शेगाव: महाराष्ट्र राज्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रसिद्घ तीर्थक्षेत्र आणि तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ५२,४१८ (२००१). हे मुंबई—नागपूर—हावडा या मध्य रेल्वे मार्गावरिल प्रमुख स्थानक असून मुंबईच्या ईशान्येस ५४७ किमी. व नागपूरच्या पश्चिमेस २९१ किमी. अंतरावर आहे. शेगावहून खामगाव व आकोटकडे मुख्य रस्ते जातात. कापसाच्या व्यापाराचे हे महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे येथे सरकी काढण्याचे व कापसाच्या गाठी बांधण्याचे कारखाने आहेत. शेगाव येथे नगरपालिका (स्था. १८८१) तसेच अनेक शैक्षणिक संस्था असून महाविदयालयीन शिक्षणापर्यंतच्या सुविधा आहेत. शहरवासियांना नगरपालिकीय रूग्णालयामार्फत व इतर दवाखान्यांमार्फत आरोग्य सुविधा मिळतात.
पूर्वीपासूनच या ठिकाणी पाणी टंचाई असल्यामुळे १८७७ मध्ये १०१ हे. क्षेत्रात एक तळे बांधलेले आहे परंतु उन्हाळ्यामध्ये ते कोरडे पडत असल्यामुळे त्याला पूरक म्हणून १८९९ च्या दुष्काळामध्ये एक नवे तळे बांधण्यात आले. सध्या शहरामध्ये नळाव्दारे पाणीपुरवठा केला जातो. ज्ञानगंगा हे अर्धसाप्ताहिक व समाजकांती हे पाक्षिक येथून प्रसिद्घ होते.
इ. स. १८७८ मध्ये शेगाव येथे संत गजानन महाराजांना लोकांनी प्रथम पाहिले. १९१० मध्ये तेथेच त्यांनी समाधी घेतली. श्री गजानन महाराजांचे समाधि-मंदिर हे येथे येणाऱ्या भाविकांचे प्रमुख आकर्षण असते. शेगाव हे विदर्भातील एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्घी पावले आहे. विदर्भातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून येथे भाविक दर्शनासाठी येतात. शेगाव हे ‘वैदर्भीयांची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. प्रत्येक गुरूवारी पालखी प्रदक्षिणा असून भाविक मोठया श्रद्घेने दर्शनासाठी येतात. श्री गजानन महाराजांची आध्यात्मिक शक्ती व चमत्कार अनेकांनी अनुभविलेले असून, त्यांच्यावरील श्रद्घेने व त्यांच्या दर्शनाने इच्छा पूर्ण होतात, अशी भक्तांची धारणा आहे. येथील मंदिर विश्वस्त समितीकडे अनेक भाविक देणग्या देतात. यात्रेकरूंसाठी येथे भक्त निवासाची सोय असून दररोज धार्मिक प्रवचने होतात. या संस्थानामार्फत अनेक आरोग्यविषयक व शैक्षणिक प्रकल्प राबविले जातात. श्री गजानन महाराजांचा प्रसाद म्हणून पोटभर जेवण भाविकांनाअल्प दरात मिळते. प्रतिवर्षी श्री गजानन महाराजांची पुण्यतिथी व प्रकटदिन असे दोन्ही सोहळे माघ वद्य सप्तमी व रामनवमीला (चैत्र शुद्घ नवमीला) साजरे केले जातात. त्यावेळी येथे मोठी यात्रा भरते. येथील ‘ आनंदसागर ’ हे पर्यटन स्थळ बागा, जलाशय, विविध शिल्पे, लक्ष्मी झुला, मत्स्यालय, विविध भूदृश्ये, ध्यानमंदिर यांसाठी प्रसिद्घ आहे.
कुंभारगावकर, य. रा.