सत्‌नामी पंथ : एक हिंदू धर्मपंथ. सत् म्हणजे सत्य किंवा सत्त्व आणि सत्नाम म्हणजे परमेश्वर. सत्नामी हे नाव धारण करणारे तीन पंथ भारतात आढळतात. त्यांपैकी साध पंथाचे अनुयायी स्वत:स सत्नामी म्हणून घेत असले, तरी तो एक स्वतंत्र संप्रदाय असून त्याचा मूळ प्रवर्तक व काळ यांविषयी अदयापि विश्र्वसनीय माहिती उपलब्ध नाही. पहिल्या सत्नामी पंथाची स्थापना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील सरदहा या गावाचा जगजीवनदास याने सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात केली. तो चंदेल ठाकूर ज्ञातीचा असून कबीर पंथी, योगी व कवीही होता. सत्नामी एकाच परमेश्वराचे उपासक असून तो निर्गुण, निराकार आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. तसेच तो सर्व वस्तूंचा निर्माता आहे, असे या पंथाचे अनुयायी मानतात तथापि दशावतारांपैकी राम आ कृणिष्ण यांना ते मानतात. हनुमानाची उपासनाही त्यांच्या पंथात आहे. मानवी सुखदुःखांविषयी ते उदासीन राहून ईश्वरावरील श्रद्धेच्या आधारावर ते आपले जीवन जगतात. त्यांची कर्तव्ये पार पाडतात. आपल्या उजव्या मनगटात ते दोन वेढयांचा एक काळा व पांढरा रेशमी दोरा बांधतात. त्यांचा संस्थापक जगजीवनदास याने ज्ञानप्रकाश, महाप्रलय, प्रथमगंथ आदी काही गंथ लिहिले. त्यांत सत्नामी पंथाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मध्य प्रदेशातही छत्तीसगड विभागात सत्नामीनामक एक पंथ असून तो घासीदास किंवा घासीराम नावाच्या एका चर्मकार ज्ञातीतील सत् पुरूषाने एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्थापिला. त्याचे हजारो अनुयायी असून त्यांत चर्मकार ज्ञातीतील लोकांचा अधिक भरणा होता. ह्या पंथातही एकाच परमेश्वराची भक्ती प्रतिपादिली आहे. मूर्तिपूजा ह्या पंथाचे अनुयायी करीत नाहीत. मदयमांस सेवीत नाहीत. त्यांच्या आचारधर्मात सूर्यपूजा आहे. सर्वांच्या समानतेची शिकवण ह्या पंथात देण्यात येते तथापि घासीदास व त्याचे कुटुंबीय श्रेष्ठ, अशी त्यांची धारणा असते. घासीराम याच्या मृत्यूनंतर (१८५०) अंधश्रद्धांचा जोर वाढला व काही धार्मिक दुराचार पुन्हा सुरू झाले. त्यांतून चुंगियानामक उपपंथ उदयास आला.

कुलकर्णी, अ. र.