यार्कंद : (चिनी–साच). चीनच्या सिंक्यांग-ऊईगुर स्वायत्त प्रदेशातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र. लोकसंख्या ८०,००० (१९७५ अंदाज). हे ताक्लामाकान वाटवंटाच्या पश्चिम सरहद्दीवर याच नावाच्या मरूद्यानाच्या परिसरात यार्कंद नदीकाठी वसले आहे. तारीम खोऱ्यातील हे शहर कॅश्गारच्या आग्नेयीस सु. १६० किमी. वर असून कुनलुन पर्वतरांगेच्या उत्तर उतारावर सस. पासून सु. १,१८८ मी. उंचीवर आहे.

यार्कंद शहर पूर्वीपासूनच चीन व यूरोप यांदरम्यानच्या ‘रेशीम मार्गा’वरील केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. ते तटबंदीयुक्त अनेक विभागांनी मिळून बनलेले असून, त्यांतील सॉच व यार्कंत अथवा यार्कंद (तुर्की) या दोन प्रमुख विभागांवरून शहरास ही नावे पडली. इ.स.पू. दुसऱ्या शतकात हे शहर ‘साहचे जे राज्य’ म्हणून ओळखले जात होते. पामीर प्रदेशातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग या राज्याच्या ताब्यात होता. इ. स. पहिल्या शतकाच्या अखेरीस शेजारील राज्यांशी वारंवार होणाऱ्या लढायांमुळे हे राज्य दुर्बल बनले व पुढे ते चिनी सैन्याने ताब्यात घेतले. थांग राजवटीच्या काळात (६१८–९०६) या शहराचे व्यापारी दृष्ट्या पुन्हा महत्त्व वाढले. बाराव्या व तेराव्या शतकांत हे चाघताईच्या खानतीचे मुख्य ठिकाण होते. मार्को पोलो हा प्रसिद्ध इटालियन प्रवासी या शहरात व्यापाराच्या निमित्ताने आपल्या वडिलांसमवेत दोन वेळा (१२७१ व १२७५) येऊन गेला होता. सोळाव्या शतकाच्या अखेरीस स्थानिक राजकीय कलहांमुळे हे शहर कॅश्गार खानतीत समाविष्ट करण्यात आले आणि अठराव्या शतकाच्या मध्यास चीनच्या आधिपत्याखाली आले. १८७४ मध्ये येथे झालेल्या करारानुसार शहराला भारताशी व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली.

शहराचा परिसर (यार्कंद मरूद्यान) अत्यंत सुपीक असून तेथे मुख्यत्वे कापूस, हेंप, द्विदल धान्ये, फळे यांचे उत्पादन घेतले जाते. स्थानिक रेशीम उद्योगासाठी तुतीचीही लागवड केली जाते. शहरात भरतकाम तसेच सुती व रेशमी कापड, गालीचे, कातडी वस्तू, चटया इ. बनविण्याचे हस्तव्यवसाय चालतात.

क्षीरसागर, सुधा चौंडे, मा. ल.