काटेभोवरी :(कृष्णसारिवा हिं. काळी दुधी, श्यामलता क.गोर्विबळळी सं. सारिवा, गोपिनी इं. ब्लॅक क्रीपर लॅ. इक्नोकार्पस फ्रुटेसेन्स कुल-ॲपोसायनेसी). ह्या मोठया वेलीसारख्या [महालता] झुडुपाचा प्रसार भारतात बहुतेक सर्वत्र असून श्रीलंका, जावा व ऑस्ट्रेलिया येथेही आहे. कोवळया फांद्यावर बारीक पिंगट लव असते. पाने संमुख (समोरासमोर), दीर्घवृत्ताकृती-आयतवरुन गुळगुळीत, खालून लवदार व फिकट फुले पुष्कळ, हिरवट पांढरी ती फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत, तांबूस, लवदार, त्रिपाद वल्लरीवर  [→पुष्पबंध] नोव्हेंबर-डिसेंबरात येतात. पेटिकाफळ सरळ किंवा किंचित वाकडे, रेषाकृती, बारीक व दंडगोलाकृती बिया लांबट, काळ्या व त्यांवर केसांचा तोकडा झुबका असतो.

मुळांचे गुणधर्म ⇨ अनंतमुळाप्रमाणे, आरोग्यपुनर्स्थापक आणि पौष्टिक असून सार्सापरिलाऐवजी देतात. कातडीस फोड आल्यास किंवा ती फुटल्यास मूळ लावतात. पानांचा व देठांचा काढा तापावर देतात. शोभेसाठी ही वेल बागेत लावतात. खोडाचे दोर करतात.

पहा:ॲपोसायनेस्री.

 

जमदाडे, ज.वि.