सटना : रघुराजनगर. भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर व त्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,२५,४६८ (२००१). मध्य रेल्वेवरील हे स्थानक राज्याच्या ईशान्य भागात, तोन्स नदीकाठावर वसले आहे. विंध्य पर्वतश्रेण्यांनी वेढलेले हे शहर रेवाच्या पश्र्चिमेस सु. ५० किमी. व जबलपूरच्या ईशान्येस सु. १७० किमी.वर पठारी प्रदेशात असून अव्वल इंग्रजी अमदानीत ते बाघेलखंडाच्या राजकीय प्रतिनिधीचे मुख्यालय होते. पूर्वीपासून शेतमालाचे आणि कपडयांच्या व्यापाराचे हे केंद्र असून येथे मोठया प्रमाणावर तेलाच्या व पिठाच्या गिरण्या आहेत. यांशिवाय हातमागावर कापड विणणे, सिमेंट व केबल निर्मिती इ. उदयोग येथे चालतात. ‘प्रिझम सिमेंट’ हा आशियातील ख्यातनाम कारखाना सटना येथे आहे. येथे औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प असून त्याचे व्यवस्थापन केंद्र शासनामार्फत केले जाते. येथे पश्र्चिम-मध्य रेल्वेचा डिझेल डेपो आहे. शहराचा कारभार महानगरपालिकेमार्फत चालविला जातो. येथे महाविदयालयीन शिक्षणापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध असून येथील महाविदयालये अवदेश प्रताप सिंग विदयापीठाशी संलग्न आहेत. नवस्वदेश, नवभारत इ. आठ दैनिके येथून प्रसिद्ध होतात (२००८). सटनाजवळील ⇨ भारहूत हे प्राचीन स्थळ मौर्यकालीन अवशेषांसाठी प्रसिद्घ आहे. तसेच १६ किमी.वरील ‘ रामवन ’ येथील सु. ४,८८ मी. उंचीची हनुमानाची मूर्ती प्रसिद्ध आहे. येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते.

चौंडे, मा. ल.