कालीनिनग्राड : रशियातील पश्चिमेकडील कालीनिनग्राड विभागाचे मुख्य शहर. लोकसंख्या ३,१५,००० (१९७२). हे प्रेगोल्या –जर्मन प्रेगेल–नदीच्या मुखाजवळ, बाल्टिक समुद्रावरील एक मोठे बर्फमुक्त बंदर असून ह्याचे जर्मन नाव ‘केनिग्झबर्ग’ होते. कालीनिनग्राड बर्लिनच्या ईशान्येस ५४७ किमी. असून, ह्याच्या पूर्वेस १,०९५ किमी. मॉस्को येते. ह्या शहरापासून ३१ किमी. अंतरावर बाल्टिक येथे एक मोठा नाविक तळ आहे. हा तळ पूर्वी जर्मनीला फार महत्त्वाचा होता. आता तो रशियाला तितकाच महत्त्वाचा आहे.
कालीनिनग्राड हे व्यापाराचे आणि उद्योगधंद्यांचे मोठे केंद्र आहे. जहाजे, कागद, रसायने, आगगाडीचे डबे, लाकूड व मच्छीमारी धंद्यांचे सामान वगैरेंचे मोठमोठे कारखाने येथे आहेत.
केनिग्झबर्ग तेराव्या शतकापासून महत्त्वाचे शहर असून तेथे पूर्व प्रशियाची राजधानी होती. सप्तवार्षिक युद्धात शहर रशियनांनी व्यापले होते आणि पहिल्या महायुद्धातही रशियाचा त्याच्यावर डोळा होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रशियन सैन्याने हा भाग व्यापला व १९४५ च्या पॉट्सडॅम कराराने शहर रशियाकडे आले. १९४६ मध्ये त्याला कालीनिनग्राड हे नवीन नाव मिळाले. सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ता इमॅन्युएल कांट याची ही जन्मभूमी. १८६४ मध्ये त्याचे स्मारक या शहरात उभारण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धात येथील बहुतेक सर्व ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त झाल्या.
लिमये, दि. ह.