तत्त्वज्ञान, कर्मसिद्धांत, आचार इ. विषय तसेच कथा, काव्य, स्तुती, व्याकरण, छंद, कोश इ. वाङ्‌मयप्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. जैनांचे मूळ आगमवाङ्‌मय अर्धमागधी व शौरसेनी या प्राकृत भाषांत आहे. नंतर त्यांनी आपल्या मौलिक वाङ्‌मयासाठी व टीका लिहिण्यासाठी संस्कृत भाषेचाही उपयोग केला. अपभ्रंश भाषेतही महापुराण, चरित्रे, कथा इ. प्रकारांतील वाङ्‌मय त्यांनी निर्माण केले आहे. प्राकृत भाषेतील त्यांचे कथावाङ्‌मय तर विपुल व विशेष समृद्ध आहे. यांशिवाय हिंदी. गुजराती, तमिळ, कन्नड या प्रादेशिक भाषांतूनही मोलाचे वाङ्‌मय त्यांनी निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे आगमग्रंथांवरील जैनांचे विपुल टीकावाङ्‌मय निर्युक्ती, भाष्य, चूर्णी आणि टीका या स्वरूपात उपलब्ध आहे. महावीरांनी अर्धमागधी या लोकभाषेतून आपल्या धर्माचा उपदेश केला. त्यांच्या प्रमुख शिष्यांनी (गणधरांनी) तो उपदेश सूत्ररूपाने ग्रथित केला. गणधरांनंतर झालेल्या त्यांच्या शिष्यांनी व अनेक आचार्यांनीही मूळ धार्मिक वाङ्‌मयाला अनुलक्षून त्यातील विषय स्पष्ट करण्यासाठी इतर साहित्य निर्माण केले.

जैन लोक असे समजतात, की महावीरांपूर्वी एवढेच नव्हे, तर अगदी पहिल्या तीर्थकरांपासून चौदा ‘पूर्वग्रंथ’ व अकरा ‘अंगग्रंथ’ अस्तित्वात होते परंतु या म्हणण्याला काही पुरावा नाही. महावीरांच्या वेळेपासून मात्र पूर्वग्रंथ होते व महावीर ते गणधरांना शिकवीत असत, यासंबंधी उल्लेख मिळतात. शिवाय चौदा पूर्व जाणणारे जे विद्वान आचार्य होऊन गेले, त्यांना ‘चउद्दसपुव्वी’ (चतुदर्शपूर्विन्) म्हणत. त्यांच्या नावांची यादीही उपलब्ध आहे. महावीरांनंतर असे आठ चउद्दसपुव्वी होऊन गेले. त्यांपैकी भद्रबाहू हे शेवटचे. त्यानंतर सात आचार्यांना दहा पूर्वांचे ज्ञान होते आणि महावीरांनंतर ९८० वर्षांनी पूर्वग्रंथांचे ज्ञान लुप्त झाले.

चौदा ‘पूर्व’ म्हणजे जैन आगमांचा सर्वांत प्राचीन भाग होय. तो भाग अस्तित्वात असतानाच गणधरांनी अकरा अंगांची रचना केलेली होती. कालांतराने चौदा पूर्वांचा समावेश दिट्‌ठिवाय  (दृष्टिवाद) नावाच्या बाराव्या अंगात केलेला होता. चौदा पूर्व नष्ट झालेले असले, तरी त्यांत काय विषय आले असावेत, याची कल्पना दुसऱ्या आगमग्रंथात दिलेल्या त्यांच्या विषयसूचीवरून करता येते. अंगग्रंथांचीही संख्या प्रथम बारा होती परंतु दिट्‌ठिवाय  नावाचा बारावा अंगग्रंथ महावीरांनंतर दोन शतकांतच नाहीसा झाला.

महावीरांच्या प्रमुख शिष्यांनी आणि त्यांच्यानंतर झालेल्या अनेक आचार्यांनी जे साहित्य निर्माण केले त्याचे (१) अंगप्रविष्ट व (२) अंगबाह्य असे भाग करण्यात येतात. पहिल्या भागामध्ये बारा अंगांचा समावेश होतो व दुसऱ्या भागामध्ये सामायिक, चतुर्विशतिस्तव  इ. चौदा ग्रंथांचा समावेश होतो परंतु दिगंबर जैनांच्या मतानुसार मात्र हे सर्व ग्रंथ क्रमाक्रमाने नष्ट झालेले आहेत. निदान मूळ स्वरूपात तरी ते आता उपलब्ध नाहीत.

श्वेतांबरांचे आगमग्रंथ : श्वेतांबरांच्या अर्धमागधी वाङ्‌मयाविषयी माहिती देण्यापूर्वी प्रचलित वाङ्‌मय केव्हा निर्माण झाले, याविषयी थोडी चर्चा करणे उपयुक्त ठरेल. इ.स. पू. ३०० च्या सुमारास पाटलिपुत्र येथे व इ. स. ३१३ च्या सुमारास मथुरा येथे परिषद भरवून आगमग्रंथ एकत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढे इ. स. पू. ४५४ मध्ये वलभी (सौराष्ट्र) येथे भरलेल्या परिषदेत देवर्धिगणी क्षमाश्रमण यांच्या अध्यक्षतेखाली श्वेतांबर सिद्धांतांचे (आगमांचे) पुस्तकारोहण करण्यात आले. आगमग्रंथांची जुळवाजुळव करणे आणि त्या ग्रंथांच्या अनेक प्रती काढणे, ही महत्त्वाची कामगिरी देवर्धिगणीने केली. उपलब्ध श्रुताला त्यांनी व्यवस्थित रूप दिले. महावीरनिर्वाणानंतर ९८० वर्षांनी हे पुस्तकारोहण झाले. या दीर्घ कालावधीत आगमग्रंथांच्या भाषेमध्ये फरक पडणे अनिवार्य होते. शिवाय आगमांतील सर्व ग्रंथांची रचना एके काळी आणि एका व्यक्तीकडून झालेली नाही. आगमांतील सर्वांत जुना भाग आणि नवीन भाग यांच्या भाषेतील फरक स्पष्टपणे दिसून येतो. वलभीपरिषदेत देवर्धिगणींच्या देखरेखीखाली पुस्तकारोहण झाल्यानंतर मात्र आगमग्रंथांच्या भाषेचे नूतनीकरण थांबले आणि ते ग्रंथ त्याच रूपात आजपर्यंत टिकून राहिले.

चंद्रगुप्त मौर्य राज्य करीत असता (कार. ३२४–३०० इ.स.पू.) मगध देशात भयंकर दुष्काळ पडला. त्या वेळी भद्रबाहू आचार्य दक्षिणेत गेले आणि स्थूलभद्र तेथे राहिलेल्या साधूंचे प्रमुख आचार्य झाले. स्थूलभद्रांनी पाटलिपुत्र येथे एक परिषद बोलाविली (इ.स.पू.सु. ३००) आणि लुप्तप्राय झालेले अकरा अंगग्रंथ एकत्र आणण्यात आले. आज प्रचलित असलेल्या श्वेतांबर अर्धमागधी आगमांमध्ये ग्रीक खगोलशास्त्रातील कल्पना आढळून येत नाहीत. आगमग्रंथांची भाषा, वृत्ते आणि खगोलशास्त्रीय ज्ञान यांचा अभ्यास करून डॉ. याकोबीने या आगमांची (किंवा त्यांच्या प्रमुख भागांची) रचना इ. स. पू. चौथ्या शतकानंतर झालेली असावी, असा तर्क केला आहे.

श्वेतांबरांनी अर्धमागधीतील एकूण ४५ आगम किंवा सिद्धांत प्रमाण मानले आहेत. त्यांपैकी अकरा अंग्रग्रंथ असे : आयारंग (आचारांग), सूयगडंग (सूत्रकृतांग), ठाणंग (स्थानांग), समवायांग, भगवईविहायपण्णत्ति (भगवती व्याख्याप्रज्ञप्ति), णाया धम्मकहाओ  (ज्ञातृधर्मकथा), उवासगदसाओ (उपासकदशा), अंतगडदसाओ  (अंतकृद्दशा), अणुत्तरोववाइयदसाओ (अनुत्तरोपपातिकदशा), पण्हावागरण  (प्रश्नव्याकरण) व विवायसुय  (विपाकसूत्र). बारावे दिट्‌ठिवाय  (दृष्टिवाद) हे अंग आज उपलब्ध नाही.

वरील अंगग्रंथांव्यतिरिक्त पुढील अंगबाह्य आगम असे : (१) चौदा पूर्वग्रंथ (लुप्त झालेले). (२) १२ उपांगे  : उववाइय-वा ओववाइय  (औपपातिक), रायपसेणइय  (राजप्रश्नीय), जीवाभिगम, पन्नवणा  (प्रज्ञापना), सूरियपण्णत्ति  (सूर्यप्रज्ञप्ति), जंबुद्दीवपन्नत्ति  (जंबुद्वीपप्रज्ञप्ति), चंदपन्नत्ति  (चंद्रप्रज्ञप्ति), निरयावलियाओ (निरयावली), कप्पवडंसियाओ (कल्पावतंसिका), पुप्फिया  (पुष्पिका), पुष्फचूलिआओ  (पुष्पचूडा) व वण्हिदसाओ (वृष्णिदशा). (३) १० प्रकीर्णके : चउसरण  (चतुःशरण), आउरपच्चक्खाण (आतुरप्रत्याख्यान), भत्तपरिण्णा  (भक्तपरिज्ञा), संथार  (संस्तार), तंदुलवेयालिय  (तंदुलवैचारिक), गच्छायार (गच्छाचार) अथवा चंदाविज्झय  (चंद्रकवेध्यक), देविंदत्थव  (देवेंद्रस्तव), गणिविज्जा  (गणिविद्या), महापच्चक्खाण (महाप्रत्याख्यान) व मरणसमाही  (मरणसमाधि) अथवा वीरत्थव  (वीरस्तव). (४) ६ छेदसूत्रे : निसीह (निशीथ), महानिसीह (महानिशीथ), ववहार  (व्यवहार), दसाओ  (दशाश्रुतस्कंध) अथवा आयारदसाओ (आचारदशा) , बिहक्कप्प (बृहत्कल्प) आणि पंचकप्प (पंचकल्प) वा जीयकप्प  (जीतकल्प). (५) ४ मूलसूत्रे : उत्तरज्झयण  (उत्तराध्ययन), आवस्सय  (आवश्यक), दसवेयालिय   (दशवैकालिक) आणि पिंडनिज्जुत्ति (पिंडनिर्युक्ति). शेवटच्या दोन मूलसूत्रांऐवजी ओह निज्जुत्ति (ओघनिर्युक्ति) आणि पक्खियसुत्त (पाक्षिकसूत्र) ही दोन मूलसूत्रे काहींनी मानली आहेत. (६) २ चूलिकासूत्रे  : नंदी  आणि अणुओगदार  (अनुयोगद्वार).

अकरा अंगग्रंथांपैकी तिसरे ठाणंग . त्यात दहा अध्याय असून सात निन्हवांचा (पंथांचा) उल्लेख येतो. चौथ्या समवाय  अंगग्रंथांत बारा अंग व चौदा पूर्व यांचे विषय दिले आहेत. पाचव्या भगवईवियाहपण्णत्ति  ह्या अंगग्रंथात गोशालाचे चरित्र येते तसेच इतर आगमांचाही उल्लेख सापडतो. त्यात महावीर व त्यांचे अनुयायी यांचीही ऐतिहासिक माहिती आहे.


बारा उपांगांपैकी चौथ्या पन्नवणा  उपांगात जीवभेद, कषाय, इंद्रिये, लेश्या इ. विषय वर्णिले आहेत. जंबुद्दीवपन्नत्ति  या सहाव्या उपांगात जंबुद्वीपाचे वर्णन, उत्सर्पिणी-अवसर्पिणी कालचक्र, तीर्थंकर इ. विषय आहेत. निरयावलियाओ  या आठव्या उपांगात श्रेणिक-बिंबिसार राजाचा बंदिवास व आत्महत्या (वध ?) आणि कूणिक-अजातशत्रू याचे वैशालीचा राजा चेटक याच्याशी युद्ध वर्णिले आहे.

दहा प्रकीर्णकांपैकी भत्तपरिण्णा  या तिसऱ्या प्रकीर्णकात भिक्षान्नाची विल्हेवाट (परिज्ञा), इंगितमरण, पादपोपगमन आणि चंचलमनसंयम हे विषय आहेत. संथार  या प्रकीर्णकात गवताचे आसन (संस्तार) ग्रहण करण्याचा विधी, पंडितमरणाने सद्‌गती इ. गोष्टींचे विवरण येते. देविंदत्थव  या प्रकीर्णकाचा कर्ता वीरभद्र असून त्यात तीर्थंकर, कल्प व कल्पातीत देव यांचे वर्णन आहे.

सहा छेदसूत्रांपैकी निसीहमध्ये व्रतभंगाबद्दलच्या प्रायश्चित्तांचे नियम दिले आहेत. आयारदसाओ  या चौथ्या छेदसूत्राचा आठवा भाग भद्रबाहुकृत कल्पसूत्र  म्हणून प्रसिद्ध आहे. कल्पसूत्राचे जिनचरित्र, थेरावली, सामाचारी असे तीन भाग आहेत.

चार मूलसूत्रांपैकी उत्तरज्झयणामध्ये ३६ अध्याय असून त्याचे धर्म, नीती व कथा असे तीन विभाग आहेत. हा ग्रंथ म्हणजे श्रमणकाव्याचा प्राचीन नमुना आहे. चूलिकासूत्रांपैकी अणुओगदार  हा ग्रंथ आर्यरक्षिताने रचला आहे [→ अर्धमागधी साहित्य].

दिगंबरांचे आगमग्रंथ : श्वेतांबरांमध्ये प्रचलित असलेले ४५ आगम दिगंबर पंथीयांना मान्य नाहीत. त्यांच्या मतानुसार प्राचीन आगमवाङ्‌मयाचा लोप झालेला आहे. गुरुपरंपरेने जे ज्ञान अंशरूपाने काही दिगंबर आचार्यांना अवगत होते, ते त्यांनी शौरसेनी प्राकृतात लिपिबद्ध करून ठेवले [→ शौरसेनी साहित्य]. शिवाय जैन तत्त्वज्ञान, कर्मसिद्धांत, न्याय, आचार, चरित्रे इ. विषयांवर दिगंबरांचे संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या भाषांत विपुल ग्रंथ आहेत.

पुढील दिगंबर आगमांची भाषा शौरसेनी असून त्यांवरील टीका मात्र गद्यपद्यमिश्रित तसेच संस्कृतमिश्रित प्राकृतात आहेत. संस्कृतचाही काहींनी वापर केला आहे. हे पाच आगमग्रंथ असे : (१) षट्खंडागम : (दुसरे शतक). ग्रंथकार पुष्पदंत आणि भूतबली. या संप्रदायातील हा प्राचीनतम ग्रंथ आहे. याचे सहा खंड पुढीलप्रमाणे : जीवस्थान, क्षुद्रकबंध, बंधस्वामित्व, विषयवेदना, वर्गाना व महाबंध. या ग्रंथाची समाप्ती ‘श्रुतपूजा’ नामक उत्सवाने दरसाल ज्येष्ठ शुद्ध पंचमीला साजरी करतात.

(२) कसाय-पाहुड  (कषाय-प्राभृत) : (दुसरे शतक). कर्ता गुणधर. क्रोध, मान, माया, लोभ या चार कषायांचे वर्णन व ते कर्मबंधाला कसे कारणीभूत होतात, याची या ग्रंथात चर्चा येते.

(३) धवला : (नववे शतक). षट्खंडागमावरील ७२,००० प्राकृत गाथांची (श्लोकांची) ही टीका वीरसेनाने लिहिली. काही ठिकाणी संस्कृतचाही टीकाकाराने वापर केला आहे.

(४) जयधवला  : (नववे शतक). कसाय-पाहुडावरील ६०,००० गाथांची ही प्राकृत टीका वीरसेन व जिनसेन यांनी रचली.

(५) महाबंध  वा महाधवल : (दुसरे शतक). लेखक भूतबली. षट्खंडागमामधील सहाव्या खंडाचे हे नाव असून त्यात ४०,००० श्लोक आहेत. यात दिगंबरांचे तत्त्वज्ञान आलेले आहे.

दिगंबरांचे इतर प्रमाणग्रंथ : गोम्मटसार : (अकरावे शतक). कर्ता नेमिचंद्र याचे आधार षट्खंडागम  व कसाय-पाहुड  आहेत. दव्वसंगह  (द्रव्यसंग्रह) : हाही नेमिचंद्राचाच ग्रंथ असून यात सहा द्रव्यांचे वर्णन आलेले आहे. पंचसंगह  (पंचसंग्रह) : यात पाच अधिकार (प्रकरणे) आहेत – जीवसमास, प्रकृतिसमुत्कीर्तन, कर्मस्तव, शतक व सप्ततिका. कम्मपयडि  (कर्मप्रकृति) : (सु. पाचवे शतक). कर्ता शिवशर्मा. बंधन, संक्रमण, उद्‌वर्तन, अपवर्तन, उदीरणा, उपशमना, उदय व सत्ता या आठ अध्यायांत याची विभागणी केलेली आहे. विशेषणवती : (सहावे शतक). कर्ता जिनभद्र. ४०० गाथा. ज्ञान, दर्शन, जीव, अजीव इत्यादींचे विवेचन यात आले आहे.

कुंदकुंदाचार्यांचे आगमग्रंथ : दिगंबर संप्रदायातील कुंदकुंदाचार्यांचे (इ. स. सु. पहिले शतक) स्थान अद्वितीय आहे. दिगंबर जैन साधूंना आपण ⇨कुंदकुंदाचार्यांच्या शाखेतील आहोत असे सांगण्यात अभिमान वाटतो. कुंदकुंदाचार्यांचे प्रमुख ग्रंथ त्यांतील विषयांसह पुढीलप्रमाणे : (१) समयसार : जैन अध्यात्मावरील उत्कृष्ट ग्रंथ. जैनांच्या इतर संप्रदायांतील लोकांनाही हा ग्रंथ मान्य आहे. निश्चय व व्यवहारनयनाच्या दृष्टीने आत्म्याच्या गुणधर्मांचे वर्णन यात येते. (२) प्रवचनसार : ज्ञान, ज्ञेय व चारित्र (मुनि-आचार) असे ग्रंथाचे तीन भाग. ज्ञानस्वरूपाचे सूक्ष्म वर्णन. जीवाची शुभ, अशुभ व शुद्ध प्रवृत्ती, गुणपर्याय, पुद्‌गलसंबंध इत्यादी. (३) पंचास्तिकाय : जीव, पुद्‌गल, धर्म, अधर्म व आकाश हे पाच अस्तिकाय तसेच काल, मोक्षमार्ग इत्यादी. (४) णियमसार : रत्नत्रयासंबंधी विवेचन, जीव, अजीव इ. तत्त्वे, सहा आवश्यक क्रिया इत्यादि. (५) दसभत्ति : तीर्थ, सिद्ध, श्रुत, चारित्र, अनगार, आचार्य, निर्वाण, पंचपरमेष्ठी, नंदीश्वर व शांती या दहा भक्तींचे वर्णन. (६) अट्‌ठपाहुड : दर्शन, चरित्र, सूत्र, बोध, भाव, मोक्ष, लिंग आणि शील या विषयांवरील ही ‘पाहुड’ म्हणजे छोटी प्रकरणे आहेत. काहींच्या मते हे पुस्तक कदाचित दुसऱ्या कुंदकुंदाचे असू शकेल. (७) बारस अणुवेक्खा : (द्वादशानुप्रेक्षा). यात जैन धर्मात प्रसिद्ध असलेल्या अनित्यता. अशरण, एकत्व इ. बारा अनुप्रेक्षा किंवा भावना वर्णिलेल्या आहेत.


दिगंबर संप्रदायामध्ये मुनि-आचारासंबंधीचा प्राचीन ग्रंथ मूलाचार  हा असून त्याचा कर्ता स्वामी वट्टकेर मानला जातो. यात १,२४३ गाथा, १२ अधिकार (विभाग) असून मुनीच्या २८ मूलगुणांचे सविस्तर वर्णन आहे. ⇨आराधना  वा भगवती आराधना  हा इसवी सनाच्या सुरुवातीस शिवार्य याने रचिलेला ग्रंथ असून त्यात २,१६६ गाथा आहेत. दर्शन, ज्ञान, चारित्र व तप या चार आराधनांचे वर्णन. यावर दोन टीका : विजयोदया (अपराजितकृत, सातवे-आठवे शतक) व मूलाराधनादर्पण  (आशाधरकृत, तेरावे शतक). लोकविभाग  हा सर्वनंदी आचार्याने प्राकृतात लिहिलेला मूळग्रंथ उपलब्ध नाही परंतु सिंहसूरी आचार्याने केलेले त्याचे संस्कृत रूपांतर उपलब्ध आहे. लोकविभाग  या ग्रंथाचा काल इ. स. पाचवे शतक असावा. ⇨तिलोयपण्णति (त्रिलोकप्रज्ञप्ति) ग्रंथाचा कर्ता यतिवृषभ (पाचव्या ते सातव्या शतकांच्या दरम्यान) असून नऊ महाधिकारांत तिन्ही लोकांचे वर्णन त्यात आले आहे. श्लोकसंख्या ८,००० असून या विषयावरील सर्व ग्रंथ या ग्रंथावर आधारलेले आहेत.

तत्त्वज्ञान व न्यायविषयक ग्रंथ : तत्त्वार्थाधिगमसूत्र : (पहिल्या ते चौथ्या शतकांच्या दरम्यान). कर्ता ⇨उमास्वाती. जैन धर्मविषयक सर्व तत्त्वांचे सूत्ररूपाने प्रतिपादन करणारा प्रसिद्ध ग्रंथ. जैन ग्रंथकाराने संस्कृत भाषेत लिहिलेला हा आद्यग्रंथ. दिगंबर व श्वेतांबर या दोन्ही संप्रदायांना मान्य असलेला हा ग्रंथ जैनांचे ‘बायबल’ म्हणावयास हरकत नाही. दोन्ही संप्रदायांतील ग्रंथकारांनी यावर टीका लिहिल्या आहेत. श्वेतांबरटीका स्वोपज्ञ भाष्याला आधारभूत धरून लिहिलेल्या आहेत, तर दिगंबरटीका सर्वांत पहिली जी दिगंबर पूज्यपादकृत सर्वार्थसिद्धि  नावाची टीका तिचा आधार घेऊन लिहिलेल्या आहेत. या ग्रंथाचे १० अध्याय असून दिगंबरसूत्रपाठाप्रमाणे सूत्रसंख्या ३५७ व श्वेतांबरसूत्रपाठाप्रमाणे सूत्रसंख्या ३४४ आहे.

दिगंबरांचे न्यायविषयक ग्रंथ : सम्मइसुत्त   किंवा सन्मतितर्क  हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ सिद्धसेन दिवाकराने (चौथे-पाचवे शतक) लिहिला. याची रचना कुंदकुंदाचार्यांच्या प्रवचनसारासारखी आहे. हा ग्रंथ दोन्ही जैन संप्रदायांना प्रमाण वाटतो. त्याचाच न्यायावतारही प्रसिद्ध आहे. देवसेना या जैन मुनीचे (दहावे शतक) दोन प्राकृत ग्रंथ लघुनयचक्र  आणि बृहन्नयचक्र समंतभद्राचे (पाचवे-सहावे शतक) संस्कृत आप्तमीमांसा  व युक्त्यनुशासन  हे ग्रंथ अकलंकदेवाचे (आठवे शतक) लघीयस्त्रय, न्यायविनिश्चय, सिद्धिविनिश्चय  व प्रमाणसंग्रह आचार्य विद्यानंदाचे (७७५-८४०) आप्तपरीक्षा, प्रमाणपरीक्षा, पत्रपरीक्षा  व सत्यशासनपरीक्षा अनंतकीर्तीचे (दहावे शतक) बृहत्सर्वज्ञसिद्धि  व लघुसर्वज्ञसिद्धि  हे न्यायशास्त्रावरील आणखी काही महत्त्वाचे ग्रंथ होत.

श्वेतांबरांचे न्यायविषयक ग्रंथ : हरीभद्रसूरीचे (आठवे शतक) अनेकान्तजयपताका, अनेकान्तवादप्रवेश  व सर्वज्ञसिद्धि  आणि हेमचंद्राचे (बारावे शतक) प्रमाणमीमांसा, वेदांकुश  व अन्ययोगव्यवच्छेदिका  हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यांपैकी शेवटच्या ग्रंथावर मल्लिषेणाने १२९२ मध्ये स्याद्वादमंजिरी  ही अपूर्व टीका लिहिली. तीत सर्व आस्तिकनास्तिक भारतीय दर्शनांचे खंडन करून जैनांच्या स्याद्वादाचे मंडन केलेले आहे. यामुळे हा ग्रंथ जैन दर्शनात फार महत्त्वपूर्ण मानला जातो.

जैन पुराणे : विमलसूरीने पउमचरिय  या प्राकृत काव्यात जैन दृष्टिकोनातून रामकथा सांगितली आहे. याचा काळ इ. स. पहिले ते चौथे शतक असा मानतात. शीलांकाचार्याने (नववे-दहावे शतक) २४ तीर्थंकर, १२ चक्रवर्ती, ९ वासुदेव व ९ बलदेव अशा ५४ महापुरुषांची चरित्रे चउपन्नमहापुरिसचरिय  या प्राकृत गद्यपद्यमय ग्रंथात गायिली आहेत.

जैन पुराणांच्या संस्कृत रचना : विमलसूरीच्या पउमचरियावर आधीरित पद्मचरित (पद्मपुराण) रविषेणाने सातव्या शतकात लिहिले. ⇨जिनसेनाने (आठवे शतक) हरिवंशपुराण  १२,००० श्लोकांत संपविले. शिवाय त्याने आदिपुराणात ऋषभनाथाचे चरित्र १०,३८० श्लोकांत श्रेष्ठ महाकाव्याच्या ढंगात रचले पण तो ग्रंथ अपूर्ण राहिला. त्याचा शिष्य गुणभद्र याने उत्तरपुराण ८,००० श्लोकांत रचिले आणि इतर महापुरुषांची चरित्रे कथन करून हे महापुराण  पूर्ण केले. हेमचंद्राने बाराव्या शतकात ६३ शलाकापुरूषांची चरित्रे त्रिषष्टिशलाकापुरुषचरित  नावाने गुंफिली आहेत. त्यात वरील ५४ महापुरुषांबरोबर त्याने ९ प्रतिवासुदेवांचाही समावेश केला आहे.

अपभ्रंश भाषेतील साहित्य : धवल यांचे (दहावे-अकरावे शतक) हरिवंशपुराण  आणि स्वयंभूचे (सु. आठवे शतक) ⇨पउमचरिउ  व रिट्‌ठणेमिचरिउ  वा हरिवंशपुराण  प्रख्यात आहेतच. पण अपभ्रंशाचा महाकवी, ‘कविकुलतिलक’ ⇨पुष्पदंत (दहावे शतक) याने ⇨तिसट्‌ठिमहापुरिस गुणालंकार  या महाकाव्यात उत्कृष्ट शैलीचा आदर्श निर्माण केला आहे. त्यानेच ⇨जसहरचरिउ व ⇨णायकुमारचरिउ  यांची रचना केली. ⇨ धनपालाचा (दहावे शतक ?) ⇨भविसयत्तकहा कनकामराचे (अकरावे शतक) करकंडचरिउजोइंदूचा (योगींद्राचा, सहाव्या ते दहाव्या शतकांच्या दरम्यान) ⇨परमप्पपयासु  हे इतर महत्त्वाचे अपभ्रंश ग्रंथ होत [→ अपभ्रंश साहित्य].

चंपूकाव्ये व कथा : महाराष्ट्री प्राकृतातील ⇨वसुदेवहिंडी  हा गद्य कथाग्रंथ इ.स. सहाव्या शतकापूर्वी संघदास व धर्मसेनगणी यांनी लिहिला. ⇨समराइच्चकहा  ही ⇨हरिभद्रसूरीची (आठवे शतक) प्रसिद्ध महाराष्ट्री प्राकृत धर्मकथा ⇨कुवलयमाला  हे उद्योतनसूरीचे (आठवे शतक) सुरस महाराष्ट्री प्राकृत चंपूकाव्य हरिभद्रसूरीचे (आठवे शतक) धुत्तवखाण  (धूर्ताख्यान) धनेश्वर (अकरावे शतक) याचे सुरसुंदरीचरिय महेश्वरसूरी (अकरावे शतक) याचे णाणपंचमीकहाहेमचंद्राचे (१०८८–११७२) कुमारपालचरित  वा कुमारपालचरिय देवेंद्रसूरी (तेरावे शतक) याचे कण्हचरिय  (कृष्णचरित्र) हरिश्चंद्र (सु. ९००) याचे जीवंधरचंपू सोमदेव (९५९) याचे यशस्तिलकचंपू सिद्धर्षी (९०६) याची उपमितिभवप्रपंचकथा  इ. अनेक संस्कृत व प्राकृत ग्रंथ जैन लेखक-कवींनी लिहून साहित्यक्षेत्रात मोलाची भर घातली आहे.

संदर्भ :

1. Kapadia H. R. A. History of the Canonical Literature of the Jainas, Bombay, 1941.

2. Winternitz, M. History of Indian Literature, Vol. II, Calcutta, 1933.

३. जैन, हीरालाल. संपा. तत्त्व-समुच्चय, वर्धा, १९५२.

४. प्रेमी, नाथूराम, जैन साहित्य और इतिहास, मुंबई, १९५६.

५. मालवणिया, दलसुख मेहता, मोहनलाल, संपा. जैन साहित्य का बृहद् इतिहास, ३ भाग, बनारस, १९६६–६७.

पाटील, भ. दे.