कर्दळ :  (हिं. सब्बजय गु. अकल बेरा क. कळेहू, कावाळी सं. देवकेली, सर्वजया इं. इंडियन शॉट लॅ. कॅना इंडिका गण-सिटॅमिनी कुल-कॅनेसी). शोभादायक, मोठी व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी)  ⇨ ओषधी मूलस्थान-वेस्ट इंडीज, मध्य आणि दक्षिण अमेरिका लागवड-सर्व उष्ण देशांत. भारतात उद्यानांतून अनेक जाती व संकरज (दोन भिन्न प्रकारांपासून झालेली संतती) प्रकार आढळतात. मूलक्षोड (जमिनीखालील खोड) लठ्ठ व वायवीय (जमिनीवरील) खोड ०.९ – १.२ मी. उंच पाने साधी, मोठी (१५–४५ X १०–२० सेंमी.) देठ व मध्य शीर पन्हळीदार पर्णतल आवरक (खोडास वेढणारा). फुलोरा कणिश किंवा मंजरी [→ पुष्पबंध] फुले अनियमित, द्विलिंगी, जोडीने लाल, पिवळी, शेंदरी व मिश्र रंगांची असतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ सिटॅमिनी गणात वर्णिल्याप्रमाणे. छदे (फुले वा फुलोरा ज्यांच्या बगलेत येतात अशी पाने) हिरवी, पातळ बोंड गोलसर, काटेरी, तीन कप्प्यांचे बिया अनेक, काळ्या, गोल व छर्‍याप्रमाणे. 

मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे), स्वेदकारी (घाम आणणारे), शामक व उत्तेजक मूलक्षोडाचे तुकडे तांदळाच्या धुवणातून मिऱ्‍याबरोबर उकळून जनावरांना विषबाधा झाल्यास देतात. बिया हृदबल्य व जखमा भरून येण्यास चांगल्या. खोडातील धागे तागाप्रमाणे उपयुक्त असतात .

जमदाडे, ज.वि. 

कर्दळीची लागवड साधी आणि सोपी आहे. चांगली मशागत केलेली, खतावलेली, भुसभुशीत, सुपीक व ओलसर जमीन तिला लागते. कर्दळीला उष्ण हवामान लागते. थंडीच्या कडाक्याने अपाय होतो. कर्दळीची अभिवृद्धी मूलक्षोडापासून करतात. नवीन प्रकार बियांपासून तयार करतात. निरनिराळ्या प्रकारांत संकर करून पुष्कळ ठेंगण्या निरनिराळ्या रंग-छटांच्या, मोठ्या फुलांच्या जाती तयार करण्यात आलेल्या आहेत. बी पाण्यात भिजत घालून लावल्यास लवकर उगवते. वाफ्यातून लावावयाची असल्यास झाडात ०.३ X ०.३ मी. व लांब लांब एकएकटीच ओळीत लावावयाची असल्यास झाडांत १ ते १.५ मी. अंतर ठेवतात. 

फुले कोमेजल्याबरोबर तोडल्यास जास्त फुले येत राहतात. फुले येऊन गेल्यावर दर हंगामास लागवडीकरिता चांगले कंद मिळण्याकरिता, कंद खणून काढून त्यांना विश्रांती देतात. 

चौधरी, रा.मो. 

कर्दळीला मुळावरील गाठी हा रोग सूत्रकृमींमुळे (नेमॅटोडा संघातील कृमींमुळे) होत असून त्यामुळे मुळावर लहान लहान गाठी येतात झाडाची वाढ खुंटून ते रोगट दिसते. रोग निवारण्यासाठी रोगट जमीन टाळतात व निरोगी कंद लावतात.  

कुलकर्णी, य.स.

पिवली कर्दळ लाल कर्दळ