प्लॉयेश्ती: रूमानियातील प्राकव्ह जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे खनिज तेलशुद्धीकरण उद्योगामुळे विशेष प्रसिद्ध आहे. लोकसंख्या २,५६,६८० (१९७८). हे बूकारेस्टच्या उत्तरेस ५६ किमी. प्राकव्ह व तेलीजेन या नद्यांच्या दुआबात वसले आहे. फादर प्लॉये हा त्याचा संस्थापक प्लॉयेश्ती हे नाव त्याच्यावरूनच पडले असावे. १९१६ मधील जर्मन स्वारीमुळे, १९४० मधील भूकंपाने आणि दुसऱ्या महायुद्धातील रशियन बाँब हल्ल्यांमुळे या शहराची बरीच हानी झाली. ३१ ऑगस्ट १९४४ रोजी रशियनांनी हे शहर आपल्या ताब्यात घेतले. १८५६ मध्ये येथे सुरू करण्यात आलेला तेलशुद्धीकरण कारखाना हा जगातील एक आद्य कारखाना मानला जातो. तेलशुद्धीकरण, त्याची साठवण, तेलविहिरीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रींची निर्मिती यांची उत्तम सोय असलेले रूमानियातील हे एकमेव केंद्र आहे. शहराच्या दक्षिणेस ब्राझ येथे प्रचंड खनिज तेल रसायन उद्योगसमूह आहे. शहरात कापड, रबर, काच, कातडी वस्तू, लोखंडी सामान, युद्धसामग्री, अन्नप्रक्रिया इ. इतरही उद्योग चालतात. लोहमार्गांचे हे प्रमुख केंद्र आहे. पाउलेश्त, कॉर्लातेश्त, तातारानी ही याची प्रमुख उपनगरे होत. येथे सहा संग्रहालये असून त्यांपैकी ’नॅशनल ऑइल म्यूझीयम’ हे रूमानियातील खनिज तेल उद्योगाच्या विकासाचे प्रतीक होय.

चौधरी, वसंत