संमोहन विदया : (हिप्नॉटिझम). संमोहन किंवा संमोहीतावस्था यांचा शास्त्रशुद्ध व निदानीय उपयोग करणारे एक शास्त्र. संमोहन किंवा समोहितावस्था ही एक प्रवर्तित मानसिक अवस्था आहे. संमोहनविदया हे या अवस्थेचे विश्लेषक शास्त्र असून, संमोहनविदया हा हिप्नॉटिझम या इंग्रजी शब्दाचा पर्यायी मराठी शब्द होय. हिप्नॉसिझ ही इंग्लिश संज्ञा ‘ हिप्नॉझ ’ या मूळ ग्रीक शब्दापासून बनली आहे. या संज्ञेचा वाच्यार्थ निद्रा असा आहे. हिप्नॉस ही ग्रीक पुराणकथांतील एक निद्रा देवता होय मात्र संमोहित व्यक्ती ही वरकरणी निद्रेच्या आधीन झालेली दिसली, तरी प्रत्यक्षात तिच्यात अतिसूचन-क्षमता (वशता) असते.

संमोहन किंवा संमोहितावस्था ही संकल्पना निश्चितपणे केव्हा उपयोगात आणली गेली, याविषयी तज्ज्ञांत एकमत नाही तथापि प्राचीन काळी चेटूक, जादूटोणा आणि वैदयक यांतून या विदयेचा प्रसंगोपात्त वापर (उपयोग) करीत असावेत, असे काही मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. मात्र ती एक गूढ शक्ती आहे, अशी त्यावेळी तत्कालीन समाजाची भावना होती आणि ती मध्ययुगापर्यंत अस्तित्वात होती. या संकल्पनेच्या शास्त्रशुद्ध इतिहासाचा प्रारंभ अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. ⇨ फ्रान्ट्‌स (फिड्रिख) आंटोन मेस्मर (१७३४-१८१५) या ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ व शरीर-विज्ञाने त्यांच्या रूग्णांच्या उपचारपद्धतीत संमोहितावस्थेचा प्रथम उपयोग केला. त्याला ही गूढशक्ती असावी, असे चुकीचे सुरूवातीस वाटले म्हणून त्याने प्राणिक चुंबकत्व (ॲनिमल मॅग्नॅटिझम) ही संज्ञा त्यास वापरली. पुढे त्याच्या नावावरून या उपचारपद्धतीस मेस्मेरिझम किंवा हिप्नॉटिझम ही संज्ञा रूढ झाली. त्यामुळे संमोहनविदया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसशास्त्रीय पद्धतीचे ते आदय प्रवर्तक मानले जातात. यामुळे वैदयकीय व्यवसायिकांचे लक्ष या संकल्पनेकडे वेधले गेले. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अनेक वैदयकवेत्ते या पद्धतीचा वापर करीत होते परंतु इंग्लिश शल्यविशारद व मानसोपचारतज्ज्ञ जेम्स बेड (१७९५-१८६०) याने मेस्मर यांच्या कार्याचा अभ्यास करून, तसेच दृश्य घटनांच्या अवलोकनातून असे प्रतिपादन केले की, मेस्मर यांच्या उपचारातील महत्त्वाचा घटक म्हणजे रूग्णाची प्रतिक्रिया होय. बेड यांनी त्यासाठी ‘ न्यूरोहिप्नॉटिझम ’ ही संज्ञा प्रथम वापरली. पुढे ती संक्षिप्त रूपात ‘हिप्नॉटिझम’ म्हणून प्रचिलित झाली. शिवाय त्यांनी संमोहनात्मक घटना ह्या शरीरशास्त्रीयच असतात त्यांचा मेस्मर समजत होते, तसा शरीरातील द्रव्याशी काहीही संबंध नाही. पुढे १८८० च्या दशकात संमोहन (हिप्नॉसिस) या संकल्पनेविषयी शास्त्रीय आकर्षण सर्वत्र प्रसृत झाले. ए. ए. लीबॉल्ट या ग्रामीण भागात वैदयकीय व्यवसाय करणाऱ्या फ्रेंच वैदयवेत्त्याने आपल्या उपचारपद्धतीत संमोहन तंत्राचा वापर करून अनेक रूग्णांना बरे केले. तसेच याबाबतीत संशोधन अभ्यास केला. त्याला स्ट्रॉसबर्ग येथील वैदयकशास्त्राचे प्राध्यापक हिप्पो-लाइट बर्नहाइम याने सहकार्य दिले. फ्रान्समध्ये झालेल्या संशोधनानुसार संमोहनात्मक घटनांचा संबंध मानसशास्त्रीय शक्तीशी, विशेषत: सूचन (सजेशन) या संकल्पनेशी जोडला गेला. दोघांनी स्वतंत्र रीत्या या विषयावर लेखन करून असा निष्कर्ष काढला की, संमोहनात कोणत्याही प्रकारच्या शारीरिक बलाचा वापर केला जात नाही. तद्वतच शरीरक्रिया-प्रकियांचा त्यात संबंध येत नाही, तर सूचनांना प्रतिसाद देणारी ती एक निदानीय (क्लिनिकल) निद्रावस्था आहे. याच सुमारास ⇨ सिग्मंड फॉइड (१८५६-१९३९) या ऑस्ट्रियन शरीरविज्ञ व मानसशास्त्रज्ञाने फ्रान्सला भेट दिली. लीबॉल्ट आणि बर्नहाइम यांच्या संमोहनाविषयीच्या संशोधनामुळे ते प्रभावित झाले कारण संमोहितावस्थेतील चिकित्सेतील वर्चस्मुळे मज्जाविकृतीतील अव्यवस्थेसाठी मार्ग उपलब्ध झाला, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी १८८४ मध्ये बॉइरसमवेत उन्माद झालेल्या रूग्णांवर संमोहन निद्रेच्या मदतीने उपचार केले. पुढे फ्रेंच तंत्रिका तंत्रविशारद ð झां शार्को यांच्याबरोबर तसेच बर्नहाइम यांच्यासमवेत काम केले. व्हिएन्नाला परतल्यानंतर (१८८६) त्यांनी सुरूवातीला संमोहन निद्रा उपचारपद्धती काही दिवस वापरली मात्र नंतर ती त्यांना असमाधानकारक वाटू लागली. म्हणून त्यांनी त्याऐवजी मुक्त साहचर्याची, म्हणजे भावविरेचनाची (कॅथार्सिस) पद्धती अवलंबिली आणि विस्तारपूर्व आपली मनोविश्लेषण उपपत्ती प्रतिपादिली. या मनोविश्लेषण पद्धतीमुळे संमोहनविदयेकडे केवळ एक आनुषंगिक उपचारपद्धती म्हणून अनेक मानसशास्त्रज्ञ आणि वैदय पाहू लागले तथापि पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांतील सैनिकांच्या मज्जाविकृतीच्या संदर्भात या मनोविश्लेषणात्मक उपचारपद्धतीबरोबरच संमोहनविदयेचाही काही प्रमाणात उपयोग करण्यात आला. अदयापिही या दृश्य घटनेविषयी सर्वमान्य उपपत्ती उपलब्ध नाही तरीसुद्धा जगभरातील वैदयकशास्त्राचे अभ्यासक, मानसोपचारतज्ज्ञ, दंतवैदय आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या संस्थांनी एक चिकित्सापद्धती म्हणून संमोहनविदयेच्या उपचारपद्धतीस अधिकृत रीत्या समर्थन व मान्यता दिली आहे.

देशपांडे, सु. र.

संमोहन अवस्थेची गुणवैशिष्टये : बाह्यांगी निद्रावस्थेशी साम्य असून शरीरक्रियाशास्त्रीय दृष्टया (विद्युत् मस्तिष्कालेखावरून, ईईजी) जागृतावस्थेशी साम्य दर्शविणारी ती एक रूपांतरीत ⇨ बोधावस्था असून तीत लक्ष किंवा अवधान अत्यंत एकाग होऊन एकाच वस्तूवर अथवा जाणिवेच्या एका भागावरच पूर्ण केंद्रित झालेले असते. यामुळे वातावरणातील इतर गोष्टींचा पूर्ण विसर पडतो. स्नायू शिथिल होतात आणि मानसिक दडपण वा तणाव हलके होतात. संमोहन हे एका विशिष्ट प्रकारचे बोधविच्छेदन असते. संमोहनामुळे सूचनक्षमता प्रबल होते आणि संमोहित व्यक्ती संमोहकाने दिलेल्या आज्ञा आचरणात आणते. संमोहनोत्तर कालातही संमोहनात दिलेल्या आज्ञा काही दिवसांपर्यंत त्या व्यक्तीकडून पाळल्या जातात. निरोधन (रिप्रेशन) उठवले जाऊन ⇨ अबोध मना त दडलेल्या जुन्या आठवणी बोधावस्थेत आणता येतात. परागतीची (रिग्रेशन) अवस्था आणणे सोपे जाते. वारंवार संमोहन केल्यास संमोहकाशी एक सामंजस्याचे नाते जडले जाते व त्यामुळे संक्रमणाची (ट्रान्सफरन्स) प्रतिक्रियाही होऊ शकते. संमोहन काळातील घटनांचा नंतर विसर पडतो.

संमोहनाविषयी काही चुकीचे समज प्रचलित आहेत. उदा., मनाविरूद्घ जबरदस्तीने संमोहन करता येते, हा समज चुकीचा आहे. क्वचित एखादी अतिसूचनशील व्यक्ती मानसिक सहकार्य न देताही संमोहनाच्या अंमलाखाली येऊ शकते परंतु तिच्या शारीरिक सहकार्याशिवाय ते अशक्य आहे. संमोहनावस्थेत कसलेही दुष्कृत्य करायला लावता येते, हादेखील चुकीचा समज आहे कारण नीतिमूल्यांच्या विरूद्ध आज्ञा दिल्यास संमोहनावस्था भंग पावते. मात्र मूळच्या समाजविरोधी स्वभाववैशिष्टयाला चालना दिल्यास एखादे दुष्कृत्य घडू शकते. विक्षिप्त अथवा बालिश चाळे कुणालाही करायला लावणे मात्र शक्य होते.

संमोहन सुलभ होण्यासाठी पुढीलप्रमाणे कारकांची गरज आहे : संमोहनावस्थेत जाण्याची इच्छा व तशी पूर्वतयारी असणे. रूग्णाला आदर व श्रद्धा असलेली आणि संमोहनविदयेत नैपुण्य व आत्मविश्वास असलेली संमोहक व्यक्ती असणे. वातावरण शांत व धीरगंभीर असणे.

संमोहनाचे तंत्र : व्यक्तीला संमोहित करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. अशा निरनिराळ्या पद्धतींत काही समान विशेष आढळतात ते असे : रूग्णाचे लक्ष वेधून घेणारी संमोहकाची स्थिर एकटक नजर किंवा विशिष्ट तृहेची हालचाल उदा., हातवारे, त्याचप्रमाणे लंबक, स्वत:भोवती फिरणारी चकचकीत धातूची तबकडी तसेच लययंत्रासारखे (मेट्रनोम) एकाच सुरात अखंडपणे यांत्रिक आवाज करणारे उपकरण यांची आवश्यकता असते. संमोहित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सूचन करण्यात येते. उदा., धीरगंभीर आवाजातील ‘तुझे शरीर हळुहळू शिथिल होत आहे, पापण्या जड होत आहेत व डोळे मिटताहेत, निद्रा येत आहे’, या प्रकारच्या सूचना काही संमोहक रूग्णाच्या कपाळावर अथवा चेहृयावर हळुवारपणे पुन:पुन्हा केलेल्या स्पर्शानेही करतात.

संमोहनावस्था निर्माण झाल्याच्या प्रचलित प्राथमिक कसोटय आहेत त्या अशा : संमोहित व्यक्तीला शरीर मागे आपोआप झुकत आहे, तसेच खुर्चीवरचा तिचा हात हळुहळू हलका होत चालला आहे व आपोआप वर उचलला जात आहे, असे सूचन दिल्यास ती व्यक्ती तशीच हालचाल करते. त्यामुळे संमोहित व्यक्तीची सूचनक्षमता बळावली आहे, ह्याची खात्री होते.

संमोहनातील तंद्रावस्थेचे (स्ट्यूपर) तीन स्तर असतात. त्यांपैकी सौम्य तंद्रावस्थेत व्यक्ती एक तर शिथिल आणि निश्चल बनते किंवा अस्वस्थ होते. मध्यम प्रतीच्या तंद्रावस्थेत तिची संवेदनशक्ती व स्मरणशक्ती कमजोर होऊन त्यांत चुका होतात. तिसऱ्या स्तरावरील गाढ तंद्रावस्थेला निद्राभमणावस्था (सॉम्नॅम्ब्युलिझम) म्हणतात. ह्या अवस्थेत संमोहित व्यक्तीकडून संमोहकाच्या कष्टप्रद व विचित्र आज्ञाही पाळल्या जातात. तसेच प्रत्यावर्तन, ⇨ निर्वस्तुभम (हॅल्यूसिनेशन) म्हणजे भास, संवेदना व स्मरणाचा पूर्ण लोप तसेच अनुस्थिति-अज्ञान (डिस्ओरिएंटेशन) इ. तीव्र प्रमाणात होते.

संमोहनाचे प्रकार सहा आहेत : (१) स्वयंसंमोहन म्हणजे स्वत:लाच सूचननिर्देश दिल्याने तंद्रावस्थेत जाता येते, मात्र पहिल्या पातळीपर्यंतच. स्नायुशैथिल्य अथवा निद्रानाशाच्या उपचारासाठी स्वयंसंमोहनाचा उपयोग होतो. (२) उपचार म्हणून जेव्हा संमोहनाचा वापर करतात, तेव्हा त्याला संमोहनोपचार (हिप्नोथेरपी) म्हणतात. (३) वैदयकीय उपचार म्हणून जेव्हा संमोहनाचा उपचार करतात, त्याला वैदयकीय संमोहन म्हणतात. (४) संमोहनाच्या तंद्रावस्थेत केलेले ⇨ मनोविश्लेषण (सायकोॲनॅलिसिस). (५) संमोहननाटय (हिप्नोड्रामा) रंगमंचावर संमोहनाच्या प्रभावाखाली केलेले मनोनाटय. (६) संमोहनग्लानी (हिप्नोनार्कोसिस) संमोहनामुळे येणारी निद्रा.

संमोहनाचा वापर प्रामुख्याने तीन क्षेत्रांत करतात : (१) करमणूक, (२) संशोधन व (३) वैदयकीय उपचार. यांपैकी करमणुकीसाठी संमोहनाचे सार्वजनिक प्रयोग जादूगार किंवा तत्सम रंगमचीय संमोहक (मॅग्नेटिस्ट) उपजीविकेसाठी करतात. संशोधनाच्या दृष्टीने संमोहनाचा वापर वैदयक मानसशास्त्रज्ञ व मानसचिकित्सक करतात. मानसशास्त्रीय संशोधनात संमोहनातील तंद्रावस्थेत दिलेल्या सूचनांतर्फे अवधानाचा व्याप व काळ वाढविणे, अध्ययन सुलभ व जलद करणे आणि प्रेरणाशक्ती वाढविणे, या बाबतींत अभ्यास चालू आहे. वैदयकीय क्षेत्रात संमोहनाचा उपयोग प्रामुख्याने शुद्घिहरण, वेदना शमविण्यासाठी व संवेदनाहरणासाठी केला जातो [→ वैदयकीय संमोहन शुद्धीहरण].

संमोहनाचे तंत्र इतर उपचारपद्धती सुलभ व प्रभावी करण्यासाठीही वापरले जाते. उदा., मनोविश्लेषणात उद्भवणाऱ्या प्रतिरोधाला टाळण्यासाठी तसेच अबोध मनातल्या निरोधित आठवणी सबोध करण्यासाठी संमोहनाचा प्रभावी उपयोग केला जातो. ह्यालाच संमोही विश्लेषण (हिप्नोॲनॅलिसिस) म्हणतात. त्याशिवाय वर्तनोपचार पद्धतीत स्नायुशैथिल्य सुलभ करण्यासाठीही संमोहनाचा वापर केला जातो.

संमोहनविदयेचा अयोग्य वापर केल्यास, रूग्णाच्या प्रकृतीला बाधा होण्याचा संभव असतो. उन्मादात्मक मनोरूग्णावर संमोहनाचा उपचार केल्यास, संमोहनामुळे उत्तेजित झालेल्या कल्पनाजालीय इच्छापूर्तीमुळे (विश–फुलफिलिंग फॅटसी) संमोहकापासून अवास्तव व फाजील अपेक्षा करण्याचा किंवा त्याच्यावर खोटे आरोप केले जाण्याचा संभव असतो. [→ उन्माद कल्पनाजाल]. छिन्नमानसात उन्मादाभासीची (हिस्टेरीफॉर्म) लक्षणे बरी करण्यासाठी संमोहनाचा वापर केल्यास संबंधित रूग्णाच्या मनातील सुप्त ⇨ चित्तविकृती उफाळून मनोप्रकृती गंभीर व्हायचा संभव असतो. [→ छिन्नमानस]. खिन्नता वा मानसिक अवसाद विकारामुळे उद्‌भवणारी लक्षणे (उदा., स्थूलता) संमोहनाने काढण्याचा प्रयत्न करताना आत्मघातकी वृत्ती बळावून रूग्णाच्या आत्महत्येचा संभव वाढतो. व्यक्तीच्या अहंभावाला घातक अशा काही अप्रिय आठवणी संरक्षणीय निरोधनाखाली अबोध मनात दडपलेल्या असतात. संमोहनातील सूचनाने ते निरोधन काढून टाकल्यास, त्या आठवणी सबोध होऊन तीव्र चिंता निर्माण होते. उदा., निद्राभमण करणाऱ्या रूग्णाची मनोगती ही विश्लेषणाने समजून न घेता, त्याचे हे लक्षण सूचनेने बंद केल्यास अत्यंत तीव्र अशी चिंता उद्‌भवते व काही वेळा अल्पकालीन चित्तविकृतीही होऊ शकते. संमोहकाला संमोहनतंत्राचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे तंद्रावस्था सूचनेने बंद न करता आल्यास तशाच अवस्थेत संमोहित व्यक्ती बराच वेळ राहून व कुठेही जाऊन अडचणीत सापडू शकते. वारंवार संमोहनोपचारामुळे सूचनवशता बळावते व उन्मादी रूग्ण आपोआप तंद्रावस्थेत जाऊ शकतो किंवा नवीन लक्षणे दाखवू शकतो.

शिरवैकर, र. वै.

संदर्भ : 1. Brown, Daniel P. Fromm, Erik, Hyphotherapy and Hypnoanalysis, Erlbaum, 1986.

2. Dauven, Jean, The Powers of Hypnosis, Scarborough House, 1980.

3. Hall, James A. Hypnosis : A Jungian Perspective, Guilford Press, 1989.

4. Haummond, D. Ed. Handbook of Hypnotic Suggestions and Metaphors, Norton, 1990.

5. Rossi, Ernest L. Ryan, Margaret O. Ed. Creative Choices in Hypnosis, Vol. 4, Irvington, 1990.

6. Ruch, F. L. Psychology and Life, Bombay, 1963.

7. Sterm, P. J. Abnormal Person and His World, Princeton, (N.J.), 1964.

8. Wolberg, L. R. Hypnoanalysis, New York, 1945.

९. साठे, भा. वि. संमोहनाबद्दल सर्व काही, पुणे, १९९८.