कॉव्हेंट्री : इंग्लंडच्या वॉरिक परगण्यातील ऐतिहासिक व औद्यागिक शहर. लोकसंख्या ३,३४,८३९ (१९७१). या शहराला ‘सिटी ऑफ द थ्री स्पायर्स’ म्हणतात. कारण येथील प्रार्थनामंदिराचे तीन उंच मनोरे नजरेत भरतात. हे लंडनच्या वायव्येस १४४ किमी. आणि वॉरिकपासून १८ किमी. असून ऊर्मिल भूभागावर वसलेले आहे. जुन्या तटबंदीचा काही भाग आणि दोन वेशी शिल्लक आहेत. येथे जुनी ऐतिहासिक महत्त्वाची प्रार्थनामंदिरे व इतर इमारती बऱ्याच होत्या. परंतु दुसऱ्या महायुद्धातील जर्मन हवाई हल्ल्यांत त्यांची फार नुकसानी झाली. काही वास्तू पुन्हा बांधून काढल्या आहेत. १०४३ मध्ये लेडी गोडाइव्हा व तिचा पती यांनी स्थापिलेल्या बेनेडिक्टीन मठामुळे हे प्रथम प्रसिद्धीस आले. पुढे त्याला धार्मिक, ऐतिहासिक व राजकीय महत्त्व आले. येथील विणकऱ्यांनी १२१६ पासूनच उत्तम रंजक-रसायने तयार करून आकर्षक रंगीत कापड बनविले. ‘कॉव्हेंट्री ब्लू’ कापड लोकप्रिय आहे. एकोणिसाव्या शतकात तेथे घड्याळांचे व नंतर सायकलींचे उत्पादन होऊ लागले. १९०६ मध्ये कृत्रिम रेशमी कापड, यंत्रे, युद्धसाहित्य तयार करण्याचे कारखाने निघाले. सध्या तेथे मोटारी, वाहने, विमाने व त्यांचे साहित्य, कृषिअवजारे, रेडिओ, टेलिव्हिजन, चित्रपट, विद्युतसाधने, रेयॉन इ. अनेकविध उत्पादन होते. येथे सोळाव्या शतकापासून चालू असलेल्या व नवीन शाळा, तांत्रिक व कलामहाविद्यालये, नवीन बाजार, ग्रेट ब्रिटनमधील नागरी संस्थेने बांधलेले पहिलेच परिपूर्ण नाट्यगृह, स्मारके, उद्याने, वगैरे आहेत. येथून पार्लमेंटवर तीन सदस्य निवडून जातात.
कुमठेकर, ज. ब.