करवंद : (हिं. करोंदा गु. करमरडा क. कारेकाई सं. कंचुका इं. बेंगॉल करांट लॅ. कॅरिसा करंडास कुल- ॲपोसायनेसी). या मोठ्या काटेरी व सदापर्णी झुडुपाचा प्रसार भारतात सर्वत्र जंगली अवस्थेत आढळतो विशेषतः शुष्क व खडकाळ ठिकाणी सर्वत्र आहे.
शिवाय श्रीलंका, जावा, तिमोर येथेही ते आढळते. खोड आखूड असून फांद्या व लांब काटे द्विभक्त (एका कडेला थोडेसे चिकटून दोन समान भागांचे तयार झालेले) लहान फांद्या एकांतरित (एकाआड एक). पाने साधी, संमुख (समोरासमोर), लहान, चिवट, लंबगोल किंवा व्यस्त अंडाकृती, गुळगुळीत व चकचकीत फुले पांढरी, अपछत्राकृती (खालचा भाग नळीसारखा व वरचा भाग तबकासारखा असलेला पुष्पमुकुट), लोमश (लवदार) असून गुलुच्छ वल्लरीत [→पुष्पबंध] ती शेंड्याकडे जानेवारी-एप्रिलमध्ये येतात [→फूल]. मृदुफळ गोल किंवा किंचित लंबगोल, पिकल्यावर जांभळट काळे, गोटीसारखे, गुळगुळीत असते. बिया बहुधा चार. सामान्य शारीरिक लक्षणे ॲपोसायनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. फळ स्कर्व्हीनाशक. कच्चे फळ स्तंभक (आकुंचन करणारे), पक्व फळ शीतकर (थंडावा आणणारे) व आंबट गोड मूळ कडू, दीपक (भूक वाढविणारे) व कृमिनाशक. पानांचा काढा पाळीच्या तापावर प्रारंभी देतात. कच्च्या फळांचे लोणचे करतात, पिकलेली फळे खातात टार्ट व पुडिंग नावाच्या पाश्चात्य खाद्य पदार्थांत घालतात. लाकूड कठीण व गुळगुळीत असून त्यापासून कातीव वस्तू, फण्या, चमचे वगैरे करतात.
जमदाडे, ज. वि.
“