एक्युमेनिकल चळवळ : ख्रिस्ती धर्मात विविध पंथोपपंथ पडू नयेत म्हणून, चर्चच्या पुढाऱ्यांनी आरंभापासूनच शक्य तो जागतिक पातळीवर विचारविनिमय करण्यासाठी, परिषदा (कौन्सिल्स) घेण्याची प्रथा चालू ठेवली. अशी पहिली जागतिक परिषद आशिया मायनरमधील नायसीआ येथे इ. स. ३२५ मध्ये, पोप पहिला सिल्व्हेस्टर याने घेतली. तीत त्याने आज जगन्मान्य असलेले ख्रिस्ती धर्माचे श्रध्दासिध्दांत (क्रीड) तयार करून घेतले तथापि पंथोपपंथ आणि त्यांतील मतभेद वाढतच गेले आणि त्यामुळेच एक्युमेनिकल चळवळीची आवश्यकताही वाढीस लागून तिला बळकटीही येत गेली. विविध ख्रिस्ती धर्मपंथांत एकी निर्माण करून चर्चचे पुनर्नूतनीकरण करणे, हे तिचे प्रमुख उद्दिष्ट म्हणून स्वीकारले गेले. या उद्दिष्टपूर्तीसाठी जे प्रयत्न झाले, त्यांतील महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे १९१० मध्ये स्कॉटलंडमधील एडिंबरो येथे भरलेली जागतिक परिषद. ह्या परिषदेमुळेच १९२१ मध्ये ‘इंटरनॅशनल मिशनरी कौन्सिल’  स्थापन झाली. भारतात मद्रासजवळील तांबरम् येथे १९३८ मध्ये ह्या इं. मि. कौ. चे अधिवेशन भरले आणि त्यात ‘वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस’  स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि दुसऱ्या महायुध्दामुळे तो प्रत्यक्षात आणता आला नाही. तरीही कौन्सिल अस्तित्वात आले असे मानून, ह्या चळवळीच्या नेत्यांनी जगातील सर्व चर्चची शक्ती एकवटून, उभयबाजूंच्या युद्धपीडितांची अमोल सेवा केली. युद्ध संपल्यावर २३ ऑक्टोबर १९४८ रोजी वर्ल्ड कौन्सिलची औपचारिकरीत्या स्थापना झाली. आज ही कौन्सिल एक्युमेनिकल चळवळीचे केंद्र व आशास्थान बनली. रोमन कॅथलिक चर्च मात्र, ह्या कौन्सिलचे अजून सभासद नाही तथापि त्याचे प्रतिनिधी अलीकडे कौन्सिलच्या सर्व परिषदांत निरीक्षक म्हणून भाग घेतात.

वर्ल्ड कौन्सिल हे चर्च नाही म्हणजे कुठलाही पंथ वा संप्रदाय नाही. कोणत्याही सभासद चर्चच्या अंतर्गत कारभारात तसेच धर्ममतांत ते ढवळाढवळ करत नाही. जागतिक परिषदा घेऊन, त्यांत सर्व जगातील चर्चच्या समस्यांचा ते विचार करते तसेच मानवी गरजा व अडचणी निवारणार्थ योजना आखून त्या कार्यवाहीत आणण्यासाठी सर्व ख्रिस्ती पंथांची शक्ती संघटित करते.

जगातील अनेक चर्च वर्ल्ड कौन्सिलचे सभासद आहेत. भारतातील ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’  व ‘चर्च ऑफ साउथ इंडिया’ वर्ल्ड कौन्सिलचे सभासद असून, १९६१ मध्ये दिल्ली येथे कौन्सिलचे जे अधिवेशन भरले, ते ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ह्याच अधिवेशनात रोमन कॅथलिक चर्चने पहिल्यांदाच आपले निरीक्षक पाठविले.

संदर्भ : 1. Bea, Augustine, The Unity of Christians, New York, 1963.

           2. Rouse, R. Neill, S. C. Ed. A History of the Ecumenical Movement 1517-1948, Philadelphia, 1967.

आयरन, जे. डब्ल्यू.