कलीच बेग : (२७ सप्टेंबर १८५३ — ३ जुलै १९२९ ). एक अष्टपैलू सिंधी लेखक, जन्म हैदराबाद (सिंध) येथे. कवी, कादंबरीकार, नाटककार, निबंधकार, कट्टर समाजसुधारक आणि धर्मनिष्ठ मुसलमान ह्या नात्याने सिंधी साहित्यात ते प्रख्यात आहेत. कलीच हे जॉर्जियातील एका ख्रिस्ती सरदाराचे नातू. हा सरदार आपला मुलगा सिडनी याच्यासह एका युद्वात पकडला गेला. सिडनीने इस्लाम धर्म स्वीकारला. एका सिंधी सरदाराच्या प्रतिनिधीने सिडनीला सिंधमध्ये आणले आणि मुलासारखे वाढवून आपल्या मुलीबरोबर त्याचे लग्न लावून दिले. कलीच हे सिडनीचे पुत्र. ते बी. ए. च्या परीक्षेत नापास झाले तथापि नोकरीत स्वकर्तृत्वाने उपजिल्हाधिकार्‍याच्या हुद्यापर्यंंत चढत जाऊन सेवानिवृत्त झाले.

कलीचच्या साहित्यसेवेमुळेच सिंधी साहित्याची, विशेषत: सिंधी गद्याची, भक्कम पायावर उभारणी झाली. त्यांनी अरबी, फार्सी, उर्दू व इंग्रजीतही उत्कृष्ट ग्रंथांची सिंधीत भाषांतरे केली. त्याचे काही ग्रंथ इंग्रजीतही आहेत. सिंधीतील पहिली स्वतंत्र कादंबरी झीनत (१८९०) त्यांनीच लिहिली. तसेच सिंधीतील पहिली एकांकिका, पहिले प्रवासवर्णन व फार्सी छंदशास्त्रावरील पहिला सिंधी ग्रंथ त्यांचाच आहे. त्यांनी शेती, आरोग्य, संगीत, हस्तसामुद्रिक, लैंगिकता यांवरही सिंधीत लेखन केले. इतकेच नव्हे, तर त्यांनी सिंधीत शब्दकोशांची व इतिहासग्रंथांची रचना करून बहुमोल साहित्यसेवा केली. त्यांची सिंधी आणि इंग्रजी ग्रंथसंख्या दीडशेवर भरेल.

त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कविता दीवान कलीच (१९०६) ह्या नावाने संग्रहीत आहे. नाट्यपूर्ण चित्तवेधकता, विनोदी व खुसखुशीत संवाद आणि मिस्कीलपणाचा सार्वत्रिक सूर या गुणांमुळे त्यांच्या एकांकिका वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. त्यांच्या निबंधांतून त्यांचा कोटिबाजपणा आणि प्रखर बुद्धिमत्ता यांचे दर्शन घडते. १८७७ मध्ये बी. ए. ला असतानाच त्यांनी बेकनच्या निबंधांचे सिंधी भाषांतर केले. उच्च व उदात्त विचार आपल्या सुबोध व आकर्षक शैलीत मांडण्याचे कसब त्यांच्या लेखणीत आहे. सिंधी साहित्यात त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण मानले जाते. हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले.

हिरानंदाणी, पोपटी आर. (इं) शिरोडकर, द.स. (म.)