ससराम : बिहार राज्यातील इतिहासप्रसिद्ध शहर व रोहतास जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय. लोकसंख्या १,३१,०४२ (२००१). हे पूर्व रेल्वेच्या मुगलसराई-गया लोहमार्गावर गयेच्या पश्चिमेस सु. १०३ किमी.वर वसले असून कोलकाता-दिल्ली लोहमार्गावरील ते प्रमुख स्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. २ (प्रसिद्ध ग्रँड ट्रंक रोड) या शहरातून जातो.
याच्या नावाविषयी काही पारंपरिक कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार येथील राजा सहस्रबाहू व परशुराम यांच्या नावांवरून ‘ससराम’ हे नाव या ठिकाणाला देण्यात आले तर दुसऱ्या वदंतेनुसार सहस्रबाहूच्या सहस्र हातांमध्ये विविध खेळणी होती व त्यांवरून या शहराला हे नाव मिळाले असावे. काहींच्या मते मूळ गाव ‘सहसा राम’ या व्यक्तीने वसविले म्हणून त्याचे ‘ससराम’ हे नाव झाले. शेरशाह सूरचा पिता हसन सूर याने सांप्रतच्या ठिकाणी गावाचा विकास केला, म्हणून याचे काही काळ ‘ हसनपुरा ’ हेही नाव वापरात होते. अव्वल इंग्रजी अमदानीत बंगाल-शहाबाद जिल्ह्याच्या आग्नेयीकडील हा एक पोटविभाग होता. शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू असून त्यांपैकी शेरशाह सूर (शेरखान-कार. इ. स. १५३८-१५४५) याची सु. ३७ मी. उंचीची लाल दगडातील, षटकोनी आकाराची कबर ही इस्लाम वास्तुकलेतील उत्तम कलाकृती आहे. ती ससराम शहरातील कृत्रिम तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेली आहे. याशिवाय शहरात शेरशाहच्या वडिलांची कबर असूनत्याच्या मुलाच्या कबरीचे काम अर्धवट स्थितीत आहे. शहराच्या पूर्वेस हजरत चंदन शाहीद पीर हे धार्मिक ठिकाण असून त्याच्या जवळच कैमूर टेकडीतील एका गुहेत अशोककालीन (इ. स. पू. तिसरे-दुसरे शतक) एक शिलालेख उपलब्ध झाला आहे. शहराच्या परिसरात जवळच शेरगढ व रोहतासगढ येथे जुन्या किल्ल्यांचे अवशेष आहेत. याशिवाय शहरातील मशिदी, शिखांच्या धार्मिक वास्तू, शहीद स्मारक, परिसरातील सृष्टिसौंदर्य इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. शहरातील माँ तारा चंडी मंदिर प्रसिद्ध असून श्रावण महिन्यात व दसऱ्यादिवशी भाविकांची येथे मोठी गर्दी असते.
शहरात इ. स. १८६९ मध्ये नगरपालिकेची स्थापना करण्यात आली असून तिच्या मार्फत शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता व रस्त्यांची देखभाल, आरोग्य इ. सुविधा पुरविल्या जातात. शहरात महाविदयालयीन शिक्षणापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. शहराच्या परिसरात दगडांच्या खाणींचा उदयोग तसेच दगडी फरश्या तयार करणे इ. उदयोग मोठया प्रमाणात चालतात.
चौंडे, मा. ल.