कालाहारी : दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध वाळवंट. २०० द. ते २८० द. आणि १९० पू. ते २४० पू. क्षेत्रफळ २, ५९, ००० चौ. किमी. बोट्स्वाना, नैर्ऋत्य आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका संघराज्य या देशांमध्ये हे वाळवंट पसरले असून, त्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ९०० मी. आहे.
कालाहारीमध्ये बोट्स्वानामधील १६० किमी. लांबीच्या आणि ५०–८० किमी. रुंदीच्या माकारिकारी नावाच्या खचलेल्या प्रदेशात क्षार सरोवर बनले आहे. यामध्ये उत्तर सीमेवरील ओकाव्हँगो नदीचे पाणी मुरते. बेंग्वेला प्रवाहामुळे दक्षिण आफ्रिकेतील कालाहारी भागात कमी पर्जन्याचा रुक्ष प्रदेश निर्माण झाला असला, तरी कालाहारीच्या अतिरुक्ष दक्षिणेकडील भागातच वालुकागिरी आढळतात. दक्षिणेकडे पर्जन्यमान १०–१२ सेंमी असून उत्तरेकडे ते ४०–४५ सेंमी. पर्यंत असल्याने विशेषत: पावसाळ्यात बहुतेक सर्वत्र गवत उगवते. उत्तरेस खुरट्या वनस्पतींची अरण्येही आढळतात. बेओबाब (गोरखचिंच ) ही या रुक्ष प्रदेशातही तग धरून राहणारी चिवट वनस्पती हे येथील वैशिष्ट्य असून, जमिनीत खोलवर मोठ्या चेंडूच्या आकाराचा पाणी साठवून ठेवणारा ‘बी’ हा कंदमुळाचा प्रकार स्थानिक बुशमेन टोळ्यांना अडचणीच्या वेळी उपयुक्त ठरतो. प्राचीन प्रस्तराची लाल, पाणी शोषून घेणारी वाळू सर्वत्र असल्याने कालाहारीमध्ये पाण्याचे प्रवाह क्वचितच आढळतात. या प्रदेशाच्या नैर्ऋत्य भागात दक्षिण आफ्रिका संघराज्य व बोट्स्वानामध्ये २०,७२० चौ. किमी. चे कालाहारी गेम्सबॉक राष्ट्रीय उद्यान असून यामध्ये लांब शिंगाची गेम्सबॉक व इतर हरणे, शहामृग, हत्ती, सिंह, चित्ता, तरस, कोल्हा व इतर प्राणी आहेत. कालाहारीच्या अंतर्भागात शिकारीवर राहणारी बुशमेन ही एकच जमात असून कालाहारीच्या सरहद्दीवर बांटू जमात आढळते. मोटारीचे रस्ते झाल्यापासून पशुपालन आणि तदानुषंगिक व्यवसाय कालाहारीच्या काही भागांत वाढत आहेत.
शाह, र. रू.
“