काली–१ : दक्षिण अमेरिकेच्या कोलंबिया देशातील प्रमुख व्यापारी व औद्योगिक केंद्र. लोकसंख्या १०, २२, २०० (१९७२). कौका नदीखोऱ्यात समुद्रसपाटीपासून सु.१,०७५ मी. वर १५३६ साली याची स्थापना झाली. ब्वेनाव्हेंतुरा या पॅसिफिक बंदराशी व इतर महत्त्वाच्या शहरांशी ते लोहमार्गांनी व राजरस्त्यांनी जोडलेले असून एक्वादोरची राजधानी कीटोसही येथून लोहमार्ग जातो. आसपासच्या प्रदेशातील ऊस, कापूस, तंबाखू, मका वगैरे शेतमालाची आणि पशुधन, लाकडे, खनिजे यांची बाजारपेठ कालीतच आहे. कोलंबियातील हे महत्त्वाचे साखरकेंद्र असून याशिवाय मद्य, औषधे, साबण, अत्तरे यांचे उद्योग येथे आहेत. याच्या भोवती संगमरवर व क्वॉर्ट्झच्या खाणी आहेत. येथील विद्यापीठाची वैद्यकीय शाखा विख्यात आहे.
शहाणे, मो. शा.