काँग्रीव्ह, विल्यम :  (२४ जानेवारी १६७०—१९ जानेवारी १७२९). इंग्रज सुखात्मिकाकार. जन्म इंग्लंडमधील लीड्स शहराजवळील एका खेड्यात. शिक्षण आयर्लंड व लंडन येथे. डब्लिनच्या महाविद्यालयात असताना अग्रगण्य इंग्रज उपरोधकार ⇨ जॉनाथन स्विफ्ट  ह्याच्याशी त्याची मैत्री जमली. १६९३ मध्ये लंडनमध्ये त्याचे पहिले नाटक, द ओल्ड बॅचलर प्रकाशात आले आणि अतिशय गाजले. जरी हे नाटक तत्कालीन सांकेतिक समीकरणांनुसार लिहिलेले असले, तरी त्याच्या आकर्षक शैलीमुळे व मांडणीमुळे ⇨ ड्रायडनसार  या मातबर कवीकडूनही त्याची प्रशंसा झाली. त्याच्या लव्ह फॉर लव्ह (१६९५) या नाटकाने रंगभूमी अधिकच गाजवली. १६९७ मध्ये सुखात्मिकांच्या या सिद्धहस्त निर्मात्याने द मोर्निंग ब्राइड ही शोकात्मिका लिहिली. याच सुमारास लिंकन्स इन रंगमंदिराचा तो व्यवस्थापक झाला. दर वर्षी या संस्थेला नवीन नाटक पुरवावयाचे, असा त्याने करार केला होता परंतु प्रकृती ढासळल्यामुळे तो त्याला पाळता आला नाही. १७०० साली काँग्रीव्हने आपले द वे ऑफ द वर्ल्ड हे नाट प्रकाशित केले. हे नाटक त्याचे सर्वोत्कृष्ट नाटक मानले जाते आणि इंग्रजी सुखात्मिकांमध्ये त्याची पहिल्या श्रेणीत गणना होते. फ्रेंच सुखात्मिकाकार  ⇨ मोल्येर याच्या उत्कृष्ट नाटकांबरोबर कित्येक समीक्षक या नाटकाची तुलना करतात. (काँग्रीव्हने मोल्येरची नाटके वाचली होती व त्यापैंकी एकाच इंग्रजी अनुवाद करण्याचाही खटाटोप केला होता). यानंतर मात्र काँग्रीव्हने आजारापायी रंगभूमीशी असलेला संबंध सोडला आणि थोडेफार तुरळक काव्यलेखन केले. १७०६ मध्ये त्याने पिंडरिक ओड टू द क्वीन  हे काव्य ‘डिस्कोर्स ऑन द पिंडरिक ओड’ या वाङ्मयसमीक्षणात्मक निबंधासकट प्रसिद्ध केले. पुढे त्याची प्रकृती ढासळत गेली व दृष्टीही क्षीण होत गेली. बग्गी उलटून झालेल्या अपघातापायी तो लंडनमध्ये मरण पावला. वेस्टमिन्स्टर ॲबी येथे त्याचे दफन करण्यात आले.

 विल्यम कॉंग्रीव्ह

इंग्रजी सुखात्मिकांच्या उत्क्रांतीत विल्यम काँग्रीव्ह हा एक महत्त्वाचा टप्पा तर मानला जातोच पण त्याचे द वे ऑफ द वर्ल्ड हे नाटक इंग्रजी वाङ्मयातील सर्वोत्कृष्ट नाटकात गणले जाते. काँग्रीव्हच्या नाटकात तत्कालीन इंग्रजी जीवनातले सूक्ष्म बारकावे, समाजातील व्यवहारांच्या खाचाखोचा आणि व्यक्तिमत्त्वांची खास मर्मस्थाने यांच्यातून हास्य उपजवण्यात आलेले आहे. शोकात्मिकेपेक्षाही सुखात्मिकेला सभोवारच्या समाजजीवनाचे सूक्ष्म आणि कित्येकदा परस्परविरोधी तपशील सुसंघटित रीत्या एकत्र आणावे लागतात हे मान्य केल्यास काँग्रीव्हचा वाङ्मयीन दर्जा उच्च होता, हे मान्य करावे लागेल. तसेच नाट्याचे महत्व रंगभूमीवरच सिद्ध होत असल्यामुळे समकालीन प्रेक्षकांना काँग्रीव्हने प्रभावित केले, ही गोष्टही महत्त्वाची ठरते. एकीकडे स्विफ्टसारखा उपहासगर्भ लेखकांंचा अग्रणी आणि दुसरीकडे ड्रायडनसारख्या मान्यवर कवी अशा समकालीनांनाही काँग्रीव्हचे महत्त्व वाटत होते. काँग्रीव्हच्या एका समकालीनाने इंग्रजी रंगभूमीवर येणाऱ्या नाटकांमुळे नैतिक ऱ्हासाची लक्षणे दिसत आहेत, असा सर्रास आरोप केला होता. काँग्रीव्हने त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तसेच स्वतःची प्रकृती सुखात्मिकाकाराची असूनदेखील शोकात्मिका लिहिण्याचा त्याने खटाटोप केला. या गोष्टी निव्वळ माहिती म्हणून महत्त्वाच्या मानल्या जातील. त्याचे खरे ऐतिहासिक महत्त्व सुखात्मिकाकार म्हणूनच आहे.

 

संदर्भ : 1. Grosse, Edmund, The life of William Congreve, London, 1888.

2. Hodges, C. J. William Congreve, the Man, New York, 1941.

3. Perry, Henry Ten Eyck, The Comic Spirit in Restoration Drama : Studies in the Comedy of Etherege, Wycherley, Congreve, Vanbrugh and Farquhar, New York, 1962.

4. Summers, M. Ed. The Complete Works of William Congreve, 4 Vols. London, 1923.

चित्रे, दिलिप