गाथा : ‘गाणे’ ह्या अर्थी असलेल्या ‘गै’ धातूपासून ‘गाथा’ शब्द आलेला आहे. ऋग्वेदात ( ८·३२·१ ८·७१·१४  ८·९८·९ ९·९९·४) गीत किंवा गाऊन म्हणावयाचे मंत्र यांनाच अनुलक्षून गाथा शब्द उपयोजिलेला दिसतो. ऋग्वेदातील ऋजुनाथ, गाथिन, गाथपती, गाथानी इ. शब्द गाथा शब्दावरून तयार केलेले आढळतात. ऋजुनाथ म्हणजे शुद्ध रूपात वेदमंत्रांचे गायन करणारा (५·४४·५), गाथिन म्हणजे गाथा गाणारा (१·७·१४),गाथपती म्हणजे गाथांचा पती, नायक असT रुद्र (१·४३·४), गाथानी म्हणजे गाथागायनाचे नायकत्व करणारी व्यक्ती (१·१९०·१ ७·९२·२). ऐतरेय ब्राह्मणात  (७·१८)गाथा ही मानुषी, तर ऋचा ही दैवी असल्याचे म्हटले आहे. ऋग्वेदात रैभी (कर्मकांडविषयक गीत) व नाराशंसी (राजाच्या दानस्तुतिपर गीत) पद्यप्रकारांशी गाथेची सांगड घातलेली आढळते (१०·८५·६). यज्ञप्रसंगी गायिल्या जाणाऱ्या गाथांना ‘यज्ञगाथा’ म्हणत. यज्ञात मुक्तहस्ते दान देणाऱ्या अभिषिक्त राजांच्या प्रशंसापर अनेक प्राचीन गाथा ऐतरेय ब्राह्मणात  आहेत. काही गाथांत सुंदर कथाप्रसंगही गुंफलेले आढळतात.

वेदांत ‘गातुविद’ म्हणजे गाथा जाणणारे असाही निर्देश आढळतो (ऋग्वेद – १·५१·३ ३·६२·१३ ८·६६·१४). गाथा रचणे, त्या संगृहीत करणे व यथोचित प्रसंगी त्या सभारंभपूर्वक गाणे, असा व्यवसाय करणाऱ्यांचा एक स्वतंत्र वर्ग त्या काळी असावा असे दिसते. वैदिक ऋचांहून गाथांची भाषा, व्याकरण व शैली वेगळी आहे. त्या कळण्यासही ऋचांपेक्षा सोप्या आहेत.

विवाह, उपनयन, पुत्रजन्मादी मंगलप्रसंगी गाथा – गायनाची चाल प्राचीन भारतात रूढ असल्याचे दिसते. मैत्रायणी संहिता, आश्वलायन, आपस्तंबादी  सूत्रे तसेच रामायण, भागवतादी  ग्रंथ यांतून विवाह, पुत्रजन्म  इ. मंगलप्रसंगी  वीणेच्या साथीवर गाथा गायिल्याचे उल्लेख आढळतात.

जैन व बौद्ध साहित्यातही गाथांचा अंतर्भाव आहे. जैनांच्या गाथा अर्धमागधी  भाषेत, तर बौद्घांच्या गाथा पाली भाषेत आहेत. महावीर व बुद्ध यांच्या उपदेशांचे सार वा निष्कर्ष सांगणाऱ्या पद्यांना ह्या साहित्यांत गाथा म्हटले आहे. धम्मपद  हा उपदेशपर बौद्ध गाथांचा लोकप्रिय संग्रह आहे. गद्यस्वरूपातील बहुतेक जातककथांच्या शेवटी त्या त्या जातककथेचे तात्पर्य सांगणारी एक पद्य गाथा असते. थेरगाथा  थेरीगाथा  यांत सर्वसंगपरित्याग केलेल्या बौद्ध भिक्षू व भिक्षुणींच्या अनुभवांचे  उत्कट काव्यमय दर्शन घडते. बौद्ध व जैन गाथा अनुष्टुभ छंदात आहेत. संस्कृतमधील आर्येप्रमाणेच प्राकृत भाषांत ‘गाथा’ नावाचा एक छंदही आहे.

गाथा सप्तशती  हा हाल कवीच्या सातशे उत्कृष्ट पद्यांचा संग्रह असून तो महाराष्ट्री प्राकृतात आहे [→ गाहा सत्तसई]. 

कालांतराने गाथा हा पद्यप्रकार मागे पडून त्याचे विविध प्रादेशिक भाषांतील ओवी, दोहा, साकी, अभंग इ. पद्यप्रकारांत रूपांतर झाले असावे. मराठीत देखील संत ‘नामदेवाची गाथा’,  ‘तुकोबाची गाथा’ असे शब्दप्रयोग रूढ असून त्यांतून त्या त्या संताच्या काव्यरचनेचा सर्वसाधारणपणे निर्देश केला जातो.

जरथुश्त्री किंवा पारशी धर्माचा अवेस्ता  हा पवित्र धर्मग्रंथ असून त्यातील जरथुश्त्रप्रणीत वचने संगृहीत असलेल्या पहिल्या विभागास  ‘गाथा’ म्हटले जाते. ह्या गाथांची  एकूण संख्या पाच असून त्यांच्या रचनेचा काळ ऋग्वेदसंहितेइतकाच प्राचीन असल्याचे मानले जाते. अवेस्ता  गाथांचा अर्थही  वैदिक गाथांप्रमाणेच गेय मंत्र वा गीत असा असून अवेस्ता  धर्मग्रंथाच्या ह्या गाथा सर्वांत प्राचीन भाग होत. आज उपलब्ध असलेला अवेस्ता  धर्मग्रंथ प्राय: ह्या पाच गाथांचाच असल्यामुळे तो गाथा ह्या नावानेही ओळखला जातो. [→ अवेस्ता (धर्मग्रंथ)].         

                                                        

सुर्वे, भा. ग.