खंड-१ : पृथ्वीच्या पृष्ठाचा समुद्राबाहेरचा निसर्गत: सलग मोठा भूभाग म्हणजे खंड, भूमीखंड किंवा महाद्वीप होय. वास्तविक खंडाची सीमा म्हणजे समुद्रकिनारा नव्हे. किनाऱ्यापासून समुद्रात सु. १५० ते २०० मी. खोलीपर्यंतच्या उथळ समुद्राचा तळ हा खंडाचाच भाग असतो. त्याला सागरमग्न खंडभूमी किंवा समुद्रबूडजमीन म्हणतात. तिच्या पलीकडे समुद्रतळ एकदम उतरता होत जातो व तो खंडान्त उतार सागरतळावरील सपाट मैदानी प्रदेशापर्यंत पोहोचतो. पृथ्वीचा एकूण पृष्ठभाग सु. ५१ चौ. किमी. क्षेत्रफळाचा आहे. त्यापैकी २९·२२ टक्के म्हणजे सु. १४·९ कोटी चौ.किमी. क्षेत्रफळाचा पृष्ठभाग समुद्राबाहेर, जमिनीचा आहे व उरलेला ७०·७८ टक्के पृष्ठभाग म्हणजे सु. ३६·१ कोटी चौ. किमी. समुद्राच्या पाण्याखाली आहे. समुद्रबूड- जमीन धरून खंडांचा प्रदेश ३५ टक्के व समुद्राचा भाग ६५ टक्के होईल.
भूभागाची एकूण सात खंडे मानलेली आहेत. ती म्हणजे आशिया (सु. ४·४२ कोटी चौ. किमी.), आफ्रिका (सु. ३ कोटी चौ. किमी.), उ. अमेरिका (सु. २·४ कोटी चौ. किमी.), द. अमेरिका (सु. १·८ कोटी चौ. किमी.), अंटार्क्टिका (सु. १·३ कोटी चौ. किमी.), यूरोप (सु. ०·९९ कोटी चौ. किमी.) व ऑस्ट्रेलिया (०·७७ कोटी चौ. किमी.). ग्रीनलंड हे सर्वांत मोठे बेट आहे (सु. ०·२२ कोटी चौ. किमी.), खंड नव्हे. खंडाच्या जवळची बेटे त्या त्या खंडात समाविष्ट मानतात; उदा., ग्रीनलंड अमेरिकेत; आइसलँड व ब्रिटिश बेटे यूरोपात; मादागास्कर आफ्रिकेत; जपान, तैवान (फॉर्मोसा), फिलिपीन्स, इंडोनेशिया व श्रीलंका ही आशियात धरतात. न्यूझीलंड, न्यू गिनी व इतर अनेक पॅसिफिक बेटे व ऑस्ट्रेलिया मिळून ऑस्ट्रेलेशिया किंवा ओशिॲनिया खंड मानतात.
भूविभागाची उंची व सागरविभागाची खोली सरासरी समुद्रसपाटीपासून मोजतात. भूविभागाची सर्वांत जास्त उंची मौंट एव्हरेस्ट येथे ८,८४७·६ मी. असून त्याची सरासरी उंची ८४० मी. आहे. सागरविभागाची सर्वांत जास्त खोली पश्चिम पॅसिफिक महासागरातील मेअरीॲना ट्रेंच येथे ११,०३५ मी. असून त्याची सरासरी खोली ३,८०८ मी. आहे. पृथ्वीच्या एकूण पृष्ठाचा सु. २०·८ टक्के भाग सरासरी समुद्रसपाटीपेक्षा १,००० मी. पर्यंत उंचीचा आहे. ४·५ टक्के भाग १ ते २ हजार मी.पर्यंत, २·२ टक्के भाग २ ते ३ हजार मी.पर्यंत, १·१ टक्के भाग ३ ते ४ हजार मी.पर्यंत, ०·४ टक्के भाग ४ ते ५ हजार मी.पर्यंत व उरलेला ५ हजार मी.हून अधिक उंचीचा आहे. तसेच ८·५ टक्के भाग सरासरी समुद्रसपाटीखाली १ हजार मी. खोलीचा, ३ टक्के १ ते २ हजार मी. खोलीचा , ४·८ टक्के भाग २ ते ३ हजार मी. खोलीचा, १३·९ टक्के भाग ३ ते ४ हजार मी. खोलीचा, २३·३ टक्के भाग ४ ते ५ हजार मी. खोलीचा, १६·४ टक्के ५ ते ६ हजार मी. खोलीचा व उरलेला १ ते ६ हजार मी.हून अधिक खोलीचा आहे.
खंडांची पृथ्वीपृष्ठावरील वाटणी विषम आहे. उत्तर गोलार्धात खंडांचा भाग– भूविभाग अधिक आहे आणि सागरविभाग त्या मानाने कमी आहे, तर दक्षिण गोलार्धात भूविभागाच्या मानाने सागरविभाग अधिक आहे. साधारणत: उत्तरमध्य फ्रान्समध्ये मध्यबिंदू धरून एक गोलार्ध कल्पिला, तर त्यात बहुतेक सर्व खंडभूमी समाविष्ट होईल. खंडांच्या आकाराचेही वैशिष्ट्य असे, की अंटार्क्टिकाखेरीज सर्व खंडे उत्तरेकडे रूंद आणि दक्षिणेस निमुळती आहेत. पृथ्वीवरील त्यांच्या स्थानांचे वैशिष्ट्य असे, की उत्तर ध्रुवाभोवती महासागर आहे, तर दक्षिण ध्रुवाभोवती भूमिखंड आहे. तसेच सामान्यत: खंडांच्या उलट बाजूस (प्रतिध्रुवस्थप्रमाणे) सागरविभाग आहेत. सर्व खंडे एकमेकांपासून अलग आहेत. याला अपवाद म्हणजे यूरोप व आशिया. ही दोन्ही खंडे मिळून वास्तविक एकच यूरेशिया हे खंड आहे आणि यूरोप हा त्याचा पश्चिमेकडील मोठा द्विपकल्पीय भाग आहे. यूरोप, आशिया व आफ्रिका ही खंडे अगदी जवळजवळ असून त्यांचा एक गट आहे. तर उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांचा दुसरा गट आहे. ऑस्ट्रेलेशिया हा आशियाचा आग्नेयीस अगदी बाजूला दूर पडलेला आहे, तर अंटार्क्टिका दक्षिण ध्रुवाभोवतीच आहे. ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका ही अगदी संपूर्णपणे समुद्रवेष्टित आहेत. उत्तर व दक्षिण अमेरिका यांतील सीमा म्हणजे पनामा व कोलंबिया यांमधील राजकीय सीमा, असे परंपरेने मानले जाते. सुएझ कालवा, तांबडा समुद्र आणि हिंदी महासागर यांना जोडणाऱ्या रेषेच्या पश्चिमेला आणि भूमध्य समुद्राच्या दक्षिणेला आफ्रिका खंड आहे. यूरोप आणि आशिया यांमधील सीमा मात्र अगदीच कृत्रिम आहे. उरल पर्वत, उरल नदी, कॅस्पियन समुद्र, कॉकेशस पर्वत, काळा समुद्र, बॉस्पोरसची सामुद्रधुनी, मार्मारा समुद्र, दार्दानेल्सची सामुद्रधुनी व इजीअन समुद्र यांना जोडणारी रेषा या दोन खंडांची सीमा मानतात. आफ्रिका खंड हे सर्वांत अधिक सुसंहत आहे. त्याचा किनारा सरळ असून किनारा व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर सर्वांत कमी आहे. हे गुणोत्तर यूरोपच्या बाबतीत सर्वांत जास्त आहे. त्याचा किनारा अनेक द्विपकल्पे, आखाते, भूशिरे, उपसागर, फ्योर्ड यांनी युक्त असून अतिशय दंतुर आहे. उ. अमेरिका, यूरोप व आशिया या खंडांनी उत्तरेस आर्क्टिक महासागर इतका काही वेढून टाकला आहे, की तो अटलांटिक व पॅसिफिक यांपासून जवळजवळ अलगच झाला आहे. प्रत्येक खंडावर पर्वत, पठारे, मैदाने, समुद्रकिनारा, सरोवरे व जवळपास बेटे ही प्रमुख भूमिस्वरूपे दिसून येतात. अंटार्क्टिका खंडावर बर्फाचा फार मोठा जाडीचा थर असल्यामुळे त्याची प्राकृतिक रचना दिसून येत नाही. आफ्रिका खंड हे बहुतांशी एक मोठे पठारच आहे. त्यावर एकच एक सलग अशी पर्वतश्रेणी नाही. सर्व खंड मिळून मात्र पर्वतश्रेणीचे दोन प्रमुख पट्टे दिसून येतात. एक दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका यांचा पश्चिम किनारा व आशियाचा पूर्व किनारा यांवरून ऑस्ट्रेलियाकडे जातो व पॅसिफिक महासागरला जणू वेढूनच टाकतो. दुसरा मध्य आशिया व दक्षिण यूरोपातून जवळजवळ पूर्वपश्चिम दिशेने जातो. या दोन पट्ट्यांच्या अनुरोधानेच जगातील बहुतेक सर्व भूकंपक्षेत्रे व ज्वालामुखी केंद्रे आहेत. उत्तर अमेरिका, यूरोप व आशियाचा पश्चिम भाग यांच्या उत्तरेस हिमयुगांच्या अखेरीस उत्तरेस सरकत गेलेल्या हिमस्तरामुळे बनलेली विस्तीर्ण मैदाने व असंख्य सरोवरे आहेत. खंडांची पृथ्वीपृष्ठावरील विषम वाटणी, त्यांचे आकार, आकृती व स्वाभाविक रचना यांमुळे त्यांचे हवामान, त्यांवरील माती, वनस्पती व प्राणी यांत महत्वाचे फरक पडलेले आहेत. लोकवस्तीची घनता व लोकांचे व्यवसाय यांमध्येही वैचित्र्य आढळते. पूर्व आग्नेय व द. आशिया, वायव्य यूरोप व उ. अमेरिकेचा ईशान्य भाग येथे लोकवस्तीची घनता विशेष जास्त आहे. त्याची कारणे प्राकृतिक व सांस्कृतिक दोन्ही प्रकारची आहेत. मासेमारीच्या व्यवसायाला सागरमग्न खंडभूमी अत्यंत अनुकूल ठरते. या भूमीची रूंदी निरनिराळ्या खंडांभोवती कमीअधिक असलेली दिसते. तिच्यावर पूर्वी समुद्राबाहेर असलेल्या नद्यांच्या दऱ्या व घळया आढळून येतात. खंडान्त उतारावरही अशा घळया आढळून आल्या आहेत. नद्या, नाले, वारा इत्यादिकांनी वाहून आणलेल्या पदार्थांचे निक्षेप या भूमीवर साचतात व त्यांपासून गाळाचे खडक तयार होतात. या भूमीवरील खडकात उष्ण व थंड सागरप्रवाह एकत्र आले, तर त्यामुळे सूक्ष्मजीव व वनस्पती यांचे बनलेले प्लँक्टन हे माशांचे खाद्य भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. उथळ समुद्रात सूर्यप्रकाशही काही ठिकाणी तळापर्यंत पोहोचतो व तेथे माशांच्या पैदाशीस अनुकूल परिस्थिती निर्माण होते. यामुळे उत्तर अमेरिकेचा वायव्य व ईशान्य किनारा, यूरोपचा वायव्य किनारा व आशियाचा ईशान्य किनारा ही जगात मासेमारीची प्रसिद्ध क्षेत्रे बनली आहेत. जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सोव्हिएट युनियन, ब्रिटिश बेटे, नॉर्वे यांसारख्या देशांना रूंद समुद्रबूडजमिनीवरील समुद्रात सहज प्रवेश असल्यामुळे ती जगातील प्रमुख मच्छीमार राष्ट्रे बनली आहेत.
न्यूटनच्या गुरूत्वाकर्षण सिद्धांतानुसार पृथ्वीची आकृती गोल बनली आणि तिच्या परिवलनामुळे ती मध्याजवळ म्हणजे विषुववृत्ताजवळ काहीशी फुगीर व ध्रुवाजवळ काहीशी चपटी बनली. मात्र हा चपटेपणा अगदी थोडा आहे. तिचा विषुववृत्तीय व्यास आणि ध्रुवीय कक्ष यांत फक्त ३५ किमी. चा फरक आहे. तिच्या १२,७४२ किमी. च्या सरासरी व्यासाच्या मानाने हा फरक अगदीच नगण्य आहे. पृथ्वीची ही गोलसदृश आकृतीही पूर्णपणे गोलसदृश नाही. याचे कारण म्हणजे तिचे कवच ज्या खडकांचे बनलेले आहे, ते खडक सर्वत्र सारख्या जडपणाचे किंवा सारख्या जाडीचे नाहीत. खडक ज्या द्रव्यांचे बनलेले असतात, ती द्रव्ये सर्व खडकांत सारख्या प्रमाणात नसतात. या द्रव्यांपैकी सिलिका, ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम ही विशेष महत्त्वाची आहेत. ज्या खडकांत सिलिका व ॲल्युमिनियम ही द्रव्ये अधिक प्रमाणात असतात, ते खडक हलके असतात. त्यांना ‘सियाल’ म्हणतात. ते काहीसे ठिसूळ असून दाब दिल्यास त्यांना तडे जातात. ज्या खडकांत सिलिका व मॅग्नेशियम यांचे प्रमाण जास्त असते ते जड असतात. त्यांना ‘सिमा’ असे म्हणतात. ते काहीसे लवचिक असून दाब दिल्यास त्यांना बाक येतो. सियालमध्ये ग्रॅनाइट हा मुख्यत्वेकरून असतो व सिमामध्ये मुख्यत: बेसाल्ट असतो. सियालचे विशिष्ट गुरूत्व सरासरीने २·७ असते, तर सिमाचे २·८ ते ३ पर्यंत असते. त्यात आणखी काही अधिक जड ३·४ विशिष्ट गुरूत्वाचे खडक असतात. सियाल हा हलका भाग वर येऊन त्यांची खंडे बनली व सिमा या जड खडकांवर गुरूत्वाकर्षण अधिक होऊन तेथे कवचाला खळगे पडले. तेथे मग महासागर तयार झाले. महासागरांखाली फक्त सिमांचा थर असत, सियाल बहुधा नसतो. क्वचित काही जागी सियालचे तुटक पातळ थर आढळतात. खंडांखाली प्रथम सियाल व मग त्यानंतर सिमाचे थर असतात. याचा अर्थ असा, की पृथ्वीच्या कवचात खालच्या बाजूस एक सलग असा सिमाचा थर आहे. त्यावर ठिकठिकाणी तुटक अशी सियालची खंडे उभी आहेत. सियालची जाडी सु. १२-१३ किमी. आहे, तर सिमाची सु. २०–२५ किमी. असते. भूपृष्ठावर जेथे पर्वत आहेत, तेथे सियालचा थर सिमामध्ये अधिक खोलपर्यंत गेलेला असतो. पृथ्वीचा गाभा मुख्यत: लोखंड व निकेल या धातूंचा मिळून झालेला आहे व त्याची जाडी म्हणजे मध्यापासूनची त्रिज्या ३·४७३ किमी. आहे. हा गाभा आणि पृथ्वीचे कवच यांच्या दरम्यान २,८८२ किमी. जाडीचा व ४·१३ विशिष्ट गुरूत्वाचा मँटल नावाचा जड खडकाचा थर आहे. या खडकांना– ऑलिव्हीन, सिमा व मँटल जेथे एकत्र येतात त्यांना – मोहो म्हणतात. खंडे व त्यांच्याखालचा सियालचा थर यांच्या वजनामुळे त्याखालचा सिमाचा थर खाली दबला गेला आहे, म्हणजे खंडे ही सिमाच्या थरावर जणू काही तरंगत आहेत, अशी कल्पना एडुआर्ट झ्यूस याने या शतकाच्या सुरुवातीस मांडली.
महासागरांची भांडी– खळगे– सापेक्षत: आधी तयार झाली व ती तशीच नेहमी पाण्याखाली राहिली. खंडमंच कोट्यावधी वर्षे स्थिर राहिले, तरी त्यांवरील खडकांचा ज्वालामुखीक्रियेशी संबंध येऊन भूकवचात प्रचंड उलथापालथ झाली आणि मगच ते स्थिर झाले. प्रत्येक खंडावर निदान एक एक ढालप्रदेश आहे. तो अत्यंत प्राचीन खडकांचा बनलेला असून सु. २ ते ४ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाला असावा. ढालप्रदेश म्हणजे त्या त्या खंडाचा गाभाच होय. बाकीचा भाग नंतर त्याच्याभोवती तयार होत गेला. ढालप्रदेशातसुद्धा त्याच्या केंद्राजवळचे खडक अधिक प्राचीन असतात. उ. अमेरिकेत कॅनेडियन किंवा लॉरेन्शियन ढालप्रदेश आहेत. द. अमेरिकेत गियाना व ब्राझीलचे पठार हे ढालप्रदेश आहेत. यूरोपात स्कँडिनेव्हिया व फिनलंड येथे बाल्टिक ढालप्रदेश आहे. पूर्व सायबीरीया, पश्चिम ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व भारतातील द्वीपकल्पीय पठार हेही ढालप्रदेशच आहेत.
१८७५ मध्ये ग्रीन याने पृथ्वीची आकृती आणि खंडे व महासागर यांची सापेक्ष स्थाने यांविषयी ‘चतु:शिरस्क परिकल्पना’ मांडली. निवणारा गोल पदार्थ आकसून चतु:शिरस्कासारखा होतो, हे प्रयोगान्ती सिद्ध करता येते. पृथ्वीसुद्धा निवताना अशीच आकृती धारण करते, अशी ही कल्पना आहे. चतु:शिरस्काच्या चारी टोकांवर व सहाही कडांवर हल्लीची खंडे आहेत आणि त्याच्या त्रिकोणी सपाट बाजूंवर महासागर आहेत. दक्षिण ध्रुवाजवळचे अंटार्क्टिक खंड नेमके उ. ध्रुवाभोवतीच्या आर्क्टिक महासागराच्या विरुद्ध बाजूस येते; बाकीची खंडे व महासागर यांची स्थानेही अशीच एकमेकांविरुद्ध येतात. पातळ रबराचा चतु:शिरस्क तयार करून तो फुगविला, तर जसा होईल तशी पृथ्वीची आकृती आहे, असे या कल्पनेच्या पुरस्कर्त्याचे म्हणणे. किरणोत्सारण क्रिया, पृथ्वीचे परिवलन इत्यादींच्या संदर्भात ही परिकल्पना आता मागे पडली आहे.
१८८९ मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ डटन याने समाधार कल्पना मांडली. या कल्पनेप्रमाणे खालच्या खडकांच्या कमीअधिक जडपणाच्या अनुरोधाने खंडांची उंची व महासागरांची खोली ठरून गुरूत्वाकर्षणाच्या दृष्टीने समतोलत्व प्राप्त होते. दोन बरोबर दक्षिणोत्तर ठिकाणांमधील अक्षांश अंतर खगोलशास्त्राधारे व प्रत्यक्ष सर्वेक्षणाने ठरविले, तर त्यात थोडा फरक पडतो. कारण जवळपासच्या पर्वतांच्या आकर्षणाचा परिणाम या प्रयोगात वापरल्या जाणाऱ्या ओळंब्यावर होतो. हा परिणाम अपेक्षेपेक्षा कमी आढळला. याचा अर्थ असा, की पर्वतांची घनता बऱ्याच खोलीपर्यंत कमी असली पाहीजे. अशी निरीक्षणे व भूकंपलेखांचा अभ्यास यांवरून असे अनुमान निघाले, की पर्वत हे हलक्या सियाल थरांचे असल्यामुळे त्यांच्याखालील कवचस्तंभ ५०–६० किमी. पर्यंत खोल असावे. समुद्रसपाटीजवळच्या भागात सियालची जाडी फक्त ३० किमी. किंवा कमी भरते. पर्वतांची झीज होऊन ती समुद्रात येऊन पडली, की पर्वतांखालचा कवचस्तंभ हलका होतो व समुद्राखालील कवचस्तंभ जड होतो. यामुळे समतोल बिघडतो. तो पुन:स्थापित होण्यासाठी कवचावर खाली खचण्याच्या व वर उचलले जाण्याच्या मंदगती क्रिया सुरू होतात. सियालखालचे दाट पदार्थ बाजूला सरकू लागतात व शेवटी पुन्हा समतोल प्रस्थापित होतो. सागरी गाळ उंच ठिकाणी आढळतो, याचे स्पष्टीकरण समाधार परिकल्पनेप्रमाणे होऊ शकते.
व्हेगेनर (१८८०–१९३०) या शास्त्रज्ञाच्या मते पृथ्वीवरील सर्व खंडप्रदेश पूर्वी एकत्र, एक सलग प्रदेश होता. या प्रदेशाला त्याने ‘पॅनजिआ’ हे नाव दिले. हा खंडप्रदेश त्या खालच्या घट्ट व जड खडकांवर तरंगत होता. सु. २० कोटी वर्षांपूर्वी हा प्रदेश फुटला व हल्लीची उत्तर व दक्षिण अमेरिका खंडे पश्चिमेकडे व यूरेशिया व ऑस्ट्रेलिया खंडे पूर्वेकडे सरकत किंवा वाहत गेली. याला खंडप्लवन म्हणतात. उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा आणि यूरोपचा पश्चिम किनारा, तसेच दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा आणि आफ्रिकेचा पश्चिम किनारा यांच्यामधील साम्य या उपपत्तीला पोषक ठरते. हे किनारे एकत्र आणले, तर बहुतांशी एकमेकांत ठाकठीक बसतील. आफ्रिकेच्या पूर्वेकडील शिंग व भारतातील खंबायतचे आखात यांच्या बाह्य रेषांतील साम्यही लक्षात घेण्याजोगे आहे. अलीकडे भूशास्त्र आणि भूकंपालेखशास्त्र यांची बरीच वाढ झालेली आहे. त्यांवरूनही या खंडप्लवन उपपत्तीला काहीसा पाठिंबा मिळतो. दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका यांचा मिळून जो एक सलग भूप्रदेश होतो, त्याला ‘गोंडवन’ प्रदेश म्हणतात. पुराजीव महाकल्पानंतर या गोंडवन प्रदेशाचे मोठेमोठे विभाग विभक्त होऊन ते खालच्या सिमा व मँटल भागांवरून घसरू लागले. त्यांची एकमेकांपासूनची आणि ध्रुवांच्या संदर्भातीलही स्थाने बदलली. पर्मो कार्बानिफेरस हिमानीक्रियेच्या काळात साठलेले गाळ दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका या भागांत आढळतात. सध्या हे भूविभाग पृथ्वीपृष्ठावर दूर दूर आहेत. त्यांपैकी काही भाग तर उष्ण कटिबंधात आहेत आणि तेथे बर्फ तयार होणे असंभवनीय आहे. ही हिमानीक्रिया सुरू झाली तेव्हा ही खंडे दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र झालेली असावीत, असा मोठा संभव आहे. या खंडातील खडकांतही पुष्कळ साम्य दिसून येते.
दक्षिण अमेरिका ते पॅसिफिकभोवती इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियापर्यंत आणि स्पेन ते चीनपर्यंत असे जे पर्वतप्रदेशांचे पट्टे आहेत, ते चल आहेत. त्यांच्या समुद्राकडील बाजूस मोठमोठे भूद्रोणीप्रदेश आहेत. अशा भूद्रोणीप्रदेशांत पर्वतावरील प्रचंड खननक्रियेमुळे वाहून आलेले पदार्थ साचतात. त्यांच्या भारामुळे द्रोणीप्रदेश खचतो आणि त्यात अधिकच गाळ साठू लागतो. हा प्रदेश खचून त्याचा खालचा भाग फार तापतो व परिणामी चल पर्वतप्रदेशाचे पट्टे जोराने वर उचलले जाऊन वलीकरणाने उंच उंच पर्वत तयार होतात. वितळलेली द्रव्ये वलीकृत खडकांत घुसतात. या प्रकारच्या भूपृष्ठ हालचालीला गिरिजनक हालचाल म्हणतात. भूरूपजनक हालचालींत पर्वत तयार न होता भूपृष्ठाला थोडासा बाक किंवा कल येतो. पठारे या प्रकारच्या क्रियेमुळे बनतात. या हालचालींत विभंगक्रिया झालेली दिसते. समुद्रकिनाऱ्याजवळ किंवा समुद्राखाली असलेल्या पुळणी, गुहा, लाटांची क्रिया झालेले भूभाग,निखातकस्तर यांसारख्या गोष्टी उंच जागी दिसून येतात. त्यावरून ही हालचाल झाल्याचे समजून येते. सुरतेजवळ बेसाल्टवर चुनखडकाचे थर आढळून येतात.यावरून दक्षिण पठार हे उचलले गेले असावे असे मानतात. किनाऱ्याजवळ समुद्राच्या पाण्याखाली बुडलेली अरण्ये, दऱ्या, इमारती वगैरे आढळतात. यावरून खचण्याची क्रिया समजून येते. भारताच्या किनाऱ्याजवळही याची साक्ष आहे.
भूपृष्ठाच्या खालीवर हालचालींची आणखी एक उपपत्ती अशी, की खडकांतील किरणोत्सारी विघटनामुळे उष्णता उत्पन्न होते. सियालच्या थरामुळे ती बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे सिमा अधिक प्रवाही होत असावा व त्यामुळे खंडे अधिक खाली जात असावीत. परिणामत: समुद्राचे जमिनीवर आक्रमण होते. ज्वालामुखी क्रियेमुळे उष्णता निघून गेली, की सिमा घट्ट होऊ लागतो आणि खंडे वर येऊ लागतात. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर गाळाचे थर साचलेले असतात.
हिमाच्छादनामुळे ध्रुवाजवळ बर्फाचा जाड थर बनतो. त्याच्या वजनाने कवच दबले जाते व बर्फ वितळले की ते पुन्हा पूर्ववत होते. उत्तर यूरोपचे हे उत्थापन अद्याप चालू आहे. स्कँडिनेव्हियाच्या भोवती पूर्वीचे पुलिन आताच्या बाल्टिक समुद्राच्या पातळीच्या बरेच वर दिसून येत आहेत.
खंडप्लवन उपपत्ती किंवा समाधार उपपत्ती किंबहुना खंडांच्या उपपत्तीबद्दलची कोणतीच सर्वसंग्राहक उपपत्ती सध्या सर्वशास्त्रज्ञसंमत नाही. पृथ्वीच्या अंतरंगाबद्दलची माहिती आणि भूकंपालेखशास्त्राने मिळणारी माहिती ही अलीकडील काळातील प्रगती आहे. तिच्यामुळे या विषयांकडे पाहण्याची सखोल दृष्टी प्राप्त झाली आहे.
यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खंडांची वाटणी व त्या खंडांवरील भूमिस्वरूपांची वाटणी कशी झाली असावी, हे अद्याप कूट प्रश्नच आहेत. अनेक आधुनिक शास्त्रांच्या साहाय्याने ते सोडविण्याचा प्रयत्न चालू आहे.
संदर्भ : 1. Monkhouse, F. J. Principles of Physical Geography, London, 1962.
2. Strahler, Arther N. Physical Geography, New York,1971.
कुमठेकर, ज. ब.