कॅलॅडियम : फुलझाडांपैकी (आवृतबीज, एकदलिकित) ॲरेसी [→ ॲरॉइडी] कुलातील एका वंशाचे लॅटिन नाव. या वंशात सु. १२ जाती (विलिस यांच्या मते १५) अंतर्भूत केलेल्या असल्या, तरी साधारणपणे पाच जाती मुख्य समजल्या जातात. त्यांचे अनेक प्रकार आहेत. द. अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय भाग हे त्यांचे मूलस्थान असून थंड प्रदेशात विविधरंगी पानांच्या शोभेकरिता त्या उष्णगृहात लावतात. इतरत्र, बागेत वाफ्यांच्या कडेने किंवा झुडुपांमधील मोकळ्या जागेतही लावतात. कॅलॅडियम बायकलर कॅ. पिक्चुरेटम या दोन प्रमुख जातींपासून लागवडीतील अनेक शोभिवंत प्रकार निघाले आहेत. भारतात अनेक जाती किंवा संकरज (दोन भिन्न वंश वा जाती यांच्यापासून झालेली संतती) प्रकार, विशेषतः बागेत लावतात काही प्रकार शीतगृहात व कुंड्यांमध्येही वाढवतात. सर्व जाती लहान, नाजूक,बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणार्‍या) औषधी [→ ओषधि] असून त्यांना भूमिस्थित (जमिनीतील ) खोड [मूलक्षोड, ग्रंथिक्षोड, → खोड] असते. त्यापासून जमिनीवर ⇨अळूसारखी लांब देठाची, विविध प्रकारे चित्रित पात्यांची, बहुधा छत्राकृती, तळाशी हृदयाकृती किंवा शराकृती पाने येतात. प्रारंभिक शिरा पसरलेल्या व दुय्यम तिरप्या फुलोर्‍याचा [→ स्थूलकणिश, → ॲरॉइडी पुष्पबंध] दांडा बहुधा एकटा, महाच्छद सुरळीसारखा व विविधरंगी फुले एकलिंगी व मृदुफळे पांढरी असतात. ॲथूरियम वंशातील काही जाती कॅलॅडियम नावाने सामान्यपणे ओळखल्या जातात. नवीन लागवड खोडाच्या तुकड्यांपासून करतात. यांना सकस जमीन, सावली व ओलावा आवश्यक असतो. काही प्रकार उघड्या जागीही वाढतात.

परांडेकर, शं. आ.

कॅलॅडियम