कोनाक्री : पश्चिम आफ्रिकेतील गिनी लोकसत्ताकाची राजधानी. लोकसंख्या १,९७,२६७ (१९६७ अंदाज). किनाऱ्याजवळील लहान टोंबो बेटावर कोनाक्री वसले असून, मुख्य भूमीवरील कालोऊम द्वीपकल्पाशी ते ३४३·८मी. लांबीच्या पुलाने जोडलेले आहे. शहराची वाढ प्रामुख्याने दुसऱ्या महायुध्दानंतरच झाली आहे. फ्रेंच सत्तेखाली असल्याने शहरावर फ्रेंच ठसा दिसतो. रुंद, समांतर, वृक्षाच्छादित रस्ते, मोठ्या आधुनिक इमारती, उद्याने, वेगवेगळे विभाग इत्यादींनी शहराला आकर्षक बनविले असून, देशाचे हे सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच व्यापार व उद्योगांचे केंद्र आहे. कोनाक्री बंदरामध्ये अत्याधुनिक सोयी असून जवळच मोठा विमानतळ आहे. कोनाक्रीहून देशाच्या ईशान्य टोकावरील कांकान शहरापर्यंत ४९६ किमी. लांबीची रेल्वे असून ती पुढे माली-नायजर देशांत गेली आहे. देशातील आणि शेजारील राष्ट्रांच्या प्रमुख शहरांशी कोनाक्री उत्कृष्ट हमरस्त्यांनी जोडलेले आहे.

शाह, र. रू.