काझ्वीन : इराणमधील पूर्वीच्या काझ्वीन प्रांताची राजधानी. लोकसंख्या ९२,००० (१९७१ अंदाज). एल्बर्झ पर्वताच्या दक्षिणेकडील विस्तीर्ण व अतिशय सुपीक प्रदेशात ते तेहरानच्या वायव्येस १४५ किमी. वर वसले आहे. काझ्वीन कित्येकदा भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेले आहे. चौथ्या शतकात अस्तित्वात आलेले हे शहर मध्ययुगात बरेच भरभराटलेले होते. सफाविद घराण्यातील एका राजाने आली राजधानीच येथे केल्याने काझ्वीन वैभवशाली बनले. त्यावेळच्या कित्येक वास्तू, विशेषतः मशिदी, आजही प्रेक्षणीय आहेत. रेल्वे, मोटारी आणि विमान वाहतुकींचे काझ्वीन महत्वाचे केंद्र असून शहरात कापड, पीठ व तेल ह्यांच्या गिरण्या आणि सतरंज्या, मद्ये व साबणाचे कारखाने आहेत. येथल रग तसेच रेशीम व भरतकामाच्या वस्तू पूर्वीपासून प्रसिध्द आहेत. आसमंतातील समृध्द शेतमालाचे ते एक मोठे व्यापारी केंद्र आहे.

गद्रे, वि. रा.