एब्रो : स्पेनमधील सर्वांत मोठी नदी. लांबी सु. ८००-९०० किमी. नदीखोऱ्याचा प्रदेश सु. ८०,००० चौ. किमी. (स्पेनच्या जवळजवळ एक षष्ठांश). स्पेनच्या उत्तरेकडील कँटेब्रिअन पर्वतात ही उगम पावते आणि दक्षिणेकडे भूमध्य समुद्राला मिळते. हिला दोनशेवर उपनद्या असल्या, तरी ॲरॉगान, गाल्येगो, एगा, सेग्रे या डाव्या बाजूने मिळणाऱ्या आणि हालाँ, ग्वादालूपे, वेर्वा या उजवीकडून मिळणाऱ्या प्रमुख नद्या होत. एब्रो नदीसंहतीवर १९५० अखेर ३५ धरणे बांधली गेली होती त्यांत १६७·३६ कोटी घमी. पाणी साठविले जात असे त्यावर ७८·९३ कोटी किवॉ. तास वीज मिळे आणि २१·९२ लक्ष हे. जमिनीला पाणी पुरवले जाई. स्पेनच्या इतिहासात तसेच स्पॅनिश लोकांच्या जीवनात एब्रोला महत्त्वाचे स्थान आहे.

शाह, र. रू.